बातमी ऐका (Marathi Voice Reader)
मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारताची वनडे टीम वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरिज खेळत असेल तेव्हाच भारताची टी-20 टीम जपानमध्ये एशियन गेम्स खेळणार आहे, त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये इंग्लंडविरुद्ध वनडेमध्ये खेळेलेले 6 दिग्गज खेळाडू दिसणार नाहीत.
श्रेयस अय्यर, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अशर्दीप सिंग आणि जसप्रीत बुमराह एशियन गेम्समध्ये खेळणार असल्यामुळे त्यांची वेस्ट इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियात निवड झालेली नाही. हे सर्व खेळाडू इंग्लंडमध्ये झालेल्या वनडे सीरिजचा भाग होते.
नितीश रेड्डी कुठे खेळणार?
एशियन गेम्ससाठी ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डीची टीम इंडियात निवड झाली होती, पण आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही नितीश रेड्डी टीममध्ये आहे. वनडे सीरिज आणि एशियन गेम्स एकाच वेळी होणार असल्यामुळे नितीश कुमार रेड्डी कुठे खेळणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता, यावर बीसीसीआयने उत्तर दिलं आहे. नितीश रेड्डीचं नाव एशियन गेम्समधून काढलं असून तो आता वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरिज खेळेल, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. 27 ऑक्टोबरपासून भारत-वेस्ट इंडिज वनडे सीरिजला सुरूवात होईल, तर एशियन गेम्समध्ये टीम इंडिया पहिला सामना 28 सप्टेंबरला खेळणार आहे.
नितीश कुमार रेड्डीने मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यातून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून रेड्डीने 6 वनडे मॅच खेळल्या आहेत, यात त्याने 100 रन केल्या असून 2 विकेट घेतल्या आहेत. जून 2026 मध्ये नितीशने अफगाणिस्तानविरुद्ध 2 वनडे मॅच खेळल्या, पण यात त्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही, तर धर्मशालामध्ये झालेल्या वनडेमध्ये त्याने 2 विकेट घेतल्या होत्या. अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 सीरिजमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात नितीशने 3 विकेट घेतल्या, या कामगिरीबद्दल त्याला प्लेयर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं, याच्या 24 तासांमध्येच नितीशची भारताच्या वनडे टीममध्येही निवड झाली आहे.
वरुण चक्रवर्ती बाहेर
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यानंतर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला दुखापत झाली, त्यामुळे तो एशियन गेम्समधूनही बाहेर झाला आहे. वरुण चक्रवर्तीऐवजी लेग स्पिनर ऑलराऊंडर विपराज निगम याची टीम इंडियात निवड झाली आहे. विपराज टीम इंडियासोबत जपानला एशियन गेम्ससाठी जाईल.
एशियन गेम्ससाठी भारतीय टीम
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी, यश ठाकूर, विपराज निगम
भारताची वनडे टीम
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, अकीब नाबी, यशस्वी जयस्वाल, नमन धीर
भारताची टी-20 टीम
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, संजू सॅमसन, तिलक वर्मा, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयंक यादव
भारत-वेस्ट इंडिज सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे- 27 सप्टेंबर, तिरुवनंतपुरम, दुपारी 2 वाजता
दुसरी वनडे- 30 सप्टेंबर, गुवाहाटी, दुपारी 2 वाजता
तिसरी वनडे- 3 ऑक्टोबर, मुल्लानपूर, दुपारी 2 वाजता
पहिली टी-20 – 6 ऑक्टोबर, लखनऊ, संध्याकाळी 7 वाजता
दुसरी टी-20- 9 ऑक्टोबर, रांची, संध्याकाळी 7 वाजता
तिसरी टी-20- 11 ऑक्टोबर, इंदूर, संध्याकाळी 7 वाजता
चौथी टी-20- 14 ऑक्टोबर, हैदराबाद, संध्याकाळी 7 वाजता
पाचवी टी-20- 17 ऑक्टोबर, बंगळुरू, संध्याकाळी 7 वाजता