बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर : पावसाच्या लहरीपणावर आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करत, जिद्दीच्या आणि कष्टाच्या बळावर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून सोन्याचे पीक कसे घेता येते, याचे उत्तम उदाहरण सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील शेतकरी सतीश धोंडीराम भोसले यांनी घालून दिले आहे. सतीश भोसले यांनी मागील 10 वर्षांपासून पाच एकर शेतात यशस्वीपणे सतीश भोसले हे ग्रीन एप्पल बोरची लागवड करत असून, आज ते या माध्यमातून वर्षाला सर्व खर्च वजा करून 6 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.
ग्रीन एप्पल बोर लागवड करण्यापूर्वी सतीश भोसले यांनी जमिनीची योग्य मशागत करून खतांचे व्यवस्थापन केले. त्यानंतर शेतात शेणखत भरून पाच एकरांवर या फळबागेची लागवड केली. या संपूर्ण लागवड प्रक्रियेसाठी त्यांना सुरुवातीला 2 ते 2.50 लाख रुपयांपर्यंतचा खर्च आला होता. प्रतिकूल परिस्थितीतही हे पीक जोपासण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली. ग्रीन ॲपल बोराच्या पिकावर प्रामुख्याने करपा आणि भुरी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या रोगांपासून पिकाचा बचाव करण्यासाठी ते नियमितपणे दर पंधरा दिवसांनी आवश्यक फवारण्या घेतात, ज्यामुळे त्यांची बाग रोगमुक्त आणि निरोगी राहते.
या फळबागेतून उत्पादित होणाऱ्या ग्रीन एप्पल बोराला सध्या बाजारात उत्तम मागणी असून, सरासरी 900 रुपये प्रति 1000 किलो दर मिळत आहे. सतीश यांच्या शेतातील या बोरांची विक्री केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर नागपूर, मुंबई आणि हैदराबाद यांसारख्या मोठ्या महानगरांच्या बाजारपेठांमध्ये होते. शेतीचा मशागत खर्च, औषध फवारणी आणि वाहतूक खर्च वजा जाता, सतीश भोसले यांना सध्या या पाच एकरांच्या बागेतून दरवर्षी जवळपास 6 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे.
एकीकडे दुष्काळ आणि पाण्याची टंचाई असतानाही, योग्य नियोजन करून ग्रीन एप्पल बोराची ही बाग उत्तमरीत्या जोपासून सतीश भोसले यांनी परिसरातील इतर शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. कष्टाचे चीज कसे होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची ही शेती ठरत आहे.