पुत्र मोह नडला:NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी शिवराज मोटेगावकरने पेपर फोडला; NTA अधिकारीही रडारवर, संसदीय समितीने प्रमुखांना बोलावले

नीटची प्रश्नपत्रिका फोडण्यात लातुरातील आरसीसी क्लासेसचा संचालक प्रा. शिवराज रघुनाथ मोटेगावकर याचा प्रमुख सहभाग असल्याचे समोर आले आहे. ‘नीट’ परीक्षा देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी शिवराज मोटेगावकरने पेपर फोडल्याचे समोर आले आहे. नीट परीक्षेच्या 10 दिवस आधीच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका होत्या. त्याच्या हस्तलिखित प्रती विद्यार्थी व इतरांना पुरवल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. परीक्षेनंतर त्याने पुरावे नष्ट केल्याने 17 मे रोजी रात्री त्याला पुण्यातून अटक करण्यात आली. 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. 15 मे रोजी 9 तास सीबीआयने मोटेगावकरची त्याच्या ओंकार रेसिडेन्सी येथील घरात चौकशी केली. त्यानंतर त्याला पुणे येथील सीबीआयच्या कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आले होते. तिथेही 10 तास चौकशी केल्यानंतर त्याला रविवारी रात्री अटक करण्यात आली.दरम्यान, मोटेगावकरवर नवी दिल्लीतील सीबीआय इओ शाखेत 12 मे 2026 रोजी एफआयआर दाखल झाला. मोटेगावरचा मुलगाही पास होऊ शकत नव्हता कोचिंगद्वारे कोट्यवधींची माया कमावलेल्या प्रा.मोटेगावकरला पुत्रमोह नडला. त्याचा मुलगा आर्यन यंदा 12 वीला होता. मुलास डॉक्टर करण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या मोटेगावकरने त्यामुळेच नीटची प्रश्नपत्रिका फोडली असल्याचा सीबीआयला संशय आहे. केवळ आपल्या पोरालाच नव्हे तर नांदेड येथील त्याच्या आरसीसी क्लासचा व्यवस्थापक असलेल्या विवेक पाटील याच्या मुलीलाही फायदा होण्यासाठी मोटेगावकरने पाटीलला पेपर पुरवल्याचा सीबीआयचा अंदाज आहे मोटेगावकर याच्या आरसीसी या क्लासच्या राज्यभर शाखा आहेत. आणखी त्याने आणखी कुणाला पेपर पुरवला आहे, त्याचा तपास सीबीआय करणार आहे. दरम्यान, मनीषा वाघमारे ही एनटीएचे दोन्ही तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांना पेपर विकणाऱ्या दलालांमधील दुवा होती. इतर राज्यांतील दलालांनाही पेपर विकला होता. पेपरफुटीचा मास्टरमाइंड प्रा. कुलकर्णी 7 वर्षांपासून करत होता पेपर सेट सीबीआय तपासात उघड झाले आहे की, पुण्याहून अटक करण्यात आलेला पेपरफुटीचा मास्टरमाइंड प्रा. पी. व्ही. कुलकर्णी 2019 पासून एनटीएचा पेपर सेटर होता. त्याची सुरुवात विषय तज्ज्ञ म्हणून झाली आणि नंतर तो वेटिंग टीमपर्यंत पोहोचला. तज्ज्ञ त्यांच्या विषयाचे प्रश्न तयार करतात, ज्यातून पेपरचे पाच सेट बनतात. वेटिंग टीम अंतिम दोन सेट निश्चित करते, जे प्रिंट होतात. मराठी अनुवादही कुलकर्णीच करत होता. त्याला ही दोन्ही कामे कुणी दिली, याचाही तपास सुरू आहे. साधारणपणे एक तज्ज्ञ एकच काम करतो. बडे मासे गळाला लागणार एनटीएचे दोन अधिकारी सीबीआयच्या रडारवर आहेत. या प्रकरणात महाराष्ट्रातून प्रा. कुलकर्णी, जीवशास्त्राची अधिव्याख्याता मनीषा मांढरे आणि ब्यूटिशियन मनीषा वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. एनटीए अधिकाऱ्यांचे मांढरे आणि वाघमारे यांच्याशी संपर्क असल्याचे पुरावे मिळाले आहेत. तपासात हेही समोर आले आहे. संसदीय समितीने एनटीए सुधारणा आणि नीट-यूजी पेपरफुटीप्रकरणी एनटीएचे अध्यक्ष प्रदीप जोशी आणि शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले आहे. राजदचे खासदार सुधाकर सिंह यांच्यासह इतरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून नीट-यूजी परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्याची मागणी केली आहे. तासिकावरील शिक्षक ते 1,500 कोटींचा मालक लातूर जिल्ह्यातील हनुमंतवाडी या खेड्यातून आलेल्या प्रा. शिवराज मोटेगावकरचा 25 वर्षांतील प्रवास थक्क करणारा आहे. आरसीसी क्लासच्या माध्यमातून राज्यभरात 40 हजार विद्यार्थी अन् त्याद्वारे सुमारे 1500 कोटींची उलाढाल आहे. आज राज्यातील आठ जिल्ह्यांत मोटेगावकरने साम्राज्य उभे केले आहे. त्यात, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अकोला, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील हनुमंतवाडी सारख्या एका खेड्यातून आलेल्या 47 वर्षांचा प्रा. शिवराज मोटेगावकरचा 25 वर्षातील प्रवास थक्क करणारा आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील एका कॉलेजवर तासिका तत्त्वावरील शिक्षक म्हणून सुरू झालेला त्याचा प्रवास गेल्या 25 वर्षात दीड हजार कोटींपेक्षा अधिकच्या मालमत्तेचा मालक झाला, अशी माहिती समोर आली आहे. 1999 साली शहरात जुन्या एमआयडीसीतील गाळ्यात 10 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या त्याच्या क्लासमध्ये सध्या 40 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. बीड, आंबाजोगाई, लातूर येथील काही महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले. याशिवाय लातूर विधानसभा मतदार संघातील अनेक निवडणुकांमध्ये प्रा. मोटेगावकर यांनी त्यांच्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन थेट सहभाग नोंदवलेला आहे. कॉंग्रेस पक्षाच्या अनेक कार्यक्रमांचे आयोजनही त्यांनीच केल्याचे सांगण्यात येते. राजकीय नेत्यांपुढे लोटांगण घालणारे त्यांचे काही व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आठ जिल्ह्यात साम्राज्य आज राज्यातील आठ जिल्ह्यात साम्राज्य उभे केले आहे. त्यात, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अकोला, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. आज घडीला मोटेगावकर यांचे साम्राज्य दीड हजार कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. संभाजीनगरात शाळा उघडणार होता मोटेगावकर मोटेगावकरने 2022 मध्ये शहरात क्लासची स्थापन केला. त्यात हजारो मुले डॉक्टर व इंजिनिअर होण्याचे स्वप्न घेऊन प्रवेश घेतला होता. त्याला अटक झाल्यावर क्लासेसला टाळे ठोकल्याचे दिसून आले. त्याने पद्मपुरा भागात आपले क्लासेस उभारले होते. आता सातारा परिसरात त्यांची शाळा उघडण्याची तयारी सुरू होती. यापूर्वी त्याचे लातूर येथे शाळा आहे. त्यानंतर आता मराठवाड्यातील मोठ्या शहरात देखील आपले प्रस्थ वाढवण्यासाठी त्याचा खटाटोप सुरू होता. मोटेगावकर सुरुवातीला एम सर नावाने प्रसिद्ध होता. तो गेल्या 6 महिन्यापासून सातारा परिसरात जमिनीचा शोध घेत होते. त्यानिमित्ताने पुन्हा हा विषय जमीन व्यावसायिकात पुन्हा एकदा चर्चेत होता. एमआयएम, भाजपने फासले काळे मोटेगावकरला अटक होताच एमआयएमचे नगरसेवक कुणाल खरात यांच्या नेतृत्वात काळे फासले. त्यानंतर वेदांत नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कुणाल खरात, समी अली खान यांना ताब्यात घेतले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यापाठोपाठ तासाभरात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यानी क्लासेस बाहेरील बॅनरला काळे फासले. त्यावेळी एसीपी सागर देशमुख यांनी क्लासेसला भेट देत पोलिस बांदोबस्त तैनात केला. महाराष्ट्राची बदनामी झाल्याने नांदेडात शिवराज मोटेगावकरच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले, तर लातुरात आरसीसीच्या फलकावर शाईफेक करण्यात आली. सीबीआयने दिलेली मोटेगावकरच्या अटकेची 4 कारणे 1. निवासस्थानी मिळाला पेपर नीटची परीक्षा 3 मे रोजी होती. मात्र 23 एप्रिल रोजीच प्रा. मोटेगावकरला प्रश्नपत्रिका मिळाली. ती त्याच्या मोबाइलमध्ये होती. 14 मे रोजी लातुरातील घर झडतीत सीबीआयला तो मोबाइल सापडला. 2. पुरावे नष्ट केले मोटेगावकरने केवळ पेपर लीक केला नाही, तर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. नीट परीक्षेनंतर मूळ लीक झालेली प्रश्नपत्रिका व कागदपत्रे जाळून टाकली किंवा नष्ट केली. 3. नावे उघड करण्यास नकार लीक झालेली प्रश्नपत्रिका विवेक पाटील व इतरांना मोटेगावकरने पाठवली होती. मात्र, चौकशीदरम्यान त्याने ज्यांना पेपर दिला त्यांची नावे सांगण्यास स्पष्ट नकार दिला. 4. माहिती लपवली सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मोटेगावकर हा एका मोठ्या संघटित टोळीचा सक्रिय सदस्य आहे. ही टोळी नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका लीक करणे आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून मोठ्या प्रमाणावर अवैध माया जमवण्याचे काम करत होती. मोटेगावकर हा एका मोठ्या संघटित पेपरलीक टोळीचा सक्रिय सदस्य : सीबीआयचा ठपका सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मोटेगावकर हा एका मोठ्या संघटित टोळीचा सक्रिय सदस्य आहे. ही टोळी नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका लीक करणे आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून मोठ्या प्रमाणावर अवैध माया जमवण्याचे काम करत होती. लीक झालेली प्रश्नपत्रिका विवेक पाटील व इतरांना मोटेगावकरने पाठवली होती. मात्र, चौकशीदरम्यान त्याने ज्यांना पेपर दिला त्यांची नावे सांगण्यास स्पष्ट नकार दिला.

Leave a Comment

error: Content is protected !!