छोट्याशा गावात चिमुकल्यांचा मोठा जल्लोष; सहभागी प्रत्येक बालकाचा गौरव
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील सिंदी येथे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीचे जतन आणि नव्या पिढीला आपल्या मातीतल्या सणांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने सिंदी येथे तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाजन प्रतिष्ठान, सिंदी यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाला चिमुकल्यांसह पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छोट्याशा गावात करण्यात आलेल्या या नियोजनबद्ध आयोजनामुळे दिवसभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

तान्हा पोळ्यानिमित्त चिमुकल्यांनी आकर्षक पद्धतीने सजविलेल्या बैलजोड्या आणल्या होत्या. पारंपरिक वेशभूषा, रंगीबेरंगी सजावट, बैलजोड्यांची आकर्षक मांडणी आणि बालकांचा उत्साह यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. आपल्या सजविलेल्या बैलजोडीसह सहभागी झालेल्या प्रत्येक बालकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
या उपक्रमात १४ पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली होती. ट्रॉली बॅग, पेपर पॅड, टिफिन बॉक्स, स्टडी टेबल, स्कूल बॅग, बॅट-बॉल तसेच शैक्षणिक साहित्य अशा विविध स्वरूपातील बक्षिसांचा यामध्ये समावेश होता.
बैलजोड्यांचे परीक्षण अशोक कोरडे व डॉ. प्रशांत पाटील यांनी केले. सजावट, आकर्षकता, संदेश, पारंपरिक पद्धत आणि एकूण सादरीकरण या निकषांच्या आधारे परीक्षण करण्यात आले. त्यातून सात उत्कृष्ट सहभागींची बक्षिसांसाठी निवड करण्यात आली.
मात्र हा उपक्रम केवळ स्पर्धेपुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक बालकाला प्रोत्साहन मिळावे, या हेतूने उर्वरित सात बक्षिसे ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून देण्यात आली. चिठ्ठीत नाव निघाल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला.
विशेष म्हणजे, केवळ विजेत्यांनाच बक्षिसे न देता सर्व सहभागी मुलांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. आयोजकांच्या या उपक्रमाचे उपस्थित पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले. ‘जिंकणाऱ्यालाच नव्हे, तर सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला प्रोत्साहन’ देण्याची भूमिका या आयोजनातून अधोरेखित झाली.

गावातील पारंपरिक सण-उत्सवांमधून मुलांना ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी, त्यांच्यात सहभागाची भावना वाढावी आणि आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने करण्यात आलेला हा उपक्रम विशेष ठरला. सिंदीसारख्या छोट्याशा गावात चिमुकल्यांच्या सहभागाने रंगलेला तान्हा पोळा ग्रामस्थांच्या स्मरणात राहणारा ठरला.
या आयोजनासाठी लहू जिवतोडे, साहिल डाहुले, अनिकेत गाडगे, स्वप्नील देवाळकर, राकेश लेडांगे, प्रणय बुरडकर, शिवा टेकाम, राजू गायकवाड, चंद्रशेखर थेरे, चंद्रशेखर ढवस, राहुल पोतराजे, बंटी ढवस आदींनी परिश्रम घेतले.