बातमी ऐका (Marathi Voice Reader)
नरेश पाटील, प्रतिनिधी कल्याण: ठाणे जिल्ह्याच्या कल्याण शहरातून महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका २२ वर्षीय विवाहित तरुणीने भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस शैलेश पाटील यांच्याविरोधात सामूहिक अत्याचाराचा आरोप केला आहे. दोघांनी आपल्याला एका खासगी ठिकाणी घेऊन जात आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात दोघांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका राजकीय नेत्यावर अशाप्रकारे गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही विवाहित आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिचा आपल्या पतीशी वाद सुरू होता. याच वादात मध्यस्थी करण्यासाठी पीडित तरुणीने माजी आमदाराकडे मदत मागितली होती. मात्र माजी आमदाराने मदत करण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. तिच्यासोबत नेमकं काय घडलं? याची सविस्तर माहिती पीडितेनं न्यूज १८ मराठीशी बोलताना दिली आहे.
पीडित तरुणीने नेमकं काय सांगितलं?
न्यूज १८ मराठीशी बोलताना पीडित तरुणीने सांगितलं की, "माझा माझ्या पतीशी वाद झाला होता. याबाबत मी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडे मदत मागितली होती. त्यांनी मध्यस्थी करण्याचं कारण देऊन मला राहत्या घराच्या ठिकाणी आपण भेटू आणि याच्यावरती चर्चा करू, असं सांगत भेटायला बोलवलं होतं. यानंतर त्यांनी मला शैलेश पाटील यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवरती नेऊन या दोघांनी माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवून माझ्यासोबत बलात्कार केला. तसेच त्यांनी मला जबरदस्ती दारू पाजली. त्यांच्याकडे जी गन होती, ती गन दाखवून माझ्यावरती शारीरिक संबंध ठेवले. अत्याचारानंतर नरेंद्र पवार रात्री २ वाजता त्यांच्या घरी निघून गेले आणि शैलेश पाटील यांनी नंतर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले."
"त्यानंतर पहाटे ४ वाजता शैलेश पाटील यांचा केअरटेकर देवा यांनी मला माझ्या राहत्या घरी सोडलं. मी खूप घाबरली होती. हा प्रकार १२ सप्टेंबरच्या रात्री म्हणजे गणपतीच्या आदल्या दिवशी घडला. मी घाबरली होती, मी माझ्या घरच्यांना सुद्धा सांगितलं नव्हतं. पण मी कांचन कुलकर्णी ताईंची आज मदत घेतली आणि धाडस करून पोलीस स्टेशनला आले."
आमदाराकडे मदत मागण्यासाठी जाण्याच्या कारणाबद्दल विचारलं असता पीडित तरुणीने सांगितलं की,"माझं आणि नवऱ्याचे थोडे मतभेद होते. ते बोलले की सेटलमेंटसाठी आम्ही तुला मदत करतो. पण त्यांनी माझ्यावर अत्याचार केला. याच्याविरुद्ध माझ्याकडे सगळे पुरावे सुद्धा आहेत. माझ्याकडे व्हिडिओ आणि चॅटिंग देखील आहे. "
पीडित तरुणी पुढे म्हणाली, "मला आता फक्त न्याय हवा आहे. कारण या दोघांना शिक्षा झाली पाहिजे. अशा कित्येक तरी महिला असतील ज्यांच्यासोबत त्यांनी असं केलं असेल. पण बाकीच्या महिला न बोलता त्यांनी काहीच केलं नाही. मला फक्त आता पोलिसांकडून किंवा गव्हर्नमेंटकडून सुरक्षा मिळाली पाहिजे. मी आणि माझा परिवार हे दोघं सुरक्षित राहिले पाहिजे. कारण यात एक माजी आमदार आणि दुसरे बडतर्फ पोलीस आरोपी आहेत. शैलेश पाटीलवर याआधी पण बलात्कार, गँगरेप आणि बाकीच्या काही प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्यांनी मला उद्या काही इजा नाही केली पाहिजे. जर मला काय झालं तर याची जबाबदार नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील असतील."