उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत ऑपरेशन लोटसचा भाग आहे असे म्हणतील. स्वतः शरद पवारांनीही अजितदादांचा घातपात नसल्याचे सांगितले आहे. संजय राऊत यांनी आता नेटफ्लिक्सच्या वेबसीरिज लिहिण्याचे काम करावे, असे उत्तर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी दिले. उद्धव ठाकरे यांच्या शिवेसनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या घातपातावर संशय व्यक्त केला होता. अजित पवारांचा विमान अपघात ऑपरेशन लोटसचा भाग आहे का?, असा सवाल राऊत यांनी केला होता. तसेच भाजपच्या विरोधात जाणारा एकतर जेलमध्ये जातो, नसता जीव जातो, असा आरोपही त्यांनी केला. याला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले. काही पुरावे आहेत का? नवनाथ बन म्हणाले, ‘उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत ऑपरेशन लोटसचा भाग आहे असे म्हणतील. उद्या जर त्सुनामी आली तरी संजय राऊत ऑपरेशन लोटसचा भाग म्हणतील. उद्या पूर आली तरी संजय राऊत ऑपरेशन लोटसचा भाग म्हणतील. त्यांनी ऑपरेशन लोटसचे नाव घेण्याऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते सादर केले पाहिजे,’ असे आव्हान त्यांनी दिले. राऊत वेबसीरिज लिहा नवनाथ बन म्हणाले की, ‘ शरद पवारांनीही अजितदादांचा घातपात नसल्याचे सांगितले आहे. संजय राऊत प्रत्येक गोष्टीचा संबंध भाजपसोबत लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी उद्यापासून खासदारकी आणि राजकारण सोडून स्क्रिप्ट लिहण्याचे काम केले पाहिजे. त्यांनी नेटफ्लिक्ससाठी वेबसीरिज लिहिण्याचे काम करावे. जनतेमधून एकदाही निवडून न येता खासदारकी भूषवायची आणि खोटे आरोप करण्याचे काम संजय राऊत यांच्याकडून सुरू आहे.’ काही लोकांना ‘एनडीए’त घ्याचे होते नवनाथ बन म्हणाले की, ‘अजित पवार स्वगृही परतण्यासाठी प्रयत्न करत होते असा दावा संजय राऊत करत आहेत त्यांच्याकडे त्याचा काही पुरावा आहे का? तुमच्याकडे त्याबद्दलची माहिती आहे का? ते खोटे बोलत असतात. अजित पवार स्वगृही परतण्यात इच्छूक नव्हते, तर त्यांचे काही लोकांना एनडीएमध्ये घेण्याची इच्छा होती का हे बघितले पाहिजे. राऊत हे सातत्याने खोटे बोलत असतात. राऊतांचे काही अजित पवारांशी बोलणे झाले होते का? उगाच उठून पत्रकार परिषद घेत खोटी माहिती द्यायची हे काम राऊतांकडून सुरू आहे. त्यांना दुसरे काही काम नाही. अजित पवारांशी तुमचे कधी बोलणे झाले? तुमचा अजित पवारांशी काही संबंध नव्हता.’ राऊत पवारांपेक्षा मोठे आहेत का? नवनाथ बन म्हणाले की, ‘संजय राऊत यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते सादर केले पाहिजे. उगाच काही आरोप करू नये. मुळात भाजप असो की देवेंद्र फडणवीस यांनी देखील अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे. त्या प्रकरणी सीआयडी चौकशी सुरू आहे. तर केंद्रीय मंत्रालयाकडून सुद्धा सुरू आहे. कुठलीही चौकशी केली तरी काही हरकत नाही. हा दुर्दैवी अपघात होता. या अपघाताबद्दल शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे की हा घातपात नाही अपघात आहे. संजय राऊत हे शरद पवार यांच्यापेक्षा मोठे आहेत का?’ असा सवाल बन यांनी केला आहे. राऊतांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही नवनाथ बन म्हणाले की, ‘राऊतांचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, ते काही जरी म्हणत असतील तरी कोर्टाच्या निर्णयानंतरही ते म्हणतील कोर्ट विकले गेले आहे. त्यामुळे त्यांनी पाकिस्तान किंवा बांगलोदशाच्या कोर्टात जावे आणि तिथे चौकशीची मागणी करावी. केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या चौकशीतून सर्व काही बाहेर येईल. राऊत दोन भूमिका एकाच वेळी मांडतात नवनाथ बन म्हणाले की, अजित पवार यांचा पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष होता ते मविआमध्ये पुन्हा जाणार नव्हते. गेल्या साडेतीन वर्षांमध्ये अजित पवार यांच्याशी राऊतांचे काही बोलणं झाले होते का? तुम्ही त्यांच्यावर किती टीका केली आज अचानक तुम्हाला त्यांचा पुळका का आला? तुम्ही मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम करत आहात. तुम्ही उबाठा गट खड्यात घालवला आहे. तुम्ही आता वेबसिरजसाठी काम केले तर तुमचे दुकान सुरू राहील. अजित पवारांच्या जाण्यामुळे राज्यासह भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. राऊतांनी जनतेबद्दल काही बोलू नये ते जनतेचे नेते नाहीत. ते केवळ फेक नरेटिव्ह पसरवत आहेत. एकाच पत्रकार परिषदेत तुम्ही दोन भूमिका मांडतात किमान स्वत:चा मुद्दा तरी चांगला लिहून घेत जा. ..म्हणून राहुल गांधींची गुलामगिरी सुरू नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांची चाटूगिरी करण्याचे काम सुरू आहे. त्यांना उबाठामधून आता खासदाराकी मिळणार नाही, म्हणून काँग्रेसकडून खासदारकी मिळावी यासाठी ते लांगूनचालन करत आहेत याच्यापलीकडे त्याला बघता येणार नाही. राहुल गांधीची गुलामी केली तर पुन्हा राज्यसभा मिळेल या अपेक्षेपोटी ते राहुल गांधींचे गुणगाण गात आहेत. चौकशी करा – ममता बॅनर्जी अजितदादांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी सशंय व्यक्त करत ‘कोणीही सुरक्षित नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली योग्य चौकशी आवश्यक आहे. हे अनावश्यक भीती निर्माण करणारे आहे की कट आहे, हे काळच सांगेल. तथापि, सर्वात सोपा मार्ग म्हणजे पायलटला दोष देणे, जसे आपण मागील दोन प्रकरणांमध्ये पाहिले आहे,’ असे म्हटले होते. राजकारण नको – शरद पवार शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत यात राजकारण आणू नका, असे आवाहन केले होते. शरद पवार म्हणाले होते की, ‘अजित पवार यांचा हा अपघाती मृत्यू आहे. त्याचा महाराष्ट्राला प्रचंड असा धक्का आहे. एक कर्तृत्ववान, निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र मुकला आहे. जे काही नुकसान झाले ते भरून निघणारे नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. हा अपघात आहे. यामागे काही राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका मांडली गेली. मात्र, याच्यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपा करून इथे राजकारण आणू नये,’ असे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र, त्यानंतरही आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
हे ही वृत्त वाचा
अजित पवारांचा विमान अपघात ऑपरेशन लोटसचा भाग आहे का?:संजय राऊत म्हणाले- भाजपच्या विरोधात जाणारा एकतर जेलमध्ये जातो, नसता जीव जातो
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात विविध दावे-प्रतिदावे वेगाने पुढे येत आहेत. विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना काही गंभीर मुद्दे उपस्थित केले. अजित पवार हे भाजपच्या कथित भ्रष्टाचाराबद्दल खुलेपणाने बोलत होते, असे सांगत त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत कुत्र्यांच्या नसबंदीच्या कामातील गैरव्यवहाराची माहिती दादांना असल्याचा दावा केला. अनेक वर्षे अर्थमंत्री म्हणून काम केल्यामुळे भाजपशी संबंधित अनेक बाबींची कागदपत्रे अजित पवार स्वतःकडे ठेवत, असा आरोपही राऊतांनी केला. वाचा सविस्तर
