बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर : जिद्द, चिकाटी आणि योग्य माहिती मिळाली की ग्रामीण भागातील महिलाही यशाचे शिखर गाठू शकतात. हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील तांदुळवाडी येथील उर्मिला निंबाळकर यांनी सिद्ध करून दाखवले आहे. घरात शांत बसून राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेत त्यांनी देशी कुक्कुटपालनात पाऊल ठेवले आणि आज त्या एक यशस्वी महिला उद्योजक म्हणून नावारूपाला आल्या आहेत.
उर्मिला निंबाळकर यांनी अवघ्या 700 कोंबड्यांपासून आणि एका छोट्या शेडमधून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांनी कावेरी जातीच्या कोंबड्यांचे पालन केले. मात्र, बाजारपेठेत आणि ग्राहकांमध्ये अस्सल देशी कोंबड्यांना असणारी वाढती मागणी ओळखून त्यांनी लगेचच देशी कुक्कुटपालनाकडे आपला मोर्चा वळवला.
सुरुवातीचा हा छोटासा व्यवसाय झाडासारखा बहरत गेला असून, आज त्यांच्याकडे 5 मोठे पोल्ट्री शेड उभारण्यात आले आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीनुसार, त्या एक दिवसाचे पिल्लू आणून सुमारे 40 ते 45 दिवस त्यांची अत्यंत काळजीपूर्वक संगोपन करतात. बदलत्या हवामानानुसार पक्षांना आजार होऊ नये म्हणून योग्य वेळी लसीकरण करण्यावर त्यांचा भर असतो.
या व्यवसायाला मोठे स्वरूप देण्यात सोशल मीडियाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उर्मिला यांनी सोशल मीडियाचा कल्पकतेने वापर करत थेट ग्राहकांपर्यंत आणि व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची साखळी निर्माण केली. आज केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे, तर लातूर, धाराशिव, बीड, पुणे, बारामती आणि शेजारील कर्नाटक राज्यातही त्यांच्या फार्ममधील कोंबड्यांना मोठी मागणी आहे.
सध्या त्या अवघ्या 45 दिवसांच्या एका चक्रात तब्बल 20 हजार पक्षांची यशस्वी विक्री करतात. या माध्यमातून त्या महिन्याला दोन ते तीन लाख रुपयांची मोठी आर्थिक उलाढाल करत आहेत. उर्मिला निंबाळकर यांचा हा प्रवास ग्रामीण भागातील इतर महिलांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.