ठाकरे गटाची गैरहजर 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस:सावंत म्हणाले- त्यांना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा वेळ, गृहविभागाचे 6 खासदारांना Y प्लस सुरक्षेचे आदेश

दिल्लीत शिवसेना (यूबीटी) संसदीय पक्षाची बैठक सुरू झाली. केवळ तीन लोकसभा खासदार, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाझे, उपस्थित झाले. पक्षाने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना गुरुवारी सकाळी ११ वाजता दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देणारा व्हीप जारी केला होता. बैठकीपूर्वी पत्रकार परिषदेत यूबीटीचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, आमच्या खासदारांचे अपहरण झाले आहे. जे बैठकीला येतात ते आमच्यासोबत आहेत, जे येत नाहीत ते गद्दार आहेत. दरम्यान, शिवसेनेचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी गुरुवारी दावा केला की, यूबीटीचे सहा खासदार शिवसेनेत सामील झाले आहेत. ते म्हणाले की, ‘ऑपरेशन टायगर’ पूर्ण झाले आहे. वास्तविक पाहता, UBT च्या नऊ खासदारांपैकी सहा जणांनी बंड केले आहे. सूत्रांनुसार, या सहा खासदारांनी बुधवारी सकाळी ९:३० वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून शिंदे गटात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तथापि, अध्यक्ष किंवा बंडखोर गटाकडून याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. ‘7 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा कारवाई’; गैरहजर खासदारांना ठाकरे गट नोटीस बजावणार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीनंतर खासदार अरविंद सावंत आणि खासदार संजय राऊत यांनी गैरहजर खासदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, सात दिवसांत उत्तर न दिल्यास पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा सावंत यांनी दिला. ‘बैठकीला गैरहजर राहणे म्हणजे पक्षद्रोह’ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “पक्षाचा आदेश सर्व खासदारांना मिळाला होता. तरीही काही सदस्य बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. आम्हाला वाटतं हा पक्षद्रोह आहे.” त्यांनी सांगितले की, अनुपस्थित राहिलेल्या सर्व खासदारांना आजच कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे. “संध्याकाळपर्यंत प्रत्येकाला नोटीस मिळेल आणि सात दिवसांच्या आत त्यांना उत्तर द्यावं लागेल.” लोकसभा अध्यक्षांनाही पत्र पाठवणार या खासदारांवर पुढे काय कारवाई होणार, याबाबत विचारले असता सावंत म्हणाले, “कायदा त्यांच्यावर जी कारवाई करेल ती होईल. आम्ही लोकसभा अध्यक्षांनाही याबाबत पत्र लिहिणार आहोत.” यामुळे ठाकरे गट आता केवळ पक्षांतर्गत कारवाईवर न थांबता संसदीय आणि कायदेशीर लढाईही लढण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘पत्र दिलं असेल तर दाखवा’ सहा खासदारांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना सावंत यांनी थेट आव्हान दिले. “जर पत्र दिलं असेल तर दाखवा तरी. त्यांना विचारा त्यांचं पत्र कुठे आहे? आमचं सगळं सार्वजनिक आहे. ते लपून-छपून काम करतात कारण त्यांना भीती आहे.” त्यामुळे बंडखोर खासदारांनी अध्यक्षांकडे दिलेल्या कथित पत्रावरूनही वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. ‘ओमराजे दिल्लीत नाहीत, पुण्यात आहेत’ दरम्यान, संजय राऊत यांनी काही खासदारांच्या लोकेशनबाबतही दावा केला. “ओमराजे निंबाळकर दिल्लीत नाहीत, ते पुण्यात आहेत. संजय दिना पाटील मुंबईत आहेत. ते बैठकीला आले नाहीत, पण ते त्यांच्यासोबत नाहीत.” राऊत म्हणाले की, उर्वरित खासदार नेमके कुठे आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. ‘शिंदेंच्या लोकांनी किडनॅप केलंय का?’ यावेळी राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केला. “शिंदेंच्या गुंडांनी त्यांना किडनॅप करून कुठे ठेवलं आहे का? त्यांच्या जीवाला काही धोका आहे का? हे पाहावं लागेल. हे लोक काहीही करू शकतात.” मात्र, या आरोपांबाबत कोणतेही पुरावे त्यांनी सादर केले नाहीत. ‘चार-पाच खासदार म्हणजे पक्ष नाही’ उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत बोलताना राऊत म्हणाले, “पूर्ण पक्ष एकत्र उभा आहे. चार-पाच खासदार म्हणजे काही पक्ष होत नाही.” त्यांनी दावा केला की, पक्षाची खरी ताकद म्हणजे जनतेचा पाठिंबा असून, तो अद्याप उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. ‘मतदारसंघात जाऊन दाखवावं’ बंडखोर खासदारांवर टीका करत राऊत म्हणाले, “त्यांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन दाखवावं. जर ते तिथे गेले तर त्यांना सैन्य घेऊन जावं लागेल.” त्यांनी पुढे दावा केला की, यापुढे या खासदारांना सुरक्षा आणि सरकारी संरक्षणाच्या आधारेच फिरावं लागेल. ‘या परिस्थितीला कोर्टही जबाबदार’ या प्रकरणी न्यायालयात जाणार का, असा प्रश्न विचारला असता राऊत यांनी न्यायव्यवस्थेवरही अप्रत्यक्ष टीका केली. “कोर्टाने आधीच निर्णय दिला असता तर ही वेळ आली नसती. या परिस्थितीला कोर्टही तेवढंच जबाबदार आहे.” हे 6 खासदार बैठकीला गैरहजर मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (UBT) गटातील काही खासदारांनी आधीच दिल्लीत हालचाली वाढवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, तब्बल 6 खासदार वेगळा गट स्थापन झाला असून शिंदे गटाच्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाच्या संसदीय दलाच्या बैठकीला आज 1. संजय जाधव, 2. संजय देशमुख, 3. नागेश पाटील आष्टीकर, 4. ओमराजे निंबाळकर, 5. भाऊसाहेब वाकचौरे, 6. संजय दिना पाटील हे खासदार गैरहजर असल्याचे दिसून आले. या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे प्रतोद खासदार अनिल देसाई यांनी दिली. एवढेच नाही, तर ठाकरे गटाकडून या खासदारांविरुद्ध कायदेशीर कारवाईचे पर्यायही तपासले जात असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेबाबत पत्र दिल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे UBT गटाची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन दिवसांत काय घडलं… १७ जून – बुधवारी सकाळी, शिंदे गटाचे सचिव किरण पावस्कर आणि एका मंत्र्याने दावा केला की, उद्धव गटातील सहा खासदारांनी एक वेगळा गट स्थापन करण्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेतली. त्यानंतर राऊत यांनी, “हे लोक अप्रामाणिक आहेत, अप्रामाणिकपणा त्यांच्या रक्तातच आहे,” असे म्हणत आक्षेपार्ह भाषा वापरली. असे शब्द सर्वसामान्य मराठी बोलचालीचा भाग आहेत, असे स्पष्टीकरण राऊत यांनी नंतर दिले. गेल्या चार वर्षांतील शिवसेनेतील ही दुसरी मोठी फूट आहे. जून २०२२ मध्ये, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३९ आमदारांनी बंड करून शिवसेनेत एक वेगळा गट स्थापन केला होता. १६ जून – संजय राऊत यांनी सोशल मीडियावर (X) असा दावा केला आहे की खासदारांना फोडण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जात आहे. त्यांनी लिहिले की, महाराष्ट्रातील खासदारांना फोडण्यासाठी ५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली असून, त्यापैकी १५ कोटी रुपयांची आगाऊ रक्कम आज रात्री दिली जाणार आहे. शिवसेना (यूबीटी) चे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना ईमेल पाठवून मागणी केली आहे की, जर कोणत्याही बंडखोर गटाने स्वतंत्र गट स्थापन करण्याचा किंवा पक्षात विलीन होण्याचा दावा केला, तर उद्धव गटाची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये. १५ जून – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटातील सहा लोकसभा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील, अशा चर्चा प्रसारमाध्यमे आणि राजकीय वर्तुळात तीव्र झाल्या होत्या. या हालचालीला ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव देण्यात आले होते. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या. सहा खासदारांच्या गटाला पक्षांतरबंदी कायद्यातून दिलासा मिळू शकतो! शिवसेनेचे (यूबीटी) लोकसभेत नऊ खासदार आहेत. पक्षांतरबंदी कायद्यानुसार, पक्षात फूट पडल्यास अपात्रता टाळण्यासाठी किमान दोन-तृतीयांश खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. याचा अर्थ असा की, जर नऊपैकी सहा खासदारांनी एकत्र येऊन फुटण्याचा निर्णय घेतला, तर ते एक वैध गट असल्याचा दावा करू शकतात. या कारणास्तव, सहा खासदारांच्या बंडाची बातमी राजकीय आणि कायदेशीर दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जाते. तज्ज्ञांच्या मते, केवळ एक वेगळा गट स्थापन करणे पुरेसे ठरणार नाही. भविष्यात, या खासदारांना कायदेशीररित्या आपले स्थान मजबूत करण्यासाठी दुसऱ्या पक्षात विलीन होण्याची प्रक्रिया देखील पूर्ण करावी लागू शकते. ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान लाइव्ह अपडेट्ससाठी खालील ब्लॉग वाचा…

Leave a Comment

error: Content is protected !!