बातमी ऐका (Marathi Voice Reader)
लातूर जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि गावठी हातभट्ट्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली २७ जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात “मास रेड’ (सामूहिक छापेमारी) मोहीम राबवण्यात आली. या धडक कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या मोहिमेत देशी, विदेशी मद्य आणि हातभट्टीच्या अड्ड्यांवर अचानक छापे टाकण्यात आले. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात तब्बल ८९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ९० जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ९९ हजार २५० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. अवैध व्यावसायिकांवर केवळ गुन्हे दाखल करून न थांबता, वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपींवर कलम ९३ आणि थेट एमपीडीए (स्थानबद्धता कायदा) अंतर्गत कारवाईचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. नागरिकांनी कोणत्याही दबावाशिवाय अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना द्यावी, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले.