राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता:रेल्वे भरती 2008 च्या आंदोलन प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाचा निकाल; चिथावणीखोर भाषण केल्याचा होता आरोप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 2008 साली रेल्वे भरतीच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. तसेच राज ठाकरे यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र या प्रकरणातून राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या संदर्भात वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरावे आढळून न आल्याने या प्रकरणातील सर्वच आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. तसेच सादर करण्यात आलेल्या सीडीला काडीचीही किंमत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचे देखील पुरावे सरकारी पक्षाला सादर करता आले नाहीत. तसेच परप्रांतीय विद्यार्थ्यांना मारहाण करणारे मनसैनिक होते हे देखील सिद्ध करता आले नाही. माझा या गुन्ह्याशी संबंध नाही- राज ठाकरे मागील सुनावणीच्या वेळी (13 मे) राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी देखील राज ठाकरे यांनी माझ्यावर लावण्यात आलेले आरोप मान्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. ‘माझा या गुन्ह्याशी संबंध नाही’ असे त्यांनी न्यायालयात म्हटले होते. त्यानंतर आजच्या निकालाच्या दिवशी राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी अनेक कार्यकर्ते तसेच अविनाश जाधव देखील उपस्थित होते. उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केल्याचा होता आरोप 2008 मध्ये कल्याण रेल्वे स्थानकावर पार पडलेल्या रेल्वे भरतीदरम्यान, ‘मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या’ असा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण करून रेल्वेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान केल्याचा आरोप होता. या आंदोलनाद्वारे परप्रांतीयांना लक्ष्य करून हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवत, या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2008 च्या ऑक्टोबर महिन्यात नेमके काय घडले होते? 2008 च्या ऑक्टोबर महिन्यात देशभरात रेल्वे भरतीची चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. मुंबई केंद्रावर परीक्षा द्यायला आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. त्यातच राज्यातील अनेक केंद्रांवर मराठी तरुणांना तिकीट न मिळाल्याचे प्रकरण समोर आले होते तसेच मराठी तरुणांना प्रवेश देखील नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. वादाची ठिणगी पडताच आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी थेट परीक्षा केंद्रांमध्ये घुसून उत्तर भारतीय परीक्षार्थींना मारहाण केली आणि केंद्रांची मोठी तोडफोड केली. या घटनेनंतर हिंसक आंदोलनाचे हे लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले, ज्यामध्ये राज्यभरात ठिकठिकाणी उत्तर भारतीयांना लक्ष्य करून मारहाण करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक बसेसचीही तोडफोड करण्यात आली. पहाटे पावणे तीन वाजता राज ठाकरेंना अटक या वेळी राज ठाकरे कोकण दौऱ्यावर होते. तसेच चिपळूण येथे झालेल्या सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले होते, सरकारने मला खुशाल अटक करू देत. माझ्या अटकेनंतर सारा महाराष्ट्र पटेल आणि जे काही होईल त्याला सरकार जबाबदार असेल, असे म्हणाले होते. तसेच त्यानंतर रात्रीच कोर्टाने राज ठाकरेंना अटक करण्याचे वॉरंट जारी केले. 21 ऑक्टोबरच्या पहाटेच साधारण पावणे तीन वाजता मुंबई पोलिसांनी रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहातून राज ठाकरेंना ताब्यात घेतले होते. अटक आणि जामीन रात्रीच्या वेळी अटकेची बातमी पसरताच संपूर्ण महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मनसे कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ आणि बसेसची तोडफोड केल्यामुळे राज्यात अघोषित बंदसारखी परिस्थिती निर्माण झाली. या तणावपूर्ण वातावरणात मुंबई पोलिसांनी कडक सुरक्षा बंदोबस्तात राज ठाकरे यांना वांद्रे न्यायालयात हजर केले. तेथे त्यांना जामीन मंजूर झाला असला तरी, पोलिसांनी त्यांना दुसऱ्या एका गुन्ह्यात तातडीने पुन्हा अटक केली, ज्यामुळे राज यांना ती रात्र मानपाडा पोलिस ठाण्यात काढावी लागली. अटकेच्या निषेधार्थ मनसैनिकांचे ठिकठिकाणी निदर्शने प्रक्षोभक भाषणे करणे, कार्यकर्त्यांकडून उत्तर भारतीयांना झालेली मारहाण आणि राज्यभरातील तोडफोडीला जबाबदार असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. अटकेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यभरात सुमारे 20 हजार पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता, तरीही अनेक ठिकाणी वाहने आणि दुकानांची तोडफोड तसेच जाळपोळीच्या घटना घडल्या. अखेर, दुसऱ्या दिवशी राज ठाकरे यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, मात्र त्यानंतर लगेचच त्यांना जामीनही मंजूर झाला.

Leave a Comment

error: Content is protected !!