बातमी ऐका (Marathi Voice Reader)
कोल्हापूर: झोपेत असलेल्या 35 वर्षीय पतीची त्याच्याच पत्नीने डोक्यात खलबत्ता घालून निर्घृण हत्या केली. कोल्हापुरातील इचलकरंजी शहरातील गावभाग परिसरात ही धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली. सागर दीपक बुरसे (वय 35, रा. त्रिशूल चौक, गावभाग, इचलकरंजी) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, ते इचलकरंजी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. याप्रकरणी त्यांची पत्नी संशयित वैशाली बुरसे हिने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे. या दुर्दैवी आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे वस्त्रनगरी इचलकरंजीत मोठी खळबळ उडाली आहे.
भूतकाळातील दुरावा अन् पुन्हा एकत्र..
मिळालेल्या माहितीनुसार, सागर बुरसे आणि त्यांची पत्नी वैशाली यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक कारणांवरून सातत्याने वाद होत होते. दोघांमधील मतभेद आणि भांडणे विकोपाला गेल्यामुळे काही वर्षांपूर्वी ते एकमेकांपासून विभक्तही झाले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपूर्वी कौटुंबिक पातळीवर मध्यस्थी झाल्यानंतर ते पुन्हा एकत्र राहू लागले होते. परंतु, पुन्हा एकत्र आल्यानंतरही त्यांच्यातील कौटुंबिक वादाचे वादळ पूर्णपणे शमलेले नव्हते; त्यांच्यात किरकोळ व गंभीर कारणांवरून वारंवार खटके उडतच होते.
Kolhapur: नाद केला अन् वाया गेला, पठ्ठ्याने चुलत्यांचे 15 तोळे दागिने चोरले, खरेदी केली नवीकोरी ‘थार’, पाहा VIDEO
पहाटे वाद अन् झोपेतच क्रूर हत्या
रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास सागर आणि वैशाली यांच्यात पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले. भांडण शांत झाल्यानंतर पती सागर हे गाढ झोपी गेले. पती झोपल्यानंतर संशयित आरोपी पत्नी वैशाली हिने रागाच्या भरात संधी साधली. तिने घरातील खलबत्ता उचलून झोपेत असलेल्या सागर यांच्या डोक्यात जोरात घातला. या भीषण हल्ल्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे आणि प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने सागर यांचा जागीच करुण अंत झाला.
सकाळी आवरावर करुन मुलीसह पोलीस ठाणे गाठले..
पतीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संशयित वैशाली हिने घरातील नियमित दिनक्रम आटोपला. सकाळी उठल्यानंतर तिने नेहमीची कामे उरकली आणि त्यानंतर आपले वडील व भावाला पतीचा खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर भावाला व लहान मुलीला सोबत घेऊन तिने थेट गावभाग पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलिसांसमोर तिने पतीचा खून केल्याची थेट कबुली दिली.
नातेवाईकांचा आक्रोश व परिसरात शांतता
महिलेने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर गावभाग पोलीस पोलिसांच्या पथकाने तातडीने त्रिशूल चौकातील घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागर यांच्या मृतदेहाची पाहणी केली व संशयित आरोपी वैशाली हिला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात पती-पत्नीच्या भांडणातून ही घटना घडल्याचे समोर आले असून गावभाग पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, हत्येची माहिती मिळताच सागर यांच्या आई, बहिणीसह इतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत प्रचंड आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.