मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता महाराष्ट्रात स्पष्टपणे दिसू लागले आहेत. या युद्धामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून एलपीजी आणि एलएनजी गॅसचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. या परिस्थितीचा परिणाम उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि सामान्य नागरिकांवर एकाच वेळी होताना दिसत आहे. काही ठिकाणी उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत, तर शहरांमध्ये गॅस सिलिंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे राज्यात गॅस टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एलएनजी गॅसच्या कमतरतेचा सर्वाधिक फटका उद्योगांना बसताना दिसत आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये सुमारे 30 कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः ऑटोमोबाईल, फार्मा आणि स्टील उद्योगावर या तुटवड्याचा मोठा परिणाम झाला आहे. सध्या अनेक उद्योगांकडे केवळ दोन दिवस पुरेल एवढाच गॅस साठा उरला आहे. केंद्र सरकारने या वायूचा वापर केवळ घरगुती एलपीजी उत्पादनासाठी राखीव ठेवल्याने औद्योगिक गॅस पुरवठा थांबला आहे. त्यामुळे उत्पादन प्रक्रियेवर थेट परिणाम झाला असून अनेक कारखान्यांना कामकाज कमी करावे लागले आहे. संभाजीनगरमधील शेंद्रा, वाळूज आणि चिखलठाणा या औद्योगिक भागांमध्ये गॅस तुटवड्याची परिस्थिती अधिक तीव्र झाली आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) क्षेत्रात दररोज सुमारे 250 ते 300 मेट्रिक टन एलएनजीची गरज असते. मात्र सध्याच्या परिस्थितीत हा पुरवठा विस्कळीत झाला आहे. कतारमधून येणाऱ्या द्रवीकृत नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने काही मोठ्या उद्योगांचे उत्पादन आधीच थांबले आहे. या परिस्थितीत आणखी उद्योग बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, गॅस टंचाईचा परिणाम आता मुंबईतील हॉटेल उद्योगावरही दिसू लागला आहे. आहार म्हणजेच असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट या संघटनेच्या माहितीनुसार गॅसच्या कमतरतेमुळे शहरातील जवळपास 20 टक्के हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत. हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर एलपीजी आणि कमर्शियल गॅसवर अवलंबून असल्याने हा तुटवडा गंभीर मानला जात आहे. सध्या अनेक हॉटेल्सकडे फक्त आज आणि उद्या पुरेल एवढाच गॅस साठा उरला आहे. पुढील तीन दिवसांत पुरवठा सुरळीत झाला नाही, तर मुंबईतील सुमारे 50 टक्के हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अकोल्यातही गॅस अभावामुळे नागरिक आणि व्यावसायिक चिंतेत आहेत. अनेक हॉटेलमध्ये फक्त एक ते दोन दिवस पुरेत इतकाच गॅस आहे. त्यामुळे त्यांना वेळेत गॅस मिळाला नाही, तर त्यांच्यावर संक्रांत येऊ शकते. अनेक मिठाई व्यापाऱ्यांनाही गॅसचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे अनेक जण आता इलेक्ट्रीक शेगडीकडे वळले आहेत. मात्र, गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही, तर मिठाईचे दर वाढू शकतात. गल्फ देशांमधून गॅसचा साठा उपलब्ध – राज्यमंत्री योगेश कदम या घडामोडींवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, हॉटेल्स मोठ्या प्रमाणात बंद झाल्याची ठोस उदाहरणे सरकारसमोर आलेली नाहीत. कमर्शियल वापरासाठीच्या गॅस संदर्भात केंद्र सरकारने काही निर्णय घेतले असले तरी घरगुती गॅस पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण निर्माण झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गॅसचे साठे आणि साठवण व्यवस्था उपलब्ध असल्याने तातडीने तुटवडा निर्माण होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. योगेश कदम पुढे म्हणाले की, गल्फ देशांमधून येणाऱ्या गॅसचा साठा भारताला उपलब्ध झाला आहे. त्यामुळे काही दिवसांत परिस्थिती सुधारेल आणि गॅस पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी त्यावर उपाययोजना करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन राज्य सरकार करत आहे. तसेच मुख्यमंत्री संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना आणि निर्णय ते घेतील, असेही त्यांनी सांगितले. देशाला अधिकृत माहिती द्यावी – आदित्य ठाकरे दरम्यान, या गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे अधिकृत माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत म्हटले की, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा भारतातील जनतेच्या दैनंदिन जीवनावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होणार आहे, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. या परिस्थितीत सामान्य नागरिकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, याबाबत केंद्र सरकारने संपूर्ण देशाला अधिकृत माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी गॅस टंचाईचा फटका केवळ उद्योग किंवा हॉटेल व्यवसायापुरता मर्यादित राहिलेला नाही. राज्यातील जवळपास सर्वच शहरात गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. गॅस एजन्सीसमोर नागरिक पहाटेपासून रांगेत उभे राहत आहेत. गॅस मिळणार की नाही याबाबत अनिश्चितता असल्याने अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये वादाचे प्रकारही घडताना दिसले. तासनतास रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांचा संयम सुटल्याचे पाहायला मिळाले. एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक माहिती न मिळाल्याने ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाले. उद्योग, व्यवसाय आणि सामान्य नागरिकांना अडचणी या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा लवकर सुरळीत न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईतील हॉटेल संघटनेने या समस्येबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी चर्चा सुरू केली असून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेण्याचेही नियोजन केले आहे. दरम्यान, गॅस तुटवड्याचा परिणाम इतर शहरांमध्येही जाणवत आहे. बंगळुरू हॉटेल असोसिएशननेही गॅस पुरवठा कमी झाल्यामुळे काही हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गॅस पुरवठा लवकर सुधारला नाही, तर उद्योग, व्यवसाय आणि सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उद्योग सचिवांना मेल केला छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा, वाळूज, चित्तेगाव भागातील 25 ते 30 कंपन्यांची स्थिती अशी झाली आहे. सध्याच्या स्थितीबाबत आम्ही केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय आणि जिल्हाधिकारी, उद्योग सचिव यांना मेल केलेला आहे. निर्णयाची प्रतीक्षा आहे. -अर्जुन गायकवाड, अध्यक्ष, मसिआ लहानमोठे उद्योग संकटात उद्योजक सरासरी आठवडाभराचा स्टॉक ठेवतात. मात्र अचानक 5 रोजी निर्णय झाल्याने आता शहरातील लहानमोठे उद्योग संकटात आहेत. अशीच स्थिती सर्वच ठिकाणी आहे. या निर्णयाबद्दल आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी केली आहे. -उत्सव माछर, अध्यक्ष, सीएमआयए आता पुन्हा चूल पेटवण्याची वेळ येणार का – सतेज पाटील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर तीव्र टीका केली. कमर्शियल गॅसवर निर्बंध आणले आहेत. पुढे घरगुती गॅसचाही नंबर लागू शकतो. मग लोकांनी पुन्हा चूल पेटवायची का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ऑइल कंपन्यांकडे कच्चा मालच उपलब्ध नसल्यास उत्पादन कसे वाढणार, असा सवाल करत त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली. सतेज पाटील यांनी सांगितले की, गॅस टंचाईचा परिणाम फक्त उद्योगांवरच नाही तर सामान्य लोकांवरही होणार आहे. हॉटेलमध्ये जेवणाऱ्या ग्राहकांपासून ते तिथे काम करणाऱ्या हजारो कामगारांपर्यंत अनेक जण या व्यवसायावर अवलंबून आहेत. गॅस पुरवठा कमी झाल्यास व्यवसायिकांचे मोठे नुकसान होईल. तसेच घरगुती पातळीवरही परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत महागाईचा फटका मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रमाणावर बसू शकतो, असेही त्यांनी म्हटले. सरकार परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असले तरी प्रत्यक्षात जमिनीवरील स्थिती वेगळी असल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्ण बातमी वाचा….
युद्धाचा महाराष्ट्रावर परिणाम:संभाजीनगरात कारखाने बंद होण्याच्या मार्गावर; गॅसचा मुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अकोल्यातल्या हॉटेलांना फटका
-
By सुरेश पाचभाई
- March 10, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
हिंगोली शहर स्वच्छतेसाठी पालिकेचे पाऊल:७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे...
5views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 11, 2026
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी कारवाई:18 महिन्यांनंतर...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 11, 2026
बांगलादेशी तरुणीने प्रेमासाठी ओलांडली सीमा:जळगावात दुसरी ‘सीमा...
6views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 11, 2026
