बातमी ऐका (Marathi Voice Reader)
छत्रपती संभाजीनगर : कामाच्या ठिकाणी आलेल्या महिला कर्मचाऱ्याला पाठीमागील खोलीत बोलावून तिच्याशी असभ्य वर्तन केल्याचा प्रकार बीड बायपास रस्त्यावरील आमराई परिसरात समोर आला आहे. आरोपीने महिलेचा मोबाईल बाजूला ठेवून तिला धमकी दिली आणि त्यानंतर बळजबरीने मिठी मारल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवृत्ती उदे (रा. शंकर नगर रोड, ईटखेडा परिसर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आरोपीकडे कामानिमित्त गेली होती. 19 सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास ही महिला कामाच्या ठिकाणी असताना आरोपीने तिला पाठीमागील खोलीत बोलावले.
महिला खोलीत गेल्यानंतर आरोपीने तिचा मोबाईल बाजूला ठेवला. त्यानंतर तिला धमकी देत तिच्याशी असभ्य वर्तन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एवढेच नाही तर आरोपीने महिलेच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने मिठी मारल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने अखेर पोलिसांकडे धाव घेत संपूर्ण घटनेची माहिती दिली.
महिलेच्या तक्रारीनंतर सातारा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत निवृत्ती उदे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या अनुषंगाने पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक एकीलवाले या प्रकरणाचा तपास करत आहेत.