बातमी ऐका (Marathi Voice Reader)
छत्रपती संभाजीनगर : गौरीपूजनासाठी कुटुंबीय गावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाचवेळी चार घरे फोडली. वाळूज परिसरातील सिडको महानगर-1 भागात हा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी घरांमधून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 90 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे, याच घरफोडीदरम्यान चोरट्यांच्या हाती लागलेला सुमारे चार तोळ्यांचा जुना सोन्याचा हार त्यांनी घरातच टाकून दिला.
या प्रकरणी कृष्णदेव कासुर्डे (सियाराम सोसायटी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासुर्डे यांच्या घरासह सियाराम सोसायटीतील भगीरथ तौर (फ्लॅट क्रमांक 307), महेश घुगे (फ्लॅट क्रमांक 105) तसेच लोटस रेसिडेन्सीमधील किशन नवले यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले.
गुड न्यूज! छ. संभाजीनगरातून गोवा अवघ्या 2 तासांत, ‘इंडिगो’ची विमानसेवा पुन्हा सुरू होणार, पण कधी?
घरफोडीसाठी चोरट्यांनी लोखंडी कडी-कोयंडे आणि कुलपे तोडण्यासाठी हातोडी तसेच हायड्रॉलिक पकडीचा वापर केल्याचे समोर आले आहे. या घटनेतील तिघे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, तिघांच्याही डोक्यावर टोपी असल्याचे दिसून आले आहे. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
4 तोळ्यांचा हार तिथंच टाकला
या घरफोडीत चौथ्या मजल्यावरील एका रहिवाशाच्या घरातून त्यांच्या आईचा सुमारे 20 वर्षांपूर्वीचा चार तोळ्यांचा सोन्याचा हार चोरट्यांच्या हाती लागला. मात्र, हा हार जुना आणि मळकट झालेला असल्याने तो बनावट असल्याचा चोरट्यांचा समज झाला. त्यामुळे मौल्यवान असूनही त्यांनी हार सोबत नेला नाही आणि तो घरातच फेकून दिला. चोरट्यांनी अतिशय कमी वेळेत घरफोड्या केल्याचेही समोर आले आहे. अवघ्या 15 मिनिटांच्या कालावधीत चार घरांना लक्ष्य करून त्यांनी चोरी केली.
या घटनेत 4 हजार 500 रुपये रोख, 7 ग्रॅम 540 मिली सोन्याची ठुशी, 1 ग्रॅम 870 मिली सोन्याची नथ आणि 40 ग्रॅम वजनाचा चांदीचा करंडा असा ऐवज चोरीला गेला आहे. चोरीला गेलेल्या वस्तूंची एकूण किंमत सुमारे 90 हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
गौरीपूजनाच्या निमित्ताने अनेक कुटुंबे बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी ही संधी साधल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.