देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना अटक केली आहे. स्वतःच्या मुलाला परीक्षेत फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी आरोपी शिवराज मोटेगावकरकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा गंभीर आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. लातूरहून चौकशीसाठी पुण्यात आणल्यानंतर सीबीआयने अनेक तास कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या पालकाला झालेली ही पहिली अटक असल्याने संपूर्ण तपासाला नवे वळण मिळाले आहे. डॉ. मनोज शिरुरे हे लातूरमधील जुना औसा रोड परिसरातील सिद्धिविनायक बाल रुग्णालयाचे संचालक आहेत. सीबीआयचे पथक रविवारीपासून लातूरमध्ये तळ ठोकून असून मोटेगावकरच्या संपर्कातील सर्व संशयितांची चौकशी सुरू आहे. शिरुरे यांच्या रुग्णालयात पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी साडेचार तास तपास केला. या दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल फोन आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात डॉ. शिरुरे यांचे शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. मागील काही वर्षांपासून ते या नेटवर्कच्या संपर्कात असल्याचा संशयही सीबीआयला आहे. सीबीआयच्या तपासातून पेपरफुटीचा संपूर्ण कट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रचण्यात आल्याचे समोर आले आहे. मोटेगावकरने आपल्या क्लासमधील पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांना एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलमध्ये सहभागी करून घेतल्याचा आरोप आहे. कुलकर्णी यांच्याकडे केमिस्ट्री तर मनीषा मांढरे यांच्याकडे बायोलॉजी विषयाची जबाबदारी होती. प्रश्नपत्रिका तयार करतानाच त्यांनी प्रश्न पाठ केले आणि नंतर ते हाताने लिहून मोटेगावकरकडे पोहोचवले. त्यानंतर मोटेगावकरने हे सर्व प्रश्न पीडीएफ स्वरूपात मोबाईलमध्ये साठवून ठेवले होते. तपासात पुढे असेही स्पष्ट झाले की, हे प्रश्न आणि उत्तरे पैशांच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जात होते. डॉ. मनोज शिरुरे यांनी स्वतःच्या मुलासाठी ही प्रश्नपत्रिका घेतल्याचा आरोप असल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. सीबीआयच्या हाती आलेल्या डिजिटल पुराव्यांमुळे या रॅकेटमध्ये अनेक जण सामील असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोटेगावकरने परीक्षा झाल्यानंतर मोबाईलमधील सर्व माहिती डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सीबीआयने तांत्रिक मदतीने तो डेटा पुन्हा मिळवला आणि त्यानंतर संपूर्ण जाळे उघडकीस आले. आणखी काही पालकांवर कारवाई होण्याची शक्यता 3 मे रोजी नीट परीक्षा पार पडली होती. त्याआधीच प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याचा संशय तपास यंत्रणांना होता. आता सीबीआयच्या कारवाईनंतर पेपरफुटीच्या रॅकेटचा विस्तार किती मोठा आहे, याबाबत अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. मोटेगावकर, कुलकर्णी, मनीषा मांढरे आणि डॉ. मनोज शिरुरे यांच्यातील संपर्क, पैशांची देवाणघेवाण आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रश्नपत्रिका याबाबत तपास अधिक वेगाने सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींवर कारवाई होण्याची शक्यता सीबीआयकडून व्यक्त केली जात आहे. अंबाजोगाई येथील दोन विद्यार्थ्यांची चौकशी नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. अंबाजोगाई येथील दोन विद्यार्थ्यांची सीबीआयकडून चौकशी सुरू असून, तपासासाठी त्यांच्या मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले आहेत. या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि डिजिटल व्यवहारांची तपासणी करून पेपरफुटी प्रकरणातील आणखी धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मांढरे, वाघमारे आणि लोखंडे या तिघांना पुण्यात आणण्यात आले दरम्यान, या प्रकरणातील महत्त्वाच्या संशयितांमध्ये असलेल्या मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे आणि धनंजय लोखंडे या तिघांना पुण्यात आणण्यात आले आहे. पुण्यातील सीबीआय कार्यालयात तिघांची समोरासमोर बसवून कसून चौकशी केली जात आहे. तपास यंत्रणा त्यांच्याकडून पेपरफुटीच्या नेटवर्कबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पालकांनाही चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात याचबरोबर काही पालकांनाही चौकशीसाठी पुणे सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आले आहे. विद्यार्थी, पालक आणि संशयित आरोपी यांच्यातील संपर्क, आर्थिक व्यवहार आणि पेपर मिळवण्याची साखळी याबाबत सीबीआय तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असल्याने तपास अधिकच गडद होत चालला आहे. NEET पेपर ₹5 ते 50 लाखांना विकला, कोरे चेक घेतले आरोपी कोचिंग संचालक 8 एकरमध्ये शाळा-महाविद्यालय उघडणार होता नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय चौकशीत असे समोर आले आहे की, टोळीने पालकांची आर्थिक स्थिती पाहून 5 ते 50 लाख रुपयांपर्यंत पेपर विकला. उर्वरित रकमेच्या हमीसाठी कोरे चेक आणि विद्यार्थ्यांची कागदपत्रे ठेवली जात होती. तसेच, चौकशीत हे देखील समोर आले आहे की, आरोपी महाराष्ट्रातील कोचिंग संचालक 8 एकर जमिनीवर शाळा-महाविद्यालय उघडण्याच्या तयारीत होता. सीबीआय चौकशीनुसार, पेपरची कोणतीही निश्चित किंमत नव्हती. प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहून सौदा ठरवला जात होता. पूर्ण रक्कम आधी घेतली जात नव्हती. फक्त टोकन मनी घेतली जात होती. करार असा होता की, उत्तरपत्रिका (आन्सर-की) आल्यानंतर, दिलेली ‘प्रश्नपेढी’ (क्वेश्चन बँक) मूळ पेपरशी जुळते हे सिद्ध झाल्यास, उर्वरित रक्कम घेतली जाईल. मात्र, परीक्षेदरम्यान अनेक पालकांनी पैसे देण्यास नकार देण्यास सुरुवात केली. त्यांचे म्हणणे होते की, भौतिकशास्त्राचे (फिजिक्स) काही प्रश्न जुळत नाहीत. काहींनी अर्धी रक्कम दिली आणि उर्वरित रक्कम निकालानंतर देण्याचे सांगितले. उघडकीस आल्यावरही टोळी पैसे वसूल करत होती आयबीकडून माहिती मिळाल्यानंतर, 8 मे च्या रात्री राजस्थान एसओजीने कारवाई सुरू केली. त्यावेळीही टोळी खरेदीदारांकडून पैसे वसूल करण्यात गुंतली होती. सीकरमध्ये पेपर खरेदी करणाऱ्या एका विद्यार्थ्याची चौकशी करत असतानाच, त्याला पैसे मागण्यासाठी दलालाचा फोन आला. सीबीआयने पेपर खरेदी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी छापे टाकले, जिथे हेच समोर आले. लातूरमध्ये 8 एकरमध्ये शाळा-महाविद्यालय उभारण्याची तयारी या प्रकरणात अटक करण्यात आलेला महाराष्ट्रातील लातूर येथील आरसीसी कोचिंगचा संचालक शिवराज मोटेगावकर उर्फ ‘एम सर’ लातूरच्या खोपेगाव शिवारात 8 एकर जमिनीवर शाळा-महाविद्यालय सुरू करण्याच्या तयारीत होता. तेथे बहुमजली इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू होते. सीबीआय त्याच्या निधीचे स्रोत, जमीन खरेदी आणि आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करत आहे. एजन्सीने त्याच्या पत्नी आणि मुलाचीही चौकशी केली आहे. 5 आरोपी न्यायालयीन कोठडीत, एकाची रिमांड वाढवली दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टाने आरोपी मांगीलाल खटीक, विकास बिवाल, दिनेश बिवाल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले. शुभम खैरनारची सीबीआय रिमांड 5 दिवसांनी वाढवण्यात आली. कोर्टाने मनीषा मांढरे आणि मोटेगावकर यांच्या स्वाक्षरीचे नमुने घेण्याचीही परवानगी दिली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी नीटच्या पुन्हा होणाऱ्या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी बनावट टेलिग्राम चॅनेल आणि सोशल मीडियावर पेपरफुटीशी संबंधित दिशाभूल करणारे दावे पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले. आतापर्यंत 10 जणांना अटक, सर्वाधिक 6 महाराष्ट्रातून 21 जून रोजी नीटची फेरपरीक्षा होईल NEET-UG परीक्षा 3 मे रोजी देशातील 551 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. यात सुमारे 23 लाख उमेदवार सहभागी झाले होते. NTA नुसार, 7 मे रोजी संध्याकाळी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची माहिती मिळाली होती. यानंतर हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आले. 12 मे रोजी परीक्षा रद्द करण्यात आली आणि फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.