राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक झाल्यानंतर आता पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना पोलिसांनी लवांडे यांच्या नावावर असा गुन्हा दाखवला, जो त्यांनी कधी केलाच नव्हता. मात्र दुसऱ्याच दिवशी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये हा प्रकार ‘नजरचुकीने’ घडल्याची कबुली पुणे पोलिसांनी दिली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. विकास लवांडे यांच्यावर 8 मे रोजी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जाला विरोध करताना पोलिसांनी त्यांच्या विरोधातील पूर्वीचे गुन्हे न्यायालयासमोर मांडले. त्यामध्ये 2017 मध्ये बिबवेवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा उल्लेख करण्यात आला. प्रत्यक्षात 2017 मध्ये नथुराम गोडसेविरोधातील आंदोलनादरम्यान लवांडे यांच्यावर गुन्हा क्रमांक 32/17 दाखल झाला होता. हा गुन्हा 2022 मध्ये शासनाने मागे घेतला होता. मात्र पोलिसांनी न्यायालयात 32/17 ऐवजी 33/17 हा गुन्हा दाखवला. विशेष म्हणजे गुन्हा क्रमांक 33/17 हा गौतम कांबळे नावाच्या व्यक्तीवर दाखल होता. दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्या प्रकरणातून कांबळे यांचीही निर्दोष मुक्तता झाली होती. तरीही हा गुन्हा विकास लवांडे यांच्या नावावर दाखवण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. न्यायालयात याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी नजरचूक झाल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत पोलिसांनी चुकीची माहिती दिली का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. वारकरी संप्रदायात काही लोकांची घुसखोरी झाली आहे, असा दावा करत त्यांनी सोशल मीडियावर काही वारकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती. या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीका झाली होती. काही दिवसांपूर्वी पुण्यात त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली होती. या घटनेनंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी लवांडे यांचा दुग्धाभिषेक करून समर्थन दर्शवले होते. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी त्यांना अटक केली. पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह अटकेनंतर विकास लवांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले. चोर सोडून संन्याशाला फाशी, अशी टीका करत त्यांनी आपल्या घरावर रात्री पोलिस गेल्याचा दावा केला. माझ्यावर हल्ला करणारे आरोपी मोकाट आहेत, पण मला खोट्या तक्रारीवरून अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे त्यांनी म्हटले. मी फरार नाही, कायद्याचा आदर करणारा माणूस आहे. पोलिसांनी फोन केला असता तर मी स्वतः हजर झालो असतो, असेही लवांडे यांनी स्पष्ट केले. या सर्व घडामोडींमुळे आता पुणे पोलिसांच्या तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.