सोयाबीन बियाण्यांची उगवण फेल

मारेगावात ७ तक्रारी, कृषी विभागाची संयुक्त चौकशी सुरू

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव : तालुक्यात खरिपाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीन बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत गंभीर प्रकार समोर आला आहे. नामांकित कंपन्यांच्या बियाण्यांची उगवण अत्यंत कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

याप्रकरणी मारेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आतापर्यंत सात अधिकृत तक्रारी दाखल झाल्या असून, कृषी विभागाने संयुक्त पाहणी करून चौकशी सुरू केली आहे.शेतकऱ्यांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेत तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय कृषी अधिकारी (पांढरकवडा) चंदन निघोट यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभागाचे पथक आणि कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर यांनी बाधित शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी तालुका कृषी अधिकारी दीपाली खवले, कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) सुरेश बुटले, मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी व सहायक कृषी अधिकारी उपस्थित होते.संयुक्त पाहणीदरम्यान शेतात प्रायोगिक तपासणी करण्यात आली. त्यामध्ये संबंधित बियाण्यांची उगवणक्षमता अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले.

प्राथमिक निरीक्षणात बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका व्यक्त करण्यात आली असून, त्यानुसार संयुक्त पंचनामा करण्यात आला आहे.कृषी विभागाने बाधित शेतकऱ्यांना संबंधित बियाणे कंपन्यांकडून योग्य ती आर्थिक नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.दरम्यान, हजारो रुपये खर्च करूनही अपेक्षित उगवण न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

निकृष्ट किंवा दोषपूर्ण बियाण्यांची विक्री करणाऱ्या संबंधित कंपन्यांवर फौजदारी कारवाई होणार का, तसेच शेतकऱ्यांना पेरणीचा खर्च व नुकसानभरपाई वेळेत मिळणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

चौकट : कृषी विभागाचे म्हणणे”शेतकऱ्यांचे झालेले नुकसान गंभीर असून, बाधित शेतकऱ्यांना संबंधित कंपन्यांकडून योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, यासाठी कृषी विभाग कटिबद्ध आहे. संयुक्त अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”– कृषी विभाग, मारेगाव

Leave a Comment

error: Content is protected !!