बातमी ऐका (Marathi Voice Reader)
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय पंढरपूरमधील विहीर दुर्घटनेतून आला. मामाच्या शेतातील विहिरीच्या कामासाठी उतरलेला 16 वर्षीय शुभम दांडगे अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने मृत्यूच्या दाढेतून वाचला. या घटनेचा त्याला एवढा मोठा मानसिक धक्का बसला की त्याला उपचारासाठी दाखल करावं लागलं. विहिरीत काम करणाऱ्या चार मजुरांसाठी नाश्ता आणण्यासाठी तो पोकलेन मशीनच्या मदतीने बाहेर पडला आणि काही क्षणांतच विहिरीचा कठडा आणि मातीचा मोठा ढिगारा कोसळला.
या भीषण दुर्घटनेत चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला. या मजुरांचे मृतदेह जवळपास २४ तासांनंतर बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. शुभमला या घटनेनंतर भयंकर धक्का बसला. तो म्हणाला, ‘मी आणखी पाच मिनिटं थांबलो असतो, तर माझाही जीव गेला असता’.
पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील दत्तात्रय निवृत्ती शिंदे यांच्या शेतात गेल्या 15 दिवसांपासून विहीर खोदण्याचे आणि बांधकामाचे काम सुरू होते. हे काम अंतिम टप्प्यात आले होते. रविवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास विहिरीचे मोजमाप घेण्यासाठी चार मजूर विहिरीत उतरले होते. यावेळी शुभम दांडगे हादेखील विहिरीतील कामात मदत करत होता.
दरम्यान, विहिरीतील मोटर सरळ करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शुभम पोकलेन मशीनच्या मदतीने विहिरीबाहेर आला. त्यानंतर तो चारही मजुरांसाठी नाश्ता आणण्याच्या तयारीत होता. मात्र, तो विहिरीबाहेर येताच काही क्षणांतच विहिरीचा कठडा ढासळला. त्यापाठोपाठ मोठ्या प्रमाणात दगड, माती आणि मुरूमाचा ढिगारा विहिरीत कोसळला.
अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने शुभमही हादरला. विहिरीच्या वर असलेल्या दोघांनी आरडाओरड सुरू केली. मागे वळून पाहिल्यानंतर विहिरीत काम करणारे चारही मजूर माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे त्याला दिसले. काही क्षणांपूर्वी ज्यांच्यासोबत तो काम करत होता, तेच मजूर डोळ्यांदेखत मृत्यूमुखी पडल्याने शुभमला मोठा मानसिक धक्का बसला.
या घटनेनंतर त्याला तातडीने पंढरपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटनेतून बचावल्यानंतरही त्याच्या मनावर मोठा आघात झाला आहे. ‘मी पाच मिनिटं आणखी थांबलो असतो, तर माझाही जीव गेला असता. माझं नशीब बलवत्तर म्हणून मी वाचलो. माझा नवीन जन्म झाला आहे,’ अशा शब्दांत शुभमने आपला अनुभव सांगितला. चार मजुरांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, काही मिनिटांच्या फरकाने बचावलेल्या शुभमच्या अनुभवाने या दुर्घटनेची भीषणता पुन्हा एकदा समोर आली आहे.