अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; तीन युवक जखमी

एकाची प्रकृती गंभीर

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील बुरांडा–खडकी येथील युवकांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना बुधवार (३१ डिसेंबर) रोजी सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास बोटणीपासून काही अंतरावर असलेल्या नानाजी (पोड) परिसरात घडली. या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला असून दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुरांडा (खडकी) येथील प्रकाश उद्धव वाघाडे (वय २८), आकाश अंबादास जिरे (वय ३०) आणि मारोती देवराव कामटकर (वय ४०) हे तिघे काही कामानिमित्त बोटणी येथे गेले होते. काम आटोपून दुचाकीने परत बुरांडा येथे येत असताना नानाजी (पोडा) जवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.
या अपघातात प्रकाश वाघाडे हे गंभीर जखमी झाले असून आकाश जिरे व मारोती कामटकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघातानंतर रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही नागरिकाने तात्काळ मारेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच साई मित्र परिवाराच्या ॲम्बुलन्सला पाचारण करण्यात आले.ॲम्बुलन्सद्वारे जखमींना तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जखमींना चंद्रपूर येथे हलविले असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासह पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!