बातमी ऐका (Marathi Voice Reader)
कोल्हापूर: रमणमळा पोस्ट कार्यालय चौकात भरदिवसा गोळीबार करून केलेल्या हत्येनं कोल्हापूर हादरलं. पिता आणि दोन मुलांनी केलेल्या या हल्ल्यात हेमंत बाबासो गायकवाड (वय 29) याचा मृत्यू झाला होता. मे 2013 मधील या प्रकरणात आता मोठं अपडेट आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी पिता-पुत्रांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राजेंद्र आनंदा सावंत (वय 63), अभिजित राजेंद्र सावंत (32), धैर्यशील राजेंद्र सावंत (36 तिघेही रा. विचारेमाळ) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
नेमकं प्रकरण काय?
कोल्हापुरातील रमणमळा परिसरात वर्चस्ववादावरून हेमंत गायकवाड, अभिजित व धैर्यशील सावंत या तिघांमध्ये किरकोळ वाद होता. हेमंत आणि अभिजित यांच्यात नेहमीच खटके उडत होते. यातूनच त्यांच्यात संघर्ष होता. 24 मे 2013 रोजी रमणमळा येथील पोस्ट कार्यालय चौकात सावंत पिता-पुत्रांनी मिळून हेमंत गायकवाड याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर ते तिघेही मोटारीतून घटनास्थळावरून पसार झाले.
कोल्हापुरात वाईट घडलं! लेकीचं लग्न ठरलेलं, आई कामाला गेली अन् ओढणीमुळं गमावला जीव
या हल्ल्यात हेमंत गायकवाड याच्या डोक्यात गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर शशिकांत गायकवाड हा जखमी झाला होता. या घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांनी अभिजित सावंत, धैर्यशील सावंत यांना अटक केली होती. तर फरार आरोपी राजेंद्र सावंतला लॉकडाऊन काळात अटक झाली. या तिघांवर जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या प्रकरणात पोलिसांनी तब्बल चार पिस्तूल ताब्यात घेतले होते. यातील 9 एमएमच्या खासगी पिस्तूलमधून गायकवाडवर गोळीबार केल्याचे फॉरेन्सिककडून स्पष्ट झाले. तीन राऊंडपैकी एक गोळी हेमंतच्या डोक्यात, दुसऱ्या गोळीचा नेम चुकला होता. तर तिसरी गोळी शशिकांतला घासून गेल्याने तो जखमी झाला होता.
दरम्यान, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्यासमोर याप्रकरणात सुनावणी झाली. सरकारी वकील सुजाता इंगळे यांचा युक्तिवाद, बॅलेस्टिक रिपोर्ट, तांत्रिक पुरावे, 11 साक्षीदारांचे जबाब ग्राह्य मानले. न्यायालयाने याप्रकरणात 13 वर्षांनी निकाल दिला. यात तिन्ही आरोपी बाप-लेकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अनुसंपावर भरती, कॉन्स्टेबल ते निरीक्षक
राजेंद्र सावंत हा 1988 मध्ये उत्पादन शुल्क विभागात अनुकंपा तत्त्वावर कॉन्स्टेबल झाला होता. 2001 मध्ये तो उपनिरीक्षक झाला. पुढे 2013 मध्ये तो निरीक्षक झाला होता. त्यानंतर शिरोली, कोल्हापूर, ओरोस (सिंधुदुर्ग) या ठिकाणी त्याने काम केले. कोल्हापुरात गोळीबार केला तेव्हा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा पदभार देखील त्याच्याकडे होता.