बातमी ऐका (Marathi Voice Reader)
छत्रपती संभाजीनगर : ‘आरटीओ चालान’च्या नावाने आलेली एक एपीके फाइल उघडली आणि एका नामांकित कंपनीच्या संचालकांना मोठा आर्थिक फटका बसला. मोबाईल हॅक करून सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपवरून कंपनीच्या अकाउंटंटकडून 1 कोटी रुपये ट्रान्सफर करून घेतले. मात्र त्यानंतर आणखी 4 कोटी रुपयांची मागणी होताच फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या अडीच तासांत सात बँक खाती गोठवून संपूर्ण 1 कोटी रुपये सुरक्षित ठेवले.
छत्रपती संभाजीनगरातील एनवे बायोटेक प्रा. लि. या हेल्थ सप्लिमेंट ड्रिंक कंपनीचे संचालक 4 ऑगस्ट रोजी कामानिमित्त दिल्ली येथे गेले होते. त्याच दिवशी सकाळच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर ‘आरटीओ चालान’ या नावाची एपीके फाइल डाउनलोड झाली. फाइल डाउनलोड होताच सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मोबाईलवर नियंत्रण मिळवत व्हॉट्सअॅप खाते हॅक केले.
वडील रागावले, लेकानं लाकडी दांडकं घेतलं अन्…, छ. संभाजीनगरला हादरवणाऱ्या प्रकरणात मोठं अपडेट
गुन्हेगारांनी संचालकांच्या व्हॉट्सअॅपवरून कंपनीचे अकाउंटंट प्रभात विश्वकर्मा यांना संदेश पाठवला. त्या संदेशात इंडसइंड बँकेच्या एका खात्यावर तातडीने 1 कोटी रुपये आरटीजीएसद्वारे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले. संदेश स्वतः संचालकांनीच पाठवला असल्याचा विश्वास बसल्याने अकाउंटंटने कोणताही संशय न घेता संबंधित खात्यावर 1 कोटी रुपये वर्ग केले.
सुमारे पंधरा मिनिटांनंतर त्याच व्हॉट्सअॅपवरून आणखी 4 कोटी रुपये पाठवण्याची मागणी करण्यात आली. एवढी मोठी रक्कम मागितल्याने अकाउंटंटला संशय आला. त्यांनी तातडीने संचालकांशी संपर्क साधला. त्यावेळी संचालकांनी आपण असा कोणताही संदेश पाठवलेला नसल्याचे स्पष्ट केले. त्यांचे मूळ व्हॉट्सअॅप खातेही बंद झाल्याचे समोर आले. त्यानंतर अकाउंटंटने मिळालेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट संचालकांच्या दुसऱ्या क्रमांकावर पाठवले. त्यावरून सायबर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आलं.
घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, एपीआय कदीर देशमुख आणि पीएसआय गणेश गिरी यांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान 1 कोटी रुपयांची रक्कम प्रथम इंडसइंड बँकेच्या लखनौ येथील खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ती रक्कम वेगवेगळ्या सात बँक खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे समोर आले.
सायबर पोलिसांनी दिल्लीतील आय-फोर-सी (I4C) केंद्र तसेच लखनौमधील बँक अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधला. त्यानंतर एकामागून एक सातही बँक खाती गोठवण्यात आली. तक्रार मिळाल्यानंतर अवघ्या अडीच तासांत ही संपूर्ण कारवाई पूर्ण करण्यात आली आणि 1 कोटी रुपयांची संपूर्ण रक्कम सुरक्षित ठेवण्यात पोलिसांना यश आले.
या कारवाईत अंमलदार सुशांत शेळके, गोकुळ कुतरवाडे, अमोल सोनटक्के, योगेश तळवंदे, सचिन संपकाळ, वैभव वाघचौरे, राम काकडे, संदीप पाटील, माला सलामपुरे आणि सोनाली वडनेरे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. दुपारी तीन वाजेपर्यंत सातही बँक खाती ब्लॉक करून 1 कोटी रुपयांची रक्कम सुरक्षित करण्यात आली.
संपूर्ण घटनाक्रम…
दुपारी 12 वाजेच्या सुमारास संचालकांचे व्हॉट्सअॅप हॅक झाले.
दुपारी 1 वाजेच्या सुमारास अकाउंटंटला 1 कोटी रुपये पाठवण्याचा मेसेज आला.
दुपारी 1.30 वाजता आरटीजीएसद्वारे 1 कोटी रुपये संबंधित खात्यावर वर्ग करण्यात आले.
दुपारी 1.45 वाजता आणखी 4 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आणि फसवणुकीचा संशय निर्माण झाला.
दुपारी 2.10 वाजता कंपनीचे कर्मचारी पोलिस आयुक्तालयात पोहोचले.
दुपारी 2.40 वाजता सायबर पोलिसांनी तक्रार नोंदवून नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधत बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली.