खापरी रस्ता ‘डेथ ट्रॅप’; प्रशासनाची निष्क्रियता उघड, अपघात झाल्यास जबाबदार कोण?

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव तालुक्यातील खापरीकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून, संबंधित प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आधीच खड्ड्यांनी विद्रूप झालेल्या या रस्त्याची अवस्था हटवांजरी मध्यान प्रकल्पाच्या पाईपलाईन कामामुळे अधिकच बिकट झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पाईपलाईन टाकण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या मधोमध आडव्या नाल्या खोदण्यात आल्या. विशेष म्हणजे हे खोदकाम एकाच ठिकाणी न करता तब्बल तीन ठिकाणी करण्यात आले आहे. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने किंवा विभागाने योग्य ती दुरुस्ती न करता केवळ मुरूम टाकून रस्ता ब्रेकरसारखा सोडून दिला आहे. परिणामी, रस्त्याची स्थिती अत्यंत धोकादायक बनली असून वाहतुकीस पूर्णपणे अयोग्य ठरत आहे.


विशेषतः रात्रीच्या वेळी कोणतीही सूचना फलक, प्रतिबंधक चिन्हे किंवा प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात वाढले आहेत. अनेक वाहनचालकांना स्लिप होण्याच्या घटना घडत असून, चारचाकी वाहनांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.


ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सवाल उपस्थित केला आहे की, “उद्या एखादा गंभीर अपघात झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असतानाही संबंधित विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम नियम व सुरक्षा मानकांनुसार रस्त्यांवरील खोदकामानंतर तात्काळ दुरुस्ती करणे, तसेच योग्य सूचना व सुरक्षा उपाययोजना करणे बंधनकारक आहे.मात्र या प्रकरणात संबंधित ठेकेदार व प्रशासनाने नियमांचे सर्रास उल्लंघन केल्याचे स्पष्ट दिसत आहे.


गावकऱ्यांनी पुढील मागण्या केल्या आहेत –
तात्काळ रस्त्याची डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करून दुरुस्ती करावी. खोदकाम केलेल्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाय त्वरित करावेत.निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी सध्या मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे खापरी रस्ता हा अपघाताला आमंत्रण देणारा “डेथ ट्रॅप” ठरला आहे. वेळेत योग्य ती दखल घेतली नाही, तर एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!