पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या कामगिरीचा गौरव केला. देशाची अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, डिजिटल व्यवहार, महिला सक्षमीकरण, गरिबी निर्मूलन आणि जागतिक स्तरावरील भारताची वाढती प्रतिष्ठा यांचा उल्लेख करत फडणवीस यांनी मोदी यांना “केवळ सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान नव्हे, तर देशाचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान” असे संबोधले. याचवेळी त्यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवरही टीका करत काँग्रेसला “बुडते जहाज” म्हटले. मोदींनी मोडला नेहरूंचा विक्रम फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4,399 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ निवडून आलेल्या पंतप्रधानांचा विक्रम मोडला आहे. महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेच्या वतीने त्यांनी मोदी यांचे अभिनंदन केले. त्यांच्या मते, एखाद्या नेत्याचा कार्यकाळ किती मोठा आहे यापेक्षा त्या काळात देशासाठी काय काम झाले हे अधिक महत्त्वाचे असते. मोदी यांनी जगभरात भारताची प्रतिष्ठा उंचावली असून आज एनडीए देशातील 22 राज्यांमध्ये सत्तेत आहे. देशाच्या सुमारे 80 टक्के भूभागावर एनडीएची सरकारे आहेत, असे त्यांनी सांगितले. ‘भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था’ देशाच्या आर्थिक प्रगतीचे आकडे मांडताना फडणवीस म्हणाले की, भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. जागतिक मंदीचे वातावरण असतानाही भारताचा विकासदर 7 टक्क्यांहून अधिक आहे आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे. भारताची अर्थव्यवस्था 345 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली असून देश 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत आहे. भारताकडे सध्या 67 लाख कोटी रुपयांहून अधिक परकीय चलन साठा असून पुढील 11 महिन्यांच्या आयातीचा खर्च भागवण्याची क्षमता देशाकडे आहे ’94 टक्के परदेशी कर्ज एकाच दिवसात फेडण्याची क्षमता’ भारताच्या आर्थिक स्थितीबाबत बोलताना फडणवीस यांनी महत्त्वाचा दावा केला. ते म्हणाले, “एकेकाळी भारत परदेशी कर्जाच्या ओझ्याखाली दबला होता. कर्जफेडीसाठीही पुरेसे पैसे उपलब्ध नसत. मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. भारताकडे इतका परकीय चलन साठा आहे की देशावरील परदेशी कर्जापैकी तब्बल 94 टक्के कर्ज एका दिवसात फेडण्याची क्षमता आपल्याकडे आहे.” यूपीए सरकारच्या काळात एका महिन्याच्या आयातीसाठीही पुरेसा परकीय चलन साठा नव्हता, असा आरोप करत त्यांनी सध्याच्या आर्थिक स्थितीची तुलना तत्कालीन परिस्थितीशी केली. ‘यूपीएच्या काळात जे शक्य नव्हते ते आज वास्तव’ यूपीए सरकारच्या काळात देशाकडे एका महिन्याच्या आयातीची क्षमता नव्हती, असा दावा करत फडणवीस म्हणाले की, आज भारताकडे 11 महिन्यांच्या आयातीची क्षमता आहे. जीएसटी संकलन 22 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले असून त्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रात भारताने चीनलाही मागे टाकले असल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की, यूपीआयद्वारे 314 लाख कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत आणि भारताने विकसित केलेली यूपीआय प्रणाली आता 30 देश वापरत आहेत. लवकरच ब्राझीलही यूपीआय प्रणाली स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सेमिकंडक्टर क्षेत्रात भारत वैश्विक शक्ती बनतोय’ भारत आता केवळ सेवा क्षेत्रापुरता मर्यादित नसून उत्पादन क्षेत्रातही मोठी झेप घेत आहे. विशेषतः सेमिकंडक्टर उद्योगात भारत जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात भारताला 32 आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले असून त्यापैकी 22 सर्वोच्च स्वरूपाचे सन्मान आहेत. यावरून जगाचा भारताच्या नेतृत्वावर असलेला विश्वास स्पष्ट होतो, असे ते म्हणाले. ‘25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले’ मोदी सरकारची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे तीव्र गरिबीतून 25 कोटी लोकांना बाहेर काढण्यात यश मिळाले, असे फडणवीस यांनी सांगितले. जागतिक रेटिंग एजन्सींनीही या बदलाची दखल घेतल्याचा दावा त्यांनी केला. देशातील 81 कोटी नागरिकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 11 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 4 लाख कोटी रुपयांहून अधिक मदत देण्यात आली आहे. प्राप्तिकर सवलतीची मर्यादा 12.75 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 4 कोटी घरे बांधली गेली आहेत आणि आणखी 3 कोटी घरे बांधली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. महिला सक्षमीकरणावर भर महिला सक्षमीकरण हे मोदी सरकारच्या धोरणाचे केंद्रबिंदू असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, देशात आतापर्यंत 3 कोटी महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत आणि हा आकडा लवकरच 6 कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. देशातील 32 कोटी महिलांची बँक खाती उघडण्यात आली आहेत. सैन्यातील महिलांची संख्या 3 हजारांवरून 11 हजारांपर्यंत वाढली आहे. महिला-केंद्रित अर्थव्यवस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही’ गेल्या 12 वर्षांत मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही, असा दावा फडणवीस यांनी केला. डिजिटल पद्धतीने थेट लाभ हस्तांतरण (DBT) केल्यामुळे विविध योजनांमधून 58 लाख कोटी रुपयांची मदत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचली. तसेच ‘जेम’ पोर्टलमुळे सरकारी खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता वाढली आणि भ्रष्टाचाराला आळा बसला, असे ते म्हणाले. पायाभूत सुविधांवर विक्रमी खर्च देशातील पायाभूत सुविधांवरील खर्चात मोठी वाढ झाल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले की, पूर्वी सुमारे 2 लाख कोटी रुपये खर्च होत होते, तर आता हा खर्च 12 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. देशात दररोज सरासरी 34 किलोमीटर महामार्ग बांधले जात आहेत. त्यामुळे भारताच्या विकासाला वेग मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस-विलीनीकरण चर्चेवर फडणवीसांचा टोला दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना” अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली. “जो काँग्रेसचाही नाही आणि राष्ट्रवादीचाही नाही, तो या विषयावर बोलतो,” असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसला “बुडते जहाज” म्हणत ते म्हणाले की, इतर पक्षांचे नेते इतके हुशार आहेत की ते बुडत्या जहाजात पाय ठेवणार नाहीत. मात्र जर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तरी भाजपचे नुकसान होणार नाही. उलट विरोधकांची राजकीय जागा कमी झाली तर त्याचा फायदा भाजपलाच होईल. त्यामुळे या घडामोडींवर भाजपची भूमिका ‘वेट अँड वॉच’ अशीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी, कर्जमाफी आणि पेरणीबाबतही भाष्य पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भूमिका मांडली. शेतकऱ्यांनी सरकारच्या सूचनेनुसारच पेरण्या कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. जनावरांसाठी वैरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफीबाबत सरकारने उपसमिती स्थापन केली असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्हे, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोयाबीन आणि कापूस या पारंपरिक पिकांच्या पलीकडे जाऊन पीकपद्धतीत बदल करण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.
