अपघातमुक्त मारेगावच्या दिशेने पाऊल; महिला सुरक्षेसह जबाबदार वाहनचालक होण्याचे आवाहन
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव, दि. १४ जुलै वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी मारेगाव पोलीस स्टेशनने रस्ते सुरक्षा जनजागृतीचा प्रभावी उपक्रम राबवत ऑटोचालक व ऑटोमालकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आणि जबाबदार वाहनचालक म्हणून सामाजिक कर्तव्य पार पाडण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित ऑटोचालकांना वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे, वैध वाहन परवाना व आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवणे, वाहतूक सिग्नल व रस्ते चिन्हांचे पालन करणे, मद्यपान करून वाहन न चालविणे तसेच सुरक्षित वाहनचालक म्हणून आदर्श निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले. विशेषतः महिला व मुलींच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत त्यांच्याशी सन्मानपूर्वक व संवेदनशीलतेने वागण्याचे निर्देशही देण्यात आले.
यावेळी दाणेदार सागर दानडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “वाहतूक नियमांचे पालन ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन अनेकांचे अमूल्य जीव वाचू शकतात.”या जनजागृती उपक्रमाला ऑटोचालक व मालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वाहतूक नियमांचे प्रामाणिकपणे पालन करण्याची ग्वाही दिली.
रस्ते सुरक्षा आणि अपघातमुक्त समाज घडविण्याच्या दिशेने मारेगाव पोलिसांनी उचललेले हे पाऊल सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरत असून परिसरात या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.