शासनाची रेती ठरत आहे मृगजळ

रेती अभावी अनेक घरे अर्धवटच

अनेकांच्या घराचे काम थांबले! घरकुल धारकांचा टाहो!

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून घरकुलसह इतर बांधकामांना रेती मिळत नसल्याने बांधकामे ठप्प झाली आहेत. तहसील,पंचायत समिती कार्यालयात गरजू रेती मिळविण्याकरिता चकरा मारत आहे.

मात्र शासनाच्या उदासीन धोरणाने घरकुल लाभार्थ्यांच्या पदरी घोर निराशाच दिसून येत आहे.रेतीअभावी बांधकामे तर ठप्प झालीच परंतु यावर विसंबून असणारे कामगार,तसेच व्यवसाय मंदावल्याने व्यवसायिकावर उपासमारीची वेळ आली आहे.

गरिबांना हक्काचे पक्के घर मिळवून देणारी घरकुल योजना मारेगाव तालुक्यात रेतीअभावी अधांतरीच असल्याचे दिसून येत आहे.वाळू मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी महाखनिज या पोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद केल्या आहे.परंतु घरकुल बांधकामांना रेती मिळत नसल्याच्या अनेक लाभार्थ्यांची ओरड आजही कायम आहे.

त्यामुळे अनेकांच्या घराची अर्धवट कामे आहेत,तर तर काहींच्या घराची छपाई व्हायचे आहे.तूर्तास हे सर्व अर्धवट असलेले बांधकामं कामगारांना वाकुल्या दाखवत आहे. तर तालुक्यात एकमेव लिलाव झालेला कोसारा रेतीडेपो शोभेची वस्तू ठरू पाहत आहे.


मात्र,अजूनही या रेती डेपोतून तीळमात्र रेती लाभार्थ्यांना मिळाली नाही असे नागरिकांतून बोलल्या जात आहे.रेतीसाठी घरकुल लाभार्थी वणवण फिरत आहे. हा प्रश्न गंभीर असताना लोकप्रतिनिधी प्रशासन कुंभकर्ण झोपत आहे.असा प्रश्न उपस्थिती होत आहे.बांधकामासाठी रेती महत्वाचा घटक असल्याने रेतीच्या दुर्मिळतेमुळे अनेक बांधकामे ठप्प झाली आहेत तर शासकीय कामात चुरीचा सर्रास वापर केला जात असल्याने शासकीय बांधकामे निकृष्ट दर्जाची निर्माण होत आहे. रेती नाही म्हणून बांधकामे नाही यामुळे कामगाराच्या हातांना काम नाही.

तालुक्यातील रेती अभावी संबंधित कामगार मजूर, व्यावसायिक,ठेकेदार,कित्येक दिवसापासून रिकामे आहे, त्यांच्या हाताला काम नाही.परिणामी त्यांच्या वर उपासमारीची वेळ असून घरकुल लाभार्थी रेती साठी क्षणोक्षणी तडफडत आहे.

तर संबंधित व्यावसायिक लोक ग्राहकांची व रेतीची आतुरतेने वाट पाहत असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळवून द्यावी जेणेकरून कामगार, बिल्डिंग मटेरियल व ठेकदार यांच्या वर उपासमारीची वेळ येणार नाही, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रेती ची किचकट असलेली बाब सध्या बाजूला सारून सरळ सरळ रेती लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी तालुक्यातील जनता करीत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!