तहानलेल्या शहराच्या घशाची कोरड पुन्हा या उन्हाळ्यातही कायम राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. नवीन 2500 मिमीच्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी या उन्हाळ्यातही शहराला मिळणार नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे या उन्हाळ्यातही नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागणार असून नागरिकांना पाण्यासाठी खेटे मारावे लागणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकांच्या आखाड्यात केवळ पाणी या एकाच मुद्द्यावर मते मागणाऱ्या राजकीय नेत्यांची सर्व आश्वासने आता कागदावरच उरली आहेत. एप्रिल 2024 ची लोकसभा असो किंवा नोव्हेंबर 2024 ची विधानसभा, प्रत्येक वेळी “पुढच्या दोन महिन्यांत पाणी देऊ” असे गाजर मतदारांना दाखवण्यात आले. अगदी डिसेंबर 2025 मध्ये 200 एमएलडी योजनेची चाचणी सुरू होईल, असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले होते. मात्र, फेब्रुवारी 2026 उजाडला तरी शहराच्या नळाला नव्या योजनेचा थेंबही लागलेला नाही. प्रशासकीय दिरंगाई आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे यंदाचा उन्हाळाही संभाजीनगरकरांना टँकरच्या भरवशावर राहावे लागणार आहे. हायड्रो टेस्टिंगला सूट जायकवाडी ते नक्षत्रवाडी एकूण 38 किमी 2500 मिमीची पाइपलाइन आहे. यात बटरफ्लाय वॉल आणि जोडण्या आहेत. पूर्वी या पाइपलाइनची हायड्रो टेस्टिंग घेण्याचे ठरले होते. आता मात्र त्यासाठी लागणारा वेळ आणि पाण्याचे प्रमाण लक्षात घेता अल्ट्रा व्हायलेट टेस्ट घेऊन पाणी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष ती कंत्राटदाराला चालवून दाखवायची आहे, असे निविदेत नमूद आहे. जॅकवेल जायकवाडी धरणात एक किलोमीटर आत नऊ लिफ्टचे जवळपास तीनपेक्षा जास्त मजले उंच जॅकवेल तयार झाले आहे. पंप हाऊसचा पहिल्या टप्प्यातील स्लॅब पूर्ण झाला आहे. पुलावरचा फक्त 75 फुटांचा एक पाइप टाकण्याचे काम बाकी आहे. फेब्रुवारी महिन्यात हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. मुख्य जलवाहिनी एकूण 38.4 किमी जलवाहिनी. 38.3 किलोमीटरचे काम पूर्ण. जॅकवेलवर पुलाला जोडणाऱ्या फक्त एका पाइपचे काम बाकी, फेब्रुवारीमध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित. 100 टक्के काम पूर्ण. आतापर्यंत मिळालेल्या तारखा 1. डॉ. भागवत कराड: नोव्हेंबर 2023 मध्ये कराड यांनी जानेवारी 2024 मध्ये दिवसाआड पाणीपुरवठा होईल अशी घोषणा केली होती.
2. संदिपान भुमरे: 900 मिमीची योजना पूर्ण होऊन उन्हाळ्यातच पाणी मिळेल असे सांगितले होते, तर 2,740 कोटींची नवी योजना डिसेंबरपर्यंत होईल असे आश्वासन दिले होते.
3. जी. श्रीकांत: मनपा आयुक्तांनी 900 मिमीची योजना 15 ऑगस्टपर्यंत पूर्णतेचे आश्वासन दिले. 4. अब्दुल सत्तार: यांनी या योजनेचे दोन टप्पे पूर्ण, पहिला टप्पा जानेवारीपर्यंत पूर्ण होईल आणि दुसरा फेब्रुवारी-मार्चमध्ये होईल, असे सांगितले.
5. संजय शिरसाट: जानेवारीत पालकमंत्री होताच सूत्रे हाती घेतली असून आता एप्रिल 2025 मध्ये पाणी मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तेही अपूर्णच आहे.
6. अतुल सावे: जून 2025 पर्यंत शहराची नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईल असे म्हटले होते.
7. उदय सामंत: 2026 मध्ये पाणीपुरवठा योजना पूर्ण होईल असे सामंतांनी सांगितले होते.
8. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: डिसेंबर 2025 मध्ये चाचणी सुरू होण्याचे आश्वासन दिले होते. एमबीआर
एबीआरचे काम शेवटच्या टप्प्यात, एमबीआरपासून एक्स्प्रेस लाइनपर्यंत पाइपलाइन टाकण्याचे काम अंतिम टप्यात. एप्रिलपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित. एकूण 12 किमीपैकी 88% पाइपलाइनचे काम पूर्ण. जलशुद्धीकरण केंद्र
नक्षत्रवाडी येथे जलशुद्धीकरणाचे काम सुरू आहे. एकूण सहापैकी तीन जलकुंभ पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये 200 एमएलडी पाणी शुद्ध होऊ शकते. अशी स्थिती सध्या तरी आहे. जलकुंभ
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण 52 जलकुंभ. 07 जलकुंभ मनपाकडे हस्तांतरित केले, मार्चपर्यंत 22 जलकुंभ मनपाकडे येऊ शकतात ही परिस्थिती. अंतर्गत पाइपलाइन
एकूण 1800 किमी पाइपलाइन आहे. 1100 किमी पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण कामातील 58 टक्के काम पूर्ण, मार्चपर्यंत काम पूर्ण होऊ शकेल अशी परिस्थिती नाही. वाढीव पाणी 3 महिने नाहीच
या उन्हाळ्यात नव्या पाणीपुरवठा योजनेतून किमान 200 एमएलडी (1 एमएलडी म्हणजे 10 लाख लिटर) पाणी मिळेल अशी अपेक्षा होती. 900 मिमीचे पाइपलाइन टाकून पाणी उपसा वाढला, मात्र अद्याप पुरेसे पाणी या योजनेतून मिळत नाही. हर्सूल तलावातूनही रोज 10 एमएलडी तरीदेखील पाणीपुरवठ्याच्या टप्प्यातील अंतर कमी झालेले नाही.हे काम पाहिले तर पुढील तीन महिन्यांत शहरात वाढीव पाणी मिळेल असे दिसत नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. पंपवेल
दोन टप्प्यांत काम, एक टप्पा पूर्ण दोन पंप बसले. 200 एमएलडी पाण्याचा उपसा होऊ शकतो. जॅकवेलमध्ये पाणी घेण्यास सुरुवात. फेब्रुवारीमध्ये काम पूर्ण होणार नाही असे दिसते. वीजपुरवठ्याचे नियोजनच नाही नवीन पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे भासवले जात असले तरी सद्य:स्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर 2025 चा वायदा केला होता. मात्र जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान अद्यापही काही ठिकाणी पाइपलाइन जोडणी अपूर्ण आहे. पंपिंग स्टेशनच्या कामात तांत्रिक अडथळे असून वीजपुरवठ्याचे नियोजन कागदावरच आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाने दिलेली आश्वासने फोल ठरतील, असे वास्तव दिसते आहे. (असा अहवाल कंत्राटदाराकडून प्रशासनाला मागच्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला होता.) महापौर घेणार आढावा बैठक समीर राजूरकर यांनी महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर या महिन्यात पाणीपुरवठा योजनेची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक बोलावली आहे. ते कोणती डेडलाइन देतात हे पाहावे लागणार आहे.
