बातमी ऐका (Marathi Voice Reader)
छत्रपती संभाजीनगर: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या ओळखीच्या मित्रावर धारदार ब्लेडने हल्ला केला. छत्रपती संभाजीनगरातील टीव्ही सेंटर परिसरातील मटन मार्केटजवळ ही धक्कादायक घटना घडली. रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात रोहित सुनील जाधव (27, रा. सिद्धार्थ नगर) हा गंभीर जखमी झाला. त्याच्या गळ्यावर ब्लेडने खोल वार झाल्याने तब्बल 16 टाके पडले आहेत. याप्रकरणी राहुल साठे (25, रा. शताब्दी नगर) याच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित रविवारी रात्री भाजी खरेदी करण्यासाठी टीव्ही सेंटर परिसरात गेला होता. त्यावेळी रस्त्यात त्याला राहुल भेटला. राहुलने दारू पिण्यासाठी रोहितकडे पैशांची मागणी केली. मात्र, सध्या आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगत रोहितने पैसे देण्यास नकार दिला. पैसे देण्यास नकार मिळताच राहुलने रोहितला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर ‘तू शिवीगाळ का करतोस?’ असा जाब रोहितने विचारला. यानंतर राहुलने त्याला मारहाण सुरू केली. दारूसाठी पैसे दिले नाहीस, तोपर्यंत मारत राहीन, अशी धमकी देत त्याने वाद घातला.
राहुलने शर्टच्या खिशातून धारदार ब्लेड बाहेर काढले आणि रोहितच्या गळ्यावर वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे रोहित गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच रोहितच्या काकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी रोहितला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. गळ्यावर झालेल्या गंभीर दुखापतीवर डॉक्टरांनी तातडीने उपचार करून शस्त्रक्रिया केली. त्याच्या गळ्यावर तब्बल 16 टाके घालण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रोहितने दिलेल्या जबाबावरून सिडको पोलिसांनी राहुल साठे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या घटनेत कटरने हल्ला
दरम्यान, दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून सिद्धार्थ नगर परिसरात अशाच प्रकारची आणखी एक घटना 29 सप्टेंबर रोजी घडली होती. विनोद परमेश्वर आढाव (40) हे टीव्ही सेंटर परिसरातील साई पान सेंटर येथे थांबले असताना दादाराव धनराज (रा. सिद्धार्थ नगर) याने त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र, घरभाडे आणि किराणा भरायचा असल्याने विनोद आढाव यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांच्यावर कटरने हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून सिद्धार्थ नगर परिसरात अल्पावधीत अशा प्रकारच्या दोन घटना घडल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.