शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेली शाईफेक हा त्यांचा विजय असल्याचा दावा केला आहे. आज विकास लवांडे यांच्यासोबत जे काही आळंदीत घडले, ते एका अर्थाने त्यांचा विजयच आहे. कारण वारकरी संप्रदायाच्या नावाखाली झालेली घुसखोरी आणि ज्यांना वारकरी संप्रदायाचा नेमका विचारच कळला नाही अशा नकली लोकांचे बुरखे फाडण्यात ते यशस्वी झालेत, असे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे ज्या लोकांनी धर्मांकरता पूर्ण जीवन समर्पित केले. त्यांच्यावर कुठेच नसणाऱ्या पक्षाचे लोक उठतात आणि टीका करतात, घुसखोर म्हणतात. यामुळे संग्रामबापू भंडारे यांनी केलेली शाईफेक अगदी योग्य आहे, आम्ही त्यांचे समर्थन करतो, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतली आहे. नेमके प्रकरण काय? विकास लवांडे आळंदी मातोबा तालुका हवेली येथे प्रवचनासाठी गेले होते. तेथील प्रवचन संपल्यानंतर सकाळी 10 वा. ते परत येत होते. रस्त्यात 3 गाड्यांमधून आलेल्या संग्राम भंडारे व 10-15 गोरक्षकांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर शाईफेक केली. त्यांना धक्काबुक्की केली. या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विकास लवांडेंवरील हल्ला हा त्यांचा विजय असल्याचा दावा केला आहे. काय म्हणाल्या सुषमा अंधारे? सुषमा अंधारे म्हणाल्या, विकास लवांडे जी आपलं मनःपूर्वक अभिनंदन..! कामक्रोधमधमोहमत्सर या पासून संत संप्रदाय प्रचंड लांब असतो. संत तुकोबाराय संत ज्ञानेश्वर यांचा सांप्रत समाजाने अतोनात छळ केला मात्र उपरोक्त संतांनी कधीही कुणाचे अहित चिंतले नाही. माणूस विकार मुक्त झाला पाहिजे यासाठी ते कायम सम्यक विचार मांडत राहिले. आज आपल्या सोबत जे काही आळंदीत घडले हा एका अर्थाने आपला विजय आहे. कारण वारकरी संप्रदायाच्या नावाखाली झालेली घुसखोरी आणि ज्यांना वारकरी संप्रदायाचा नेमका विचारच कळला नाही अशा नकली लोकांचे बुरखे फाडण्यात आपण यशस्वी झालात. वारकरी संप्रदायामध्ये हिंसक विचारांच्या लोकांची घुसखोरी झाली आहे हे पवार साहेबांचे म्हणणे या मंडळींनी पुन्हा एकदा खरे करून दाखवले. आता आपण अजून एक काम करूया. अशा लोकांवर पोलिस कारवाई व्हावी किंवा कायदेशीर त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी कुठलीही अपेक्षा मागणी आपण कुणीही करू नये. कारण जिथे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा एफ आय आर लिहून घेतला जाऊ शकत नाही आणि यावर त्यांच्याच पत्नी असणाऱ्या उपमुख्यमंत्री, किंवा खासदार मुलगा, चकार शब्दाने बोलू शकत नाही अशा राज्यात आपण आपली एफ आय आर व्हावी यासाठी प्रयत्न करणे शुद्ध वेडेपणा आहे. उलट जे जे लोक अशा पद्धतीच्या कृती करतात त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या समारंभांमध्ये पहिल्या रांगेच्या खुर्च्यांमध्ये बसवावे. त्यांचे पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण असे पुरस्कार देऊन सत्कार समारंभ घडवून आणावेत. शक्य झालं तर सत्तेतल्या काही लाभाच्या जागा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देता येतात का? हे सुद्धा बघावे. प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकणारे असतील किंवा हनुमंत पवारला मारहाण करणारे असतील किंवा तुम्हाला दहापेक्षा दाखवणारे लोक असतील अशा सगळ्या लोकांना अधिकाधिक राजाश्रय कसा मिळेल आणि त्यांचा सत्कार सन्मान कसा होईल यासाठी उलट आपण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे सगळे मिळून मागणी करूया, असे त्यांनी म्हटले आहे. रोहित पवारांचे ट्विट काय? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, विकास लवांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज दुपारपर्यंत FIR दाखल झाला नाही तर संध्याकाळी मी स्वतः पोलिस स्टेशनला जाणार… थोर संतांनी दाखवलेला बंधुभावाचा आणि शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार हाच खरा महाराष्ट्र_धर्म असून कोणत्याही कट्टरवाद्यांना, गुंडापुंडांना आणि शिव्या देणाऱ्या मनुवाद्यांना हा विचार आम्ही पुसू देणार नाही…! भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी.. असे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांनी म्हटल्याचे ट्विट रोहित पवारांनी केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला घटनेचा निषेध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर स्वतःला वारकरी म्हणवणाऱ्या संग्राम भंडारे आणि त्याच्या सहकारी गुंडांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्की, शिवीगाळ व शाईफेक या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. लोकशाहीमध्ये मतभेदांना हिंसा, धमकी आणि दादागिरीने उत्तर देणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे. अशा प्रवृत्ती समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्राची संतपरंपरा आणि वारकरी संप्रदाय शांतता, संयम आणि विचारांचे प्रतीक आहेत; त्यांच्या नावाचा वापर करून गुंडगिरी करणाऱ्यांना समाज कधीही माफ करणार नाही, असे ते म्हणालेत. या घटनेने लवांडेंची भूमिका बदलणार नाही- दानवे या घटनेवर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, विकास लवांडे हे योग्य भूमिका मांडत आहेत. कारण आज वारकऱ्यांच्या नावाखाली भाजपचे अनेक कार्यकर्ते वारकरी संप्रदायात घुसले आहेत. वारकरी संप्रदाय काय राजकीय पक्षाचा प्रचार करा म्हणून सांगतो का? असा सवाल दानवे यांनी केला आहे. लवांडे यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. वारकरी संप्रदाय काय शाईफेक करण्यास सांगतो का? वारकरी विचार हा असा नाही. शाईफेक केल्याने विकास लवांडे यांची भाषा किंवा विचार बदलतील असे मला वाटत नाही.
हा कुठला वारकरी धर्म आणि कुठली नितीमत्ता? – अमोल मिटकरी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी कांग्रेस (श.पवार साहेबांच्या) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदी येथे एकट्यात गाठून स्वतःला वारकरी म्हणवून घेणाऱ्या झुंडशाहीने ज्याप्रकारे गुंड शाही केली ती पाहता हा कुठला वारकरी धर्म आणि कुठली नितीमत्ता? “कुण्याही जीवाचा न घडो मत्सर” व “जो जे वांछील तो ते लाहो” असे वैश्विक पसायदान मागणारे “तुकोबा ज्ञानोबा” अशा धर्माच्या नावावर गुंडगिरी करणाऱ्या कपाळ करंट्याना मेल्यावरही कळणार नाहीत. निषेध, असे त्यांनी म्हटले आहे. संग्राम जगताप, नितेश राणेंकडून समर्थन ज्या लोकांनी धर्मांकरता पूर्ण जीवन समर्पित केले. भगव्या ध्वजा करता ज्यांनी स्वत:चे जीवन समर्पित केले आहे त्याच्यावर कुठेच नसणाऱ्या पक्षाचे लोकं उठतात आणि टीका करतात, आणि घुसखोर ‘हभप’ म्हणत एक यादी वाचून दाखवतात यामुळे हभप संग्रामबापू भंडारे यांनी त्यांच्यावर जी शाईफेक केली ती अगदी योग्य आहे, आम्ही त्यांचे समर्थन करतो, त्यांनी योग्य भूमिका घेतली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले आहे. संग्राम जगताप म्हणाले की, संग्रापबापू भंडारे यांचे नाव घेतले म्हणून त्यांनी लवांडे यांच्यावर शाईफेक केली नाही. तर ते ज्यांना आदर्श मानतात, त्या लोकांबद्दल लवांडे यांनी वक्तव्य केल्याने बापूच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांनी आज आपला निषेध व्यक्त केला. या लोकांना धर्माविरोधात कोण बोलायला लावते हे पाहिले पाहिजे. तर नितेश राणे यांनी ‘बापू अभिमान आहे ! जय श्री राम’ अशी पोस्ट एक्सवर करत या शाईफेकचे समर्थन केले आहे.
