बातमी ऐका (Marathi Voice Reader)
नाशिक : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येवला शहरात कासार गल्लीतील एक बंद घर फोडून अज्ञात चोरांनी तब्बल 12 लाख 99 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम 331 (4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासार गल्लीत राहणारे पुष्कराज पांडुरंग केवारे (वय 58) हे कुटुंबीयांसह जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरांनी घराचे कडीकोंडणे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटे आणि इतर साहित्याची उचकापाचक करून मौल्यवान वस्तूंचा शोध घेतला. चोरांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोखड पळवली. एवढ्यावरच न थांबता घरातील दुचाकी (क्रमांक एमएच 15 एलडी 5030) आणि सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरदेखील सोबत नेला.
14 नोव्हेंबर रोजी रात्री केवारे कुटुंबीय देवदर्शनावरून घरी परतल्यानंतर घरातील सामान अस्तव्यस्त झाल्याचे आणि मौल्यवान वस्तू गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ येवला पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून हस्तरेषा पथकालाही पाचारण करण्यात आले.
चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये दोन तोळे वजनाचा लक्ष्मीहार, सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स, दोन तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, पाच तोळे वजनाचे 11 जोड सोन्याचे टॉप्स, दहा तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, एक तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या यासह सुमारे 23 तोळे सोने, चार लाख रुपयांची रोख रक्कम, दुचाकी आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा एकूण 12 लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
या प्रकरणी पुष्कराज केवारे यांच्या फिर्यादीवरून येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे कासार गल्ली परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, अज्ञात चोरांचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल लवकरात लवकर हस्तगत करण्याचे मोठे आव्हान येवला शहर पोलिसांसमोर आहे.