बातमी ऐका (Marathi Voice Reader)
छत्रपती संभाजीनगर : गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते. त्यामुळे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणरायाचे स्मरण करून कार्य निर्विघ्न पार पडावे, अशी प्रार्थना केली जाते. दरवर्षी गणेशोत्सवातही बाप्पाचा मोठ्या भक्तिभावाने पाहुणचार केला जातो. या काळात गणरायाला त्यांच्या आवडीचे विविध पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. मात्र, या सर्वांमध्ये एक गोष्ट विशेष महत्त्वाची मानली जाते आणि ती म्हणजे दुर्वा. दुर्वांशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण मानली जाते. पण गणपतीला दुर्वाच का वाहिल्या जातात? यामागे नेमकी काय कथा आहे? याबाबत श्रीरामजी धानोरकर गुरुजी यांनी माहिती दिली आहे.
गणपतीला दुर्वा अर्पण करण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. गुरुजींनी दिलेल्या माहितीनुसार, अनलासूर नावाचा एक राक्षस होता. त्याच्या अत्याचारामुळे देव, ऋषी आणि सामान्य नागरिकही त्रस्त झाले होते. अनलासूराच्या त्रासातून मुक्ती मिळावी यासाठी सर्व देव आणि ऋषींनी गणपतीकडे धाव घेतली आणि आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली.
बाप्पाची कृपा! सगळं मनासारखं होईल, फक्त मंगळवारी या चुका नको, जाणून घ्या मेष ते मीन आजचं राशीभविष्य
गणपतीचे स्वरूप लहान असले तरी त्यांची शक्ती आणि कीर्ती मोठी होती. बाप्पाने अनलासुराशी थेट युद्ध केले. युद्धादरम्यान अनलासुराने गणपतीला गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र, गणरायाने रुद्ररूप धारण करत अनलासुराचा पराभव केला आणि त्याला जिवंत गिळून टाकले. अनलासुराला गिळल्यानंतर मात्र गणपतीच्या शरीरात प्रचंड दाह निर्माण झाला. तो कमी करण्यासाठी ऋषींनी अनेक उपाय केले, विविध उपचार केले; मात्र बाप्पाच्या शरीराचा दाह काही केल्या शांत होत नव्हता. अखेर ऋषींनी गणपतीच्या मस्तकावर दुर्वा वाहिल्या. दुर्वांचा स्पर्श होताच गणरायाच्या शरीराचा दाह शांत झाला आणि त्यांना आराम मिळाला.
पुढे प्रसन्न झालेल्या गणपतीने देव आणि ऋषींना आशीर्वाद देत सांगितले की, जो कोणी भक्तिभावाने मला दुर्वा अर्पण करेल, त्याच्या मनोकामना पूर्ण होतील. तेव्हापासून गणपतीच्या पूजेत दुर्वांना विशेष स्थान मिळाले आणि बाप्पाला दुर्वा वाहण्याची परंपरा सुरू झाली, अशी पौराणिक मान्यता आहे.
गणपतीला साधारणपणे 21 दुर्वांची जुडी अर्पण केली जाते. गावखेड्यांमध्ये सहज आढळणाऱ्या ‘हरळी’ किंवा ‘हरळ’ नावाच्या गवताला दुर्वा म्हटले जाते. त्यामुळे गणेशपूजेत दिसणाऱ्या या साध्या हिरव्या गवतामागेही एक प्राचीन पौराणिक कथा आणि श्रद्धा जोडलेली आहे, असे धानोरकर गुरुजी सांगतात.