खड्ड्यांमुळे शाळेची बससेवा बंद; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
सात दिवसांत काम सुरू करा, अन्यथा तहसील कार्यालयावर धडक आंदोलन
सुरेश पाचभाई | मारेगाव
मारेगाव : खड्ड्यांत रस्ता की रस्त्यात खड्डे? अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत चनोडा ग्रामस्थांनी चोपन–चनोडा–माडर्डी मार्गाच्या दुरवस्थेविरोधात प्रशासनाविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे, उखडलेले डांबर आणि चिखलामुळे हा मार्ग वाहनचालकांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या रस्त्याच्या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसला आहे. खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांची शाळेची बससेवा बंद झाल्याने त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, पालकांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे. रुग्ण, वृद्ध, शेतकरी, महिला तसेच दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे.
अपघाताची वाट पाहताय का?
रस्त्याची दुरवस्था वर्षानुवर्षे कायम असताना प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. “एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल उपस्थित करत तातडीने रस्त्याची पाहणी करून धोकादायक खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली आहे.
सात दिवसांचा अल्टिमेटम!
ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला थेट सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली नाही, तर पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या वतीने मारेगाव तहसील कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
चनोडा–चोपन–माडर्डी मार्गावरील धोकादायक खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी.
बंद झालेली विद्यार्थ्यांची शाळेची बससेवा त्वरित पूर्ववत करावी.
रस्त्याचे कायमस्वरूपी दर्जेदार डांबरीकरण अथवा सिमेंट काँक्रिटीकरण करावे.
रस्त्याची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी.
प्रशासन आता तरी जागे होणार?
ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आता या गंभीर प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहतो, याकडे चनोडावासीयांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या संदर्भातील निवेदनाच्या प्रती आमदार संजयभाऊ देरकर, उपविभागीय अधिकारी वणी, तहसीलदार मारेगाव, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे संबंधित अधिकारी तसेच मारेगाव पोलिस ठाणे यांना देण्यात आल्या आहेत.
निवेदनावर विठ्ठल महाकुलकर, आनंद काकडे, संजय बोढे, रविकांत पाचभाई, देवानंद काकडे, अशोक सातपुते, अशोक सातपुजे, रमेश दातारकर, सुरेश दातारकर, कुणाल वाटेकर, लोकेश काकडे, उद्धव परचाके, मेधेश्याम वाटेकर, मोरेश्वर काकडे यांच्यासह अनेक चनोडा ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.