बातमी ऐका (Marathi Voice Reader)
हिंगोली: बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग म्हणून श्री औंढा नागनाथ मंदिर ओळखले जाते. श्री नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. सोमवारी, 5 ऑक्टोबरपासून एक महिना श्री नागनाथ मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे. मंदिराच्या 193 कोटी 55 लाख रुपयांच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना गती आली असून आता गर्भगृहातील अंतर्गत दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येत आहे. हे काम सुरक्षित पूर्ण करण्यासाठी दर्शन बंद ठेवण्यात येत आहे, अशी माहिती श्री नागनाथ संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांनी दिली.
प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिर परिसरात सध्या विविध विकासकामे सुरू आहेत. परिसराची पातळी एकसमान करण्यासाठी खोदकाम केले जात आहे. जुन्या आणि जीर्ण पायऱ्या काढण्याचे काम हाती घेण्यात आले असून मंदिराचा रथ ठेवण्यात येणाऱ्या जागेचे सुशोभीकरण केले जात आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे या विकासकामांकडे लक्ष देत असून कामांचा नियमित आढावा देखील घेण्यात येत आहे.
शनिवारी 7 राशींचं भाग्य चमकणार, हवं ते मिळणार, पण क्षुल्लक चुका भोवणार, जाणून घ्या राशीभविष्य
गर्भगृहाचे दुरुस्ती काम
पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालकांनी 29 सप्टेंबर रोजी पत्र दिले आहे. त्यानुसार मंदिराच्या आतील गर्भगृहात दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. काम सुरू असताना भाविक व पर्यटकांची गर्दी झाल्यास दुरुस्तीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
दैनंदिन धार्मिक विधी सुरूच
दरम्यान, भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद असले, तरी श्रींचे दैनंदिन धार्मिक कार्यक्रम नियमित सुरू राहतील. सकाळची पूजा दुपारी 12 वाजेपर्यंत, दुपारी 4 वाजता श्रींचे स्नान व महानैवद्य तसेच रात्रीची शेजारती नियमानुसार होईल. गर्भगृहातील पूजा आणि इतर धार्मिक विधी भोपी, माळी, गुरव व कोळी पुजाऱ्यांच्या हस्ते करण्यात येतील.