मारेगाव येथील महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय अंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन..!

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

स्थानिक कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे अंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती व मारेगाव येथील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 ते 18 ऑक्टोबर 2023 रोजी पार पडत आहे.

जगभरातील क्रीडा क्षेत्राचा परीघ विस्तारत असून त्यात भारताचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढत आहे.क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडताना दिसतात.त्याचबरोबर स्थानिक पातळीवर म्हणजेच जिल्हा, तालुका,स्तरावरही खेळांविषयीची जागरूकता वाढलेली दिसून येते हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांच्या अथक परिश्रमातून मारेगाव तालुक्यामध्ये प्रथमच अशा विद्यापीठस्तरीय अंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
सदर स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.जीवन पाटील कापसे साहेब व प्रा.डॉ.विकास टोणे,सदस्य, निवड समिती शारीरिक शिक्षक विभाग,संत गाडगे बाबा,अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री गजानन महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय,मुकुटबन येथील प्राचार्य डॉ. संजय घरोटे,प्रा.डॉ. दिलीप मालेकर,शारीरिक शिक्षण संचालक व प्रा. डॉ.अभिजित आवरी आदि मान्यवर उपस्थित राहतील.

तरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश घरडे सर यांच्या मार्गदर्शनातून आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी तमाम मारेगाव तालुक्यातील क्रीडा रसिकांनी विद्यापीठ स्तरावरून येणाऱ्या 42 संघाचे मनोबल वाढवण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आव्हान महाविद्यालयातील प्रा. डॉ.नितेश राऊत यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!