शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामागील पडद्यामागच्या हालचाली आता एकामागून एक समोर येत आहेत. दिल्लीतल्या ‘द लीला’ हॉटेलमध्ये मुक्काम, मध्यरात्री एकनाथ शिंदेंसोबत झालेला कॉन्फरन्स कॉल, श्रीकांत शिंदेंची रणनीती आणि त्यानंतर खासदारांना थेट जयपूरला हलवण्याचा निर्णय यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आणखी रंगली आहे. व्हीप असूनही 6 खासदार गैरहजर 18 जून रोजी ठाकरे गटाने संसदीय पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी पक्षाकडून अधिकृत व्हीपही जारी करण्यात आला होता. मात्र, लोकसभेतील नऊपैकी केवळ तीन खासदार बैठकीला उपस्थित राहिले. अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हेच खासदार बैठकीला उपस्थित होते. तर संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील हे सहा खासदार गैरहजर राहिले. लीला हॉटेलमधून थेट जयपूरला रवाना सूत्रांच्या माहितीनुसार, हे सर्व खासदार दिल्लीतील ‘द लीला’ हॉटेलमध्ये थांबले होते. ठाकरे गटाकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे किंवा त्यांचे मनपरिवर्तन करण्याचे प्रयत्न होऊ नयेत यासाठी त्यांना बैठकीच्या आधीच जयपूरला हलवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामागचा उद्देश स्पष्ट होता – एकही खासदार ठाकरे गटाच्या बैठकीला पोहोचू नये आणि गट एकसंध राहावा. 17 जूनच्या रात्री शिंदेंसोबत 30 मिनिटांचा कॉल या संपूर्ण घडामोडीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 17 जूनच्या रात्री झालेला कॉन्फरन्स कॉल. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहाही खासदारांशी सुमारे 30 मिनिटे चर्चा केली. विशेष म्हणजे, ज्यांच्याबाबत सर्वाधिक संभ्रम होता असे ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील हे देखील या कॉलवर उपस्थित होते. “शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील,” असे आश्वासन शिंदे यांनी दिल्यानंतर खासदारांचा निर्णय पक्का झाल्याचे बोलले जात आहे. श्रीकांत शिंदेंची दिल्लीतून सूत्रे या संपूर्ण ऑपरेशनमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे. बंडखोर खासदारांच्या समन्वयाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यामुळेच ते काही दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून होते. याआधीही श्रीकांत शिंदे आणि काही खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. 16 जूनच्या मध्यरात्रीपासून सुरू झाली ‘ऑपरेशन टायगर’ची हालचाल? सूत्रांच्या माहितीनुसार, 16 जूनच्या मध्यरात्रीनंतर या संपूर्ण घडामोडींना वेग आला. 2022 मध्ये आमदारांच्या बंडानंतर आता खासदारांच्या पातळीवर दुसरी मोठी फूट पडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी झालेल्या संसदीय दलाच्या बैठकीला पक्षाच्या नऊपैकी केवळ तीन खासदार उपस्थित राहिले. त्यामुळे सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याचे जवळपास स्पष्ट झाले. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसालाही गैरहजर बंडखोर गटातील खासदार संजय जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय दिना पाटील यांनी 14 जून रोजी झालेली बैठकही टाळली होती. याआधी ते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमालाही अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे नाराजीची बीजे काही दिवसांपूर्वीच रोवली गेल्याचे बोलले जात आहे. मध्यरात्री खासगी विमानांची दिल्लीकडे उड्डाणे सूत्रांनुसार, सर्वप्रथम नागेश पाटील आष्टीकर हे 16 जून रोजी पहाटे साडेएकच्या सुमारास खासगी विमानाने नांदेडहून दिल्लीला पोहोचले. त्यानंतर संजय देशमुख आणि संजय जाधव हेही दुसऱ्या खासगी विमानातून दिल्लीत दाखल झाले. भाऊसाहेब वाकचौरे हैदराबादहून दिल्लीला पोहोचले, तर संजय दिना पाटील आणि मंत्री प्रताप सरनाईकही नंतर दिल्लीत दाखल झाले. दुसरीकडे, एकनाथ शिंदे मुंबईहून जयपूरमार्गे दिल्लीत पहाटे सुमारे 3 वाजता पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सकाळी साडेचारच्या सुमारास खासदार श्रीकांत शिंदे दिल्लीत पोहोचले. ओमराजे निंबाळकर पुण्याहून दिल्लीला रवाना झाले होते. सकाळी लोकसभा अध्यक्षांची भेट 17 जून रोजी सकाळी सुमारे 7 वाजता श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर सकाळी 10.20 वाजता उर्वरित पाच खासदारांनी अध्यक्षांची भेट घेऊन पत्र सादर केले. या पत्रात त्यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी होत असल्याचे नमूद केले असून लोकसभेतील आसनव्यवस्था बदलण्याची मागणीही केल्याचे समजते. ‘पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा डाव’ सूत्रांच्या माहितीनुसार, या पत्रात बंडखोर खासदारांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या मते, पक्ष नेतृत्व मूळ विचारसरणीपासून दूर गेले असून काही वरिष्ठ नेते शिवसेना (UBT) चे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा विचार करत आहेत. याच भीतीमुळे आपण हा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केल्याचे सांगितले जात आहे. हा मुद्दा आगामी राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. दोन-तृतीयांश संख्याबळामुळे अपात्रतेचा धोका कमी? लोकसभेत शिवसेना (UBT) चे एकूण नऊ खासदार आहेत. त्यापैकी सहा खासदार या गटासोबत असल्याने त्यांच्याकडे दोन-तृतीयांश संख्याबळ असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे दहाव्या अनुसूचीनुसार अपात्रतेच्या कारवाईपासून संरक्षण मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्ष आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेवर अवलंबून असेल. लोकसभा अध्यक्षांकडे पत्र? बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिल्याचा दावा केला जात आहे. या पत्रात आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत असल्याचे नमूद केल्याची चर्चा आहे. मात्र, ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “पत्र दिलं असेल तर दाखवा. आम्ही आमची सर्व कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत. त्यांनी नेमकं काय दिलं आहे, ते देशासमोर आणावं,” असे सावंत म्हणाले. ठाकरे गटाची नोटीस, अपात्रतेची तयारी बैठकीनंतर अरविंद सावंत यांनी सहाही खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची घोषणा केली. सात दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय लोकसभा अध्यक्षांकडेही तक्रार करून पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे. राऊतांचा संताप; ‘हे गद्दार आहेत’ पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली. “चार-पाच खासदार म्हणजे पक्ष होत नाही. त्यांना खासदार बनवणारी जनता हा खरा पक्ष आहे.” राऊत यांनी दावा केला की, काही खासदार दिल्लीत नसून पुणे आणि मुंबईत आहेत. तसेच “शिंदेंच्या लोकांनी त्यांना कुठे ठेवले आहे का, याची चौकशी करावी लागेल,” असेही ते म्हणाले. 6 खासदारांना Y+ सुरक्षा दरम्यान, या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गृह विभागाने या सहा खासदारांना Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांच्या घराबाहेरही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राऊत यांनी बंडखोर खासदारांना मतदारसंघात विरोधाचा सामना करावा लागू शकतो, असे वक्तव्य केल्यानंतर सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची चर्चा आहे. 20 जूनला मोठी घोषणा? सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना स्थापना दिनानंतर 20 जून रोजी हे सहा खासदार एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ शकतात. या बैठकीनंतर त्यांनी घेतलेल्या निर्णयामागील कारणे आणि पुढील राजकीय भूमिका जाहीर केली जाऊ शकते. 2022 च्या इतिहासाची पुनरावृत्ती? 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत मोठी फूट घडवून आणली होती. त्यानंतर पक्षाचे नाव, चिन्ह आणि सत्ता शिंदे गटाकडे गेली. आता चार वर्षांनंतर लोकसभेतील सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर आणखी एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ ही केवळ खासदारांची फूट नसून, महाराष्ट्रातील शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्षाचा नवा अध्याय ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. आता लोकसभा अध्यक्षांचा निर्णय, ठाकरे गटाची कायदेशीर लढाई आणि 20 जूननंतरच्या घडामोडी यावर राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे.
‘ऑपरेशन टायगर’ची इनसाइड स्टोरी:दिल्लीतील लीला हॉटेल ते जयपूर… ठाकरेंचे 6 खासदार कसे बाजूला झाले, कोणी हलवली सूत्रे?
auto_awesomeथोडक्यात महत्त्वाचे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामागील पडद्यामागच्या हालचाली आता एकामागून एक समोर येत आहेत. दिल्लीतल्या 'द लीला' हॉटेलमध्ये मुक्काम, मध्यरात्री एकनाथ शिंदेंसोबत झालेला कॉन्फरन्स कॉल, श्रीकांत शिंदेंची रणनीती...