बातमी ऐका (Marathi Voice Reader)
लातूर जिल्ह्याच्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी लक्ष्मीपूजेच्या नावाखाली अघोरी विधी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कथित विधीसाठी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वापर करण्याची तयारी करण्यात आल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी १५ जणांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ मधील कलम ३(३) आणि पोक्सो कायद्यातील कलम १२ सह १८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर-उदगीर मार्गावरील करडखेल पाटीजवळ, उदगीरपासून पश्चिमेला सुमारे २० किलोमीटर अंतरावर हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपींनी संगनमत करून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी लक्ष्मीपूजेचा विधी आयोजित केल्याचा आरोप आहे. या विधीसाठी आंध्र प्रदेशातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला आणण्यात आले होते. संबंधित मुलीचा कथित अघोरी पूजेसाठी वापर करण्याची तयारी असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी कुंडलीक देवराव रूपनर (रा. तितरवणी, जि. बीड), सचिन साहेबराव भोंगळे (रा. धानोरा वैद्य, जि. अकोला), अनिकेत सुभाष राठोड (रा. वडी, जि. परभणी), समीर टिनघरे (रा. पुणे), लक्ष्मण विठ्ठल करंजी, सनेश सुकुमार पनिके, दुर्गाप्रसाद मल्लेश ईरकला, श्रीनिवास विरख्या चिलमुला, बालाजी रघुनाथराव बिरादार, चंद्रया सुंदरराव कारम, अनंतराव गंगाराम खुनिकार, राजेश मोगली ईपन्नापल्ली, सुनील कल्याण डेंगले, राजू सेवु पवार आणि बालाजी अशा १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील काही आरोपी तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील विविध भागातील असल्याचे पोलिस नोंदीत आहे.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर उदगीर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत तपास सुरू केला आहे. या कथित अघोरी विधीमागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच आरोपींची भूमिका काय होती, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणामुळे उदगीर परिसरात अंधश्रद्धा आणि अघोरी प्रथांविरोधात पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, अल्पवयीन मुलीचा अशा प्रकारे वापर करण्याचा कथित प्रयत्न झाल्याने या घटनेची गंभीर दखल घेतली जात आहे.