बातमी ऐका (Marathi Voice Reader)
बीड : राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपांचा वापर करत आहेत. वीज बचतीसह सिंचनासाठी सोलर पंप उपयुक्त ठरत असले तरी त्याचा वापर करताना आवश्यक सुरक्षिततेचे नियम पाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषतः ओलसर वातावरण, विजांचा कडकडाट आणि पाण्याचा संपर्क यामुळे विद्युत धोक्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोलर यंत्रणा हाताळताना कोणतीही घाई किंवा निष्काळजीपणा टाळावा. बीड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सोलर क्षेत्रात तांत्रिक सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले पिंटू राठोड यांनी शेतकऱ्यांना सोलर प्रणालीचा वापर करताना आवश्यक सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन कसं करायचं याबद्दल सांगितलं आहे.
सोलर पॅनेल, कंट्रोल बॉक्स, इन्व्हर्टर आणि वायरिंगची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. कुठेही वायर तुटलेली, सोललेली किंवा जोड सैल झालेला आढळल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करून घ्यावी. सोलर यंत्रणेला योग्य अर्थिंग असणे अत्यंत गरजेचे आहे. पंप सुरू करताना किंवा बंद करताना हात कोरडे असावेत. ओल्या हाताने स्विच, कंट्रोल पॅनेल किंवा विद्युत जोडण्यांना स्पर्श करणे टाळावे. कोणताही बिघाड झाल्यास स्वतः दुरुस्ती करण्याऐवजी प्रशिक्षित तंत्रज्ञाची मदत घ्यावी.
पावसाळ्यात सर्वात महत्त्वाची खबरदारी म्हणजे चालू पावसामध्ये सोलर पॅनेलच्या खाली किंवा सोलर संरचनेजवळ जाऊन बसणे किंवा थांबणे टाळावे. पावसाच्या वेळी विजांचा कडकडाट होत असल्यास सोलर यंत्रणेजवळ जाणे धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत पंप बंद ठेवावा आणि हवामान सामान्य झाल्यानंतरच आवश्यक कामे करावीत. तसेच पावसाच्या वेळी सोलर पॅनेलची स्वच्छता करणे किंवा कोणतीही दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू नये.
शेतामध्ये सोलर पंप बसविल्यानंतर त्याच्या परिसरात अनावश्यक वस्तू ठेवू नयेत. मुलांना किंवा अनोळखी व्यक्तींना कंट्रोल पॅनेलजवळ जाऊ देऊ नये. पॅनेलची स्वच्छता करायची असल्यास मुख्य स्विच बंद करूनच ती करावी. एमसीबी, फ्यूज आणि इतर सुरक्षा उपकरणे व्यवस्थित कार्यरत आहेत का, याची नियमित खात्री करणेही गरजेचे आहे. दर्जेदार साहित्य वापरून अनुभवी तंत्रज्ञांकडूनच सोलर यंत्रणा बसविल्यास भविष्यातील धोके कमी होतात.
एखाद्या व्यक्तीला करंट लागल्याचा संशय आल्यास सर्वप्रथम मुख्य वीजपुरवठा बंद करावा. करंट लागलेल्या व्यक्तीला थेट हात लावू नये. त्याऐवजी कोरड्या लाकडी काठी किंवा विद्युत प्रवाह न वाहणाऱ्या वस्तूच्या मदतीने त्या व्यक्तीला विद्युत स्रोतापासून दूर करावे आणि तातडीने 108 रुग्णवाहिका किंवा जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा. सोलर पंप हा शेतीसाठी फायदेशीर पर्याय असला तरी सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळल्यासच त्याचा लाभ कोणत्याही अपघाताशिवाय घेता येईल.