बातमी ऐका (Marathi Voice Reader)
नाशिक: सध्याच्या काळात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासकीय रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला मुलीच्या चेहऱ्याचा आणि हुबेहूब आवाजाचा वापर करून व्हिडिओ कॉल आला. ‘क्लासची फी भरायची आहे, पैसे पाठव’ अशी मागणी कॉलवरून करण्यात आली. मात्र, वैद्यकीय शिक्षण घेणारी मुलगी दिवाळीच्या सुट्टीला घरी आलेली होती. त्यामुळे आईला संशय आला आणि मोठी फसवणूक टळली. एआय डीपफेकच्या या नव्या प्रकारामुळे नाशिक परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं घडलं काय?
शासकीय रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याची मुलगी जळगाव येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. दिवाळीच्या सुट्टीत ती घरीच असताना, अचानक आईच्या मोबाईलवर तिचाच चेहरा आणि हुबेहूब आवाज असलेला व्हिडिओ कॉल आला. क्लासची फी भरायची आहे, पैसे पाठवा, अशी मागणी या कॉलवर करण्यात आली. मुलगी समोरच घरात असल्याने आईला संशय आला आणि तिने विचारणा करताच कॉल कट झाला. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून, आर्थिक नुकसान न झाल्याने गुन्हा नोंदवला गेला नसला तरी एआय डीपफेकचा हा नवीन प्रकार उघडकीस आला आहे.
Sangli Crime: 30 वर्षीय उच्चशिक्षित विवाहिता; पुण्यात नोकरी अन् दिवाळीला गावी सांगलीला गेली, प्रियकरानं आईच्या डोळ्यादेखत संपवलं
एआयद्वारे क्लोनिंग कसे होते?
सायबर गुन्हेगार सोशल मीडियावरून डेटा चोरी करून फोटो आणि ३ ते ४ सेकंदांचे व्हॉइस सॅम्पल डाऊनलोड करतात. त्यानंतर एआय टूल्सच्या मदतीने व्हॉइस क्लोनिंग केले जाते आणि फेस स्वॅप सॉफ्टवेअरद्वारे रिअल टाईममध्ये चेहरा मॅप केला जातो.
फसवणूक ओळखण्याच्या आणि टाळण्याच्या टिप्स
ओठांची हालचाल, ऐकू येणारा आवाज आणि डोळ्यांची अप्राकृतिक हालचाल यावरून हा प्रकार ओळखता येऊ शकतो तसेच कॉलमध्ये अंधार किंवा नेटवर्कची समस्या असल्याचे कारण दिले जाऊ शकते. फसवणूक टाळण्यासाठी कुटुंबात सांकेतिक शब्द ठरवा. बालपणीच्या आठवणी, घरातील पाळीव प्राण्याचे नाव किंवा केवळ दोन्हींनाच माहीत असलेली खासगी गोष्ट विचारा, ज्यांची उत्तरे हॅकर्सकडे नसतात. असा अनोळखी व्हिडिओ कॉल लगेच कट करून मुलीच्या मूळ नंबरवर संपर्क साधा.
सायबर पोलिसांचे आवाहन
हा एक नवीन स्कॅम असून अशा कॉलला अजिबात प्रतिसाद देऊ नका. फसवणूक झाल्यास १९३० या क्रमांकावर तक्रार करा आणि सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका, असे वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे यांनी सांगितले आहे.