महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीचीच सक्ती:CM फडणवीसांची सारस्वतांच्या मेळ्यात स्पष्टोक्ती; साहित्य संमेलनाचे केले उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीचीच सक्ती असल्याचा पुनरुच्चार केला. महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीचीच सक्ती आहे. इतर कोणत्याही भाषेची सक्ती नाही. पण इंग्रजी, फ्रेन्च व स्पॅनिश सारख्या परदेशी भाषांना पायघड्या घालायच्या आणि इतर भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाही. सर्व भाषांचा सन्मान झाला पाहिजे. पण मातृभाषेचा सन्मान त्याहून अधिक झाला पाहिजे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना त्यांनी भाषा वाद, राजकारण, मराठी संस्कृती आदी विविध विषयांना हात घालत महाराष्ट्रात केवळ मराठीचीच सक्ती असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, आता नुकताच या ठिकाणी मावळत्या संमेलन अध्यक्षांनी नव्या अध्यक्षांना पदभार सोपवला. किती चांगला हा कार्यक्रम झाला. त्यांनी यांच्या हाती राज्य सोपवले. त्यांनी ते स्वीकारले. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. असे राजकारणातही झाले तर किती चांगले होईल. किमान साहित्य क्षेत्रात तरी अजून होत आहे ही चांगली गोष्ट आहे. हे असेच होत रहावे अशी माझी अपेक्षा आहे. स्वराज्याच्या भूमी असलेल्या या सातारा नगरीत हे साहित्य संमेलन होत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपण सर्वजण साहित्याचे सेवेकरी आहोत. हा सेवेचा भाग खऱ्या अर्थाने या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकाद उजळून निघतो आणि आपल्या सर्वांना ही सेवा अविरत चालली पाहिजे अशी प्रेरणा आपल्याला मिळते. सातारा हा संगमांचा प्रदेश मुख्यमंत्री म्हणाले, सातारा केवळ भौगोलिक प्रदेश नाही. हा संगमाचाही प्रदेश आहे. हरीपूरला वारणा व कृष्णेचा संगम होतो. योगायोग कसा आहे पाहा, वारणा काठचे विश्वास पाटील या संमेलनाचे अध्यक्ष झाले. त्यांना अध्यक्षपदाचा पदभार कृष्णा काठच्या ताराबाई भवाळकर यांनी दिला. हा अनोखा संगम आपल्याला या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पहायला मिळाला. हा संगम एकप्रकारे परंपरा व आधुनिकतेचा संगम आहे. अनुभव व विचारांचा संगम आहे. इतिहासाचा व वर्तमानाचा संगम आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने अशा प्रकारचा संगम हीच आपल्या संस्कृतीची ओळख देखील आहे. आध्यात्म, तत्वज्ञान व सामाजिक जीवनात संगम हेच आपल्या संस्कृतीचे ब्रिदवाक्य राहिले आहे. त्यामुळे जगातील जेवढी आक्रमणे झाली, ती सगळी आक्रमणे पचवत त्या – त्या आक्रात्यांच्या संस्कृतीतील जे चांगले आहे, ते या ठिकाणी अनुसरून आपली संस्कडृती अबाधित ठेवण्याचे काम केले. ज्या प्रकारे कोयना कृष्णेस मिळते, वारणा कृष्णेस मिळते, यमुना गंगेत मिळते अशा वेगवेगळ्या नद्या मिळून शेवटी एका नदीचे पात्र तयार होते. त्याच प्रकारे विचारांची आपली संस्कृती ती त्या एका नदीसारखी आहे. त्यात विविध प्रकारचे विचार. अनेकदा परस्परविरोधी विचारही व्यक्त होत असतात. पण या सर्व विचारांच्या मंथनातून एक नदीचा असा प्रवाह तयार होतो की जो संस्कृती म्हणून साहित्य म्हणून आपल्या जाणिवा समृद्ध करतो. जो साहित्य व संस्कृती म्हणून आपल्या विचारांना प्रगल्भ करतो. त्यामुळे ही परंपरा आपल्या मराठी साहित्याने, साहित्य संमेलनांनी, मराठी भाषेने व मराठी भाषेतल्या सारस्वतांनी जपलेली आहे. ती अत्यंत महत्त्वाची आहे. साताऱ्याने सर्वाधिक 17 अध्यक्ष दिले मुख्यमंत्री पुढे म्हणाले, साताऱ्याने सर्वाधिक 6 साहित्य संमेलने भरवली. सर्वाधिक 17 अध्यक्षही साताऱ्यानेच दिले. म्हणजे विक्रमही आहे व पराक्रमही आहे. एका दुर्गाबाई भागवत म्हणाल्या होत्या की, आशय व विषय या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे एका अर्थाने विषय हा विक्रम आहे आणि पराक्रम हा आशय आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. साताऱ्याचा संबंध साहित्य संमेलनाशी अतिशय ऐतिहासिक काळांमध्ये राहिला आहे. 50 वर्षांपूर्वी जेव्हा आणीबाणी लागली होती, तेव्हा याच साताऱ्यात साहित्य संमेलन झाले होते. दुर्गाबाई भागवत त्याच्या अध्यक्षा होत्या. त्यावेळी आणीबाणीचा निषेध करण्याचा ठराव त्या ठिकाणी झाला होता. साहित्याला नियमबद्ध करणे निव्वळ हास्यास्पद नाही तर धोकादायक देखील आहे, असे मत त्यावेळी दुर्गाबाईंनी व्यक्त केले होते. त्यांचे हे विधान खूपच गाजले. आपल्या लोकशाहीत जोपर्यंत ही गोष्ट लक्षात ठेवू विचारांची अभिव्यक्ती विचारांचे स्वातंत्र्य, साहित्य, परस्परविरोधी विचार, या सर्वांचा अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य जोपर्यंत आपण लोकशाहीत अबाधित ठेवू तोपर्यंत कुणी कितीही संविधानाला धोका आहे म्हटले तरी काहीही होणार नाही. हे संविधान एवढे मजबूत आहे की, काही होऊ शकत नाही. संविधानाने दिलेल्या विचारांच्या स्वातंत्र्याची कुणीही गळचेपी करू शकत नाही. ते अबाधितच राहणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. मराठी भाषेचा विषय अत्यंत महत्त्वाचा मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्या मराठी भाषेचा विषयही अत्यंत महत्त्वाचा आहे. याठिकाणी जे मत व्यक्त झाले की, केवळ मराठीला अभिजात भाषा जाहीर करून आपल्याला थांबता येणार नाही. हे खरे आहे. पण मराठीला अभिजात दर्जा देण्याचा आपला संघर्ष पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समजून घेतला आणि मराठी भाषा जी अभिजात होतीच, पण तिला जी राजमान्यता हवी होती ती राजमान्यता देण्याचे काम सरकारने केले. या राजमान्यतेचा वापर करून आपल्याला मराठीला सर्व देशात लोकमान्यता मिळवून द्यायची आहे. त्या दृष्टिकोनातून सरकार पाऊले उचलले आहे. या प्रकरणी जेएनयू सारख्या संस्थेत मराठी अध्यासन केंद्र सुरू करण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती ते म्हणाले, भाषा सक्तीचा मुद्दा सातत्याने याठिकाणी उपस्थित केला जात आहे. मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सांगतो, महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीचीच सक्ती आहे. इतर कोणत्याही भाषेची सक्ती नाही. पण त्रिभाषा सूत्रात इतर कोणती भाषा शिकली पाहिजे. त्या संदर्भातही आमची भूमिका होती. त्याविषयी सर्वच भारतीय भाषा त्यातील जी तुम्हाला शिकायची आहे ती तुम्ही शिका असे आमचे धोरण होते. आता प्रश्न या प्रकरणी एवढाच निर्माण झाला की, कोणत्या वर्गापासून शिकले पाहिजे. महाविकास आघाडीच्या सरकारचा एक अहवाल आमच्याकडे आला. त्यात त्यांनी पहिलीपासून सक्ती करण्याचे काहीतरी लिहिले होते. तेच धोरण आम्ही पुढे नेले. पण त्यानंतर काहींनी पहिलीपासून सक्ती योग्य नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे सरकारने डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक समिती नियुक्त केली. ही समिती सर्वांशी चर्चा करून आपला अहवाल सादर करेल. हा अहवाल महाराष्ट्रापुढे मांडून योग्य तो निर्णय घेतला जाईल. पण महाराष्ट्रात सक्ती ही फक्त मराठी भाषेचीच असेल हे मी स्पष्ट करतो. एकीकडे, आपण इंग्रजी, फ्रेन्च, स्पॅनिश आदी परदेशी भाषांना पायघड्या घालतो. त्यांच्याविषयी आपली भूमिका स्वागताची असते. पण परदेशी भाषांना पायघड्या घालायच्या आणि इतर भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाही. सर्व भाषांचा सन्मान झाला पाहिजे. स्वभाषेचा सन्मान त्याहून अधिक झाला पाहिजे. मातृभाषा अधिक सन्मानित झाली पाहिजे ही आमच्या सरकारची भूमिका आहे. तीच भूमिका आमची यापुढेही असणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. चंद्र-सूर्य आहे तोवर मराठीचा अभिमान राहणार मुख्यमंत्री म्हणाले, अनेक मराठीच्या सारस्वतांनी या मराठीला फुलवण्याचे काम केले. आज मला असे वाटते की, जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आपला मराठीचा अभिमान असाच कायम राहिल. मराठीची सेवा आपण करत राहू. मी निश्चितपणे सांगू इच्छितो की साहित्यिकांचे कार्यच आहे की साहित्याची निर्मिती मनोरंजनाकरता नाहीय, समाजातील जाणिवा विस्तारीत झाल्या पाहिजेत याकरता साहित्याची निर्मिती होत असते. म्हणून कधी टीका झाली, गौरव झाला तरीही त्याचं कोणतंही वाईट वाटून घेण्याऱ्यातले आम्ही नाही. मला असं वाटतं की एखादी टीका झाली, ती योग्य असेल तर त्यातून सुधारण्याचा मार्ग दिसतो. आपल्याला सर्व समजते अशा मूर्खांच्या नंदनवनात वावरण्यातले आम्ही नक्की नाही. असे कुणी वावरू नये असे समजणारा मी आहे. साहित्यिकांनी राजकारणात जरुर यावे, पण… साहित्यसंमेलन दिशादर्शक असते. अध्यक्षीय भाषणातून पुढच्या वर्षीची दिशा मिळते. अशाच प्रकारचे मार्गदर्शन यातून होत राहील. आम्हाला राजकीय हस्तक्षेप साहित्यात करायचा नाही. आम्हाला रसही नाही. कोणताही राजकीय हस्तक्षेप मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत होणार नाही. साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावे, पण साहित्यात राजकारण आणू नये अशी मी विनंती करतो, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले. बंडखोरांशी व्यासपीठावरूनच फोनाफोनी देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनात म्हणाले, खरे म्हणजे मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही. पण आज मंचावर बसून मोबाईलवर सतत बोलत होतो, याबाबत मी माफी मागतो. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज परत घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सगळ्या पक्षांमध्ये एवढी बंडखोरी आहे की त्यांची मनधरणी केल्याशिवाय अर्ज मागे घेत नाहीत. मी कार्यकर्त्यांना विनंती करत होतो की फॉर्म परत घे, त्यामुळे मी फोनवर बोलत होतो. त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. मात्र, मी बहुश्रुत आहे, फोनवर बोलतानाही इथे काय बोलणे चालले होते याकडे माझे लक्ष होते.

Leave a Comment

error: Content is protected !!