बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Neeraj Yadav Death Case : गेल्या दोन दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असलेल्या नीरज यादव मृत्यू प्रकरणात आता नवा ट्विस्ट पहायला मिळत आहे. आशियाई पॅरा गेम्समध्ये 3 वेळा सुवर्णपदक जिंकणारा नामांकित खेळाडू नीरज यादव याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेने क्रिडाविश्वास खळबळ उ़डाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता नीरज यादव प्रकरणात महिलेचा अँगल समोर आला आहे. ज्या महिलेने नीरजला हॉस्पिटलमध्ये नेलं, त्याच महिलेसोबत नीरज मृत्यूच्या काही तास आधी सोबत होता, अशी माहिती समोर आली आहे. नेमकी महिला कोण? जाणून घ्या…
नीरजच्या मृत्यूचं कारण काय?
नीरज यादव मृत्यू प्रकरणात महिलेचा नवा अँगल समोर आला असून नीरजच्या मृत्यूचं कारण देखील स्पष्ट होत आहे. 27 ऑक्टोबर 2026 रोजी संबंधित त्याला भेटायला सोनीपतला गेली होती. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिनं नीरजला सांगितलं की, ती यापुढे त्याच्या संपर्कात राहू शकत नाही. त्यानंतर नीरज तिला त्याच्या स्कॉर्पिओ-एन कारमधून दिल्लीतील मौजपूरला घेऊन गेला. महिला कारमधून खाली उतरली अन् मेट्रोने निघायला लागली.
महिलेला संशय आला अन्…
रात्री सुमारे 9 वाजता, महिलेला संशय आला आणि ती मौजपूर मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ पोहोचली. तिथे तिने नीरजला त्याच्या गाडीजवळ रस्त्यावर पडलेले पाहिले. त्यानंतर संबंधित महिला त्याला दिल्लीच्या GTB रुग्णालयात घेऊन गेली, जिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं गेलं. 28 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री सुमारे 12:08 वाजता पोलिसांना रुग्णालयातून माहिती मिळाली.
Neeraj Yadav Death : भारताला तीन वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवने संपवलं आयुष्य; फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत सापडली बॉडी!
कोण होता नीरज यादव?
नीरज यादव हा भारताच्या अत्यंत यशस्वी आणि गुणवान पॅरा-ॲथलीट्सपैकी एक मानला जायचा. वयाच्या 7 व्या वर्षी त्याला पोलिओचा त्रास झाला होता. पोलिओमुळे अपंगत्व आले तरी त्याने कधीही हार मानली नाही आणि खेळाची आवड जपली. 2005 ते 2012 या काळात त्याने व्हीलचेअर टेनिसमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यानंतर त्याने पॅरा-ॲथलेटिक्सकडे मोर्चा वळवला आणि तिथं आपलं करिअर तयार केलं. नीरजला जास्त संधीच मिळत नसायची. पण त्याच्या कारकिर्दीला खरा ब्रेकथ्रू 2015 च्या दिल्ली स्टेट ॲथलेटिक्स मीटमध्ये मिळाला होता. या स्पर्धेत त्याने शॉट पुट, जॅव्हलिन थ्रो आणि डिस्कस थ्रो या तिन्ही स्पर्धांमध्ये थेट 3 गोल्ड मेडल जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. F55 कॅटेगरीमध्ये त्याने भारतासाठी अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर चमकदार कामगिरी केली होती. त्याने भारताला तीन गोल्ड मेडल जिंकून दिले होते. अशातच आता त्याच्या अचानक जाण्याने क्रिडाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.