अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले. पण त्यामुळे ते खचले नाही. त्यांच्या जागी दुसरा एखादा व्यक्ती असता तर त्याने खचून जाऊन जीव दिला असता. पण अजित पवारांनी या आरोपांना आपल्या कामातून उत्तर दिले. त्यामुळेच त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांनीही त्यांचा सहकारी म्हणून स्वीकार केला, असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानपरिषदेत अजित पवारांवरील शोक प्रस्तावावर बोलताना व्यक्त केले. यावेळी त्यांनी राजकारण्यांना जीव नकोसा होईल, एवढे कुणावरही आरोप करू नका, असा सल्लाही दिला. उद्धव ठाकरे म्हणाले, विधिमंडळाचे यंदाचे हे पहिले अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आपण एका दिङ्मूढ अवस्थेत आहे. आजपर्यंत नेहमी सभागृहात दिसणारे व आपल्या सर्वांनाच आपले वाटणारे अजितदादा या सभागृहात किंवा या विधिमंडळात आज दिसत नाहीत. ही खंत आज आपल्या सर्वांच्या मनात आहे. माणसे येतात, माणसे जातात. माणसे असताना त्यांचे महत्त्व कधी कळत नाही. आणि ती नसतात त्यावेळी त्यांचे महत्त्व कळून काही उपयोग होत नसतो. अनेकजण अशी असतात की, जी जवळ असताना कळत नाहीत. पण काहीजण अशी असतात की, जी जवळ आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कळतात. अजित पवारांच्या दोन सकाळींचा दाखला ते पुढे म्हणाले, या विधिमंडळात अनेकांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अजितदादांच्या बरोबरीने झाली. साहजिकच आहे. विशेषतः माझ्या कारकिर्दीची सुरुवात ही अजितदादांच्या पक्षाच्या व त्यांच्या विचारसरणीच्या विरोधातील होती. आम्ही कधी एकत्र येऊ असे कधी ध्यानीमनीही वाटले नव्हते. अजितदादांच्या बाबतीत सांगायचे तर दोन सकाळ अशा होत्या की, त्यातील एक सकाळ ही महाराष्ट्राला त्यांच्या कृतीने धक्का देणारी होती. आणि दुसरी सकाळ ही महाराष्ट्राच्या अंतकरणाला चटका देणारी होती. आम्ही एकत्र आलो तेव्हा आमचे दोन्ही पक्ष राजकीयदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात होते. आम्ही अनपेक्षितपणे एकत्र आलो. एकत्र आल्यानंतर मनात नाही तरी एक अढी होती. एकतर मला प्रशासनाचा अनुभव नव्हता. अचानक या विधिमंडळात थेट मुख्यमंत्री म्हणून आलो. कामकाज कसे चालवायचे. त्याच्यात सरकारमधील सर्व सहकारी विरोधातील होते. यात अजित पवारांसारखा धक्का दिलेला सहकारी सोबत उपमुख्यमंत्री होता. हे सर्व नाही म्हटले तरी अनपेक्षित होते. पण जसेजसे काम सुरू झाले, तेव्हा मला कळले आणि ती भावना कायम माझ्या मनात राहील की, अजित पवारांसारखा एक उत्तम, दिलदार, विश्वासार्ह सहकारीच नव्हे तर मित्र मी गमावला, असे ते म्हणाले. अजित पवारांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, शासकीय व प्रशासकीय कामकाजात मला अजित पवारांचा पाठिंबा व खंबीर आधार होता. एखादी गोष्ट कळली नाही तर मी त्यांच्याशी बोलायचो. एवढा विषयाचा सखोल अभ्यास करणारा सहकारी किंवा लोकप्रतिनिधी अभावानेच आढळेल. त्यांचे वैशिष्ट म्हणजे ते 6 वेळा उपमुख्यमंत्री होते. पण विशेषतः एका मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करणे हे फार अवघड असते. काही जणांना आयुष्यभर वृक्षाच्या सावलीत राहावे लागते. वृक्षाच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो. पण काहीजण असे असतात जे त्या झाडाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. त्यातले एक अजित पवार होते. मी मुख्यमंत्री असताना दोन तीन वेळा बारामतीला गेलो होतो. शेवटच्या दौऱ्यात अजित पवार मुंबईपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत होते. तो काळ असा होता की, माझ्या तब्येतीची तक्रार होत होती. मला उभे राहणेही शक्य होत नव्हते. तेव्हा अजित पवार मुद्दामहून माझ्यासोबत आले होते. संपूर्ण रस्त्याने फिरताना मोठ्या उत्साहाने बारामतीचा केलेला कायापालट मला दाखवत होते. हे सर्व पाहणे अचंबित करणारे होते. अनेक गोष्टी मला ते उत्साहाने दाखवत होते. पण आता तीच बारामती त्यांच्या निधनामुळे पोरकी झाल्याचे चित्र दिसत आहे. हे त्यांचे वैशिष्ट्य होते, असे ते म्हणाले. लॉकडाऊनच्या काळातही अर्थचक्र सुरू ठेवले उद्धव ठाकरेंनी यावेळी लॉकडाऊनच्या काळातील आठवणीही सांगितल्या. ते म्हणाले, लॉकडाऊनमध्ये मंत्रालय बंद होते, तेव्हा अर्थचक्र थांबते काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. पण त्याहीवेळी या माणसाने (अजित पवार) समतोल साधला. एकही योजना बंद पडू न देता महाराष्ट्राचा राज्यशकट सुरू ठेवला. त्यांचेकडे एक वेगळेच कसब होते. पैशाचे स्त्रोत आटले असताना त्यांनी कर्जमाफी राबवून दाखवली. शिवभोजन योजनाही त्यांनी राबवून दाखवली. अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील. त्यावेळी मंत्रालय बंद होते, पण महाराष्ट्र बंद नव्हता. महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे चालू होते. त्यांनी हे कसे काय केले हे सुद्धा एक कसब आहे. जीव नकोसा वाटेल, एवढे आरोप नको उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, अजित पवारांची आठवण नेहमीच येत राहील. अलीकडच्या काळात अजित पवारांनी एक विधान केले होते. ते म्हणाले होते, ज्यांनी त्यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले, त्यांच्यासोबत आज ते सत्तेत आहेत. एखादी व्यक्ती जिवंत असताना आपण त्यांचा जीव नकोसा करतो. त्याला एवढे बदनाम करतो की त्याला जीव नकोसा होतो. मग तोच आपल्यातून गेल्यानंतर, तो आपलासा वाटू लागतो. मला असे वाटते की, या निमित्ताने आपण एक मर्यादा पाळली पाहिजे. कुणाला किती बदनाम करायचे, आयुष्यातून किती उठवायचे. तो ही माणूसच आहे. अजित पवारांचे एक वैशिष्ट म्हणजे, ते या आरोपामुळे कधी खचले नाही. एखादा दुसरा माणूस असता तर खचून गेला असता. दुर्दैवाने त्यांचे अपघातात निधन झाले. त्यांच्या जागी एखादा दुसरा खचलेला माणूस असता तर त्याने खरोखर जीव दिला असता. हे राजकारण किंवा संस्कृती आपल्या महाराष्ट्राची आहे. एखादा माणूस चुकू शकतो. पण तो चुकल्यानंतर तो खरेच चुकलाय का? याची खातरजमा करण्याची गरज असते. अजित पवारांनी कधीही याविषयी खंत व्यक्त केली नाही. त्यांनी या सर्व आरोपांना आपल्या कामातून उत्तर दिले. ते उत्तर असे दिले की, ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांनीच त्यांना सहकारी म्हणून स्वीकारले. आम्ही त्यांचा सहकारी म्हणून स्वीकार केला. अजित पवारांचा स्वभाव भारदस्त होता. त्यांचा आवाजही करडा होता. त्यामुळे अधिकारीही त्यांना वचकून असायचे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अजित पवारांच्या मनात पाप नसायचे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, अजित पवार अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे अडचणीत सापडले. पण बोलायचे तर बोलायचे. ते एखादे काम हाती घेतले तर ते बेलाशकपणे करायचे, बेधडकपणे करायचे. कारण, त्यांच्या मनात पाप नसायचे. मनात पाप नसेल तर आपण केलेल्या कृतीबद्दल मनात पश्चातापाची भावना नसते. अजित पवार अशा व्यक्तींच्या वर्गवारीत येत होते. त्यांनी अत्यंत अडचणीच्या वेळेला महाराष्ट्राचे अर्थखाते सांभाळले. मला कशाचाही अनुभव नसताना त्यांनी विश्वासू सहकारी म्हणून काम केले. अजित पवार करड्या शिस्तीचे होते. ते 11 वा. येणार म्हणजे येणार हे ठरलेले होते. आल्यानंतर ते विषय घेऊन यायचे. विषय झाल्यानंतर फार फापटपसारा न करता काम झाले की बरे सीएम साहेब मी निघतो, असे सांगत निरोप घ्यायचे. मंत्रिमंडळ बैठकीतही त्यांचा नेटकेपणा दिसून येत होता. त्यांच्या सर्व गोष्टी काटकोनात असायच्या. हीच सवय शिवसेनाप्रमुखांची होती. माणसाला एकदा शिस्त लागली की त्याचा कारभारही नीटनेटका शिस्तबद्धपणे होतो, असे ते म्हणाले. महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला ते पुढे म्हणाले, आज आपण सर्वजण दुःखात आहोत. आपला जवळचा माणूस आपल्यातून गेलाय. मी तर माझा चांगला मित्र गमवलाय. पण महाराष्ट्रानेही आपले एक उमदे नेतृत्व गमावले आहे. हे महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान आहे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राने ज्यांच्याकडून काही अपेक्षा केल्या होत्या, ते गमावलेत. यात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील व अजित पवार यांचा समावेश आहे. काही कळण्याच्या एका पातळीपर्यंत हे लोक जातात काय, महाराष्ट्र त्यांच्याकडून काही अपेक्षा करतो काय आणि ते अचानक आपल्यातून जातात काय हे न समजण्यासारखे आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. हे नुकसान, हा दुःखाचा डोंगर केवळ पवार कुटुंबीयांवर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर कोसळला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जीव नकोसा होईल एवढे आरोप नको:उद्धव ठाकरेंचा राजकारणात मर्यादा पाळण्याचा सल्ला; सभागृहात अजित पवारांवर भरभरून बोलले
-
By सुरेश पाचभाई
- February 23, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे बुलढण्यात जाहीर वाचन:संजय...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 23, 2026
राहुरी मतदानाच्या दिवशीच प्राजक्त तनपुरेंची स्पष्ट भूमिका:भाजप...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 23, 2026
सप्तशृंगी गडावर 22 किलो चांदीचा अपहार!:जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 23, 2026
मध्य रेल्वेचा यू-टर्न, अमित ठाकरेंच्या इशाऱ्याने निर्णय...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 23, 2026
