महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीसमोरील राजकीय अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. राज्यसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने निर्माण झालेली चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच आता नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर नेते गोकुळ गीते यांनी पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढवली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक फेऱ्यांच्या चर्चांद्वारे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गीते यांनी अद्याप माघार घेण्याचे स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या आधीच महायुतीच्या राजकीय गणितात नवा ट्विस्ट आला आहे. नाशिकमध्ये महायुतीचे नेते उदय सामंत व गिरीश महाजन हे दोघेही गोकुळ गीते यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, उदय सामंत म्हणाले की, गोकुळ गीतेंवर कोणताही दबाव टाकलेला नाही. महायुतीमध्ये कुठेही दगाफटका होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एखाद्याला विनंती करणे म्हणजे काही 302चा गुन्हा होत नाही. राजकारणात विनंती म्हणजे दबाव नसतो. नाशिकमध्ये भाजपलाच भाजपचे आव्हान नाशिक पदवीधर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत गोकुळ गीते यांनी स्वतःचा प्रभाव निर्माण केला आहे. पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने भाजप नेतृत्व अडचणीत आले. साधारणपणे अशा प्रसंगी पक्ष नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर बंडखोर उमेदवार माघार घेतात. मात्र, गीते यांच्या भूमिकेमुळे भाजपच्या स्थानिक संघटनेतील नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली आहे. पक्षाची भीती पराभवाची नाही, संदेशाची आहे महायुतीकडे विधान परिषद निवडणुकीत पुरेसे संख्याबळ असल्याने एका बंडखोर उमेदवारामुळे जागा गमावण्याचा धोका फारसा नाही. मात्र, भाजप नेतृत्वाला चिंता आहे ती वेगळ्याच गोष्टीची. जर गोकुळ गीते अखेरपर्यंत मैदानात राहिले, तर पक्षातील असंतोष आणि नाराजीचा संदेश राज्यभर जाऊ शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असा संदेश भाजपला परवडणारा नाही. भुजबळ प्रकरणानंतर दुसरा धक्का? राज्यसभा उमेदवारीच्या वेळी छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असताना शेवटच्या क्षणी राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर महायुतीतील अंतर्गत समन्वय आणि पदवाटपावर प्रश्न उपस्थित झाले. आता गोकुळ गीते यांचे बंड हे त्याच अस्वस्थतेचे पुढचे पाऊल मानले जात आहे. अनेक इच्छुक नेते आणि कार्यकर्ते पदवाटप व उमेदवारी प्रक्रियेबाबत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ‘ऑपरेशन मनधरणी’ची पडद्यामागील धावपळ* सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे प्रदेश आणि राज्यस्तरीय नेते गोकुळ गीते यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत. भविष्यातील राजकीय संधी, संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि पक्षनिष्ठेचा मुद्दा पुढे करत त्यांना माघार घेण्यास सांगितले जात आहे. मात्र, गीते समर्थकांचा दावा आहे की, स्थानिक पातळीवर त्यांची ताकद आणि जनाधार लक्षात न घेता निर्णय घेण्यात आला. त्यामुळे त्यांनी भूमिका बदललेली नाही. महायुतीसमोरचा मोठा प्रश्न गोकुळ गीते अखेर माघार घेतात की निवडणुकीच्या मैदानात राहतात, यावरून केवळ एका मतदारसंघाचेच नव्हे तर महायुतीतील अंतर्गत वातावरणाचेही चित्र स्पष्ट होणार आहे. कारण सध्या सत्ताधारी आघाडीत सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र दाखवण्याचा प्रयत्न होत असला, तरी उमेदवारी आणि सत्तेतील वाट्यांवरून सुरू असलेली नाराजी अधूनमधून समोर येत आहे. ही निवडणूक जागेची नाही, शक्तिप्रदर्शनाची गोकुळ गीते यांची बंडखोरी केवळ निवडणूक म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. ही लढाई प्रत्यक्षात भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचे अस्तित्व, पक्षातील निर्णयप्रक्रिया आणि नाराज नेत्यांच्या राजकीय ताकदीची चाचणी ठरत आहे. जर गीते शेवटपर्यंत ठाम राहिले, तर विधान परिषद निवडणुकीपेक्षा जास्त चर्चा भाजपमधील अंतर्गत नाराजीची होईल. आणि हाच मुद्दा महायुतीसाठी सर्वात मोठी चिंता बनू शकतो. विधान परिषद निवडणुकीपूर्वी नाशिकमधील हे बंड आता केवळ स्थानिक राजकारणापुरते मर्यादित राहिलेले नाही. ते महायुतीतील अंतर्गत अस्वस्थतेचे आणि भाजपसमोरील संघटनात्मक आव्हानांचे नवे प्रतीक बनले आहे. संबंधित बातम्या वाचा… गोकुळ गितेंमुळे वाढली महायुतीची डोकेदुखी:जाहीर पाठींबा देण्यास स्पष्ट नकार; तोडगा काढण्यासाठी मंत्री उदय सामंत, महाजन नाशकात विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात गोकुळ गिते यांच्या बंडखोरीमुळे सत्ताधारी महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन व उदय सामंत नाशकात तळ ठोकून आहेत. हे दोन्ही नेते गोकुळ गिते यांचा जाहीर पाठींबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण गोकुळ गिते यांनी निवडणूक खूप पुढे गेल्याचे सांगत महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठींबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. यामुळे महाजन व सामंत यांची गोची झाली आहे. सविस्तर वाचा राज्यसभेची जागा हातची गेली, मंत्रिपदही अधांतरी:छगन भुजबळांच्या ‘एका अटी’मुळे महायुतीतील समीकरणे कशी बदलली? पडद्यामागील राजकारण!
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा उमेदवारीचा विषय चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेत पाठवले जाईल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, शेवटच्या क्षणी चित्र बदलले आणि उमेदवारी राजेंद्र जैन यांच्या गळ्यात पडली. या घडामोडीमागे केवळ उमेदवारीचा प्रश्न नसून, भुजबळांनी घातलेली एक राजकीय अट आणि महायुतीतील सत्तासमीकरणे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सविस्तर वाचा