बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर : सध्या सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरात पावसाने पाठ फिरवल्यामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी गावचे रहिवासी असलेले संजय राजगिरे या होतकरू पशुपालकाने आपल्या मुक्या जनावरांना वाचवण्यासाठी हतबल होत चक्क आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या भीषण संकटात शासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे.
उधारी वाढल्याने अखेरचा निर्णय
संजय राजगिरे हे एक अल्पभूधारक शेतकरी असून ते पशुपालनाचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. मात्र, यावर्षीच्या पर्जन्यमान अभावी पडलेल्या दुष्काळामुळे जनावरांसाठी लागणारा सुका व ओला चारा पूर्णपणे संपला आहे. बाजारात चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. जनावरांचे पोट भरण्यासाठी संजय यांनी सुरुवातीला नातेवाईक, मित्रपरिवार आणि ओळखीच्या लोकांकडून उधारीवर पैसे गोळा करून जनावरांसाठी चारा विकत आणला.
परंतु, दिवसेंदिवस दुष्काळ लांबत गेल्यामुळे आणि उधारीचा डोंगर वाढत गेल्याने कोणीही पुढे पैसे देण्यास नकार दिला. जनावरे डोळ्यांसमोर उपाशी मरत असल्याचे पाहून अखेर हतबल झालेल्या संजय यांनी स्वतःच्या पत्नीचे अंगावरील दागिने गहाण ठेवून 90 हजार रुपयांची रक्कम उभी केली आणि जनावरांसाठी तातडीने चारा खरेदी केला.
शासनाकडे मदतीची आर्त हाक
आम्ही पोटच्या पोराप्रमाणे जनावरांचा सांभाळ करतो, पण दुष्काळामुळे त्यांना जगवणे आता अशक्य झाले आहे. शासनाने तात्काळ चारा छावण्या सुरू करून शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा जनावरांसाठी थेट आर्थिक मदत तरी द्यावी, अशी आर्त मागणी पशुपालक संजय राजगिरे यांनी केली आहे. शासनाने या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर शेतकरी आणि पशुपालकांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
संजय राजगिरे यांच्या या दुर्दैवी परिस्थितीवरून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुष्काळजन्य दाहकतेचा अंदाज येतो. ऐन संकटाच्या काळात प्रशासनाने या भागातील पशुपालकांसाठी तातडीने चारा छावण्या आणि आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.