बातमी ऐका (Marathi Voice Reader)
कोल्हापूर: कष्ट करून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या, रुग्णांची अविरत सेवा करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करणाऱ्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुकानातील खरेदी करून घरी येताना बेकर गल्ली कॉर्नरवर मोपेड घसरली. डंपरच्या मागील चाकात अडकून रुग्णसेवा करणाऱ्या पूनम रामेश्वर शिंदे (वय 46, रा. कनाननगर) या जागीच ठार झाल्या, तर पाठीमागे बसलेली त्यांची मुलगी एंजल (वय 20) ही गंभीर जखमी झाली. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम शिंदे या घरी जाऊन रुग्णसेवा करत होत्या. तसेच खासगी शिकवणी घेऊन कुटुंबाचा गाडा हाकत होत्या. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुलगी एंजल हिला सोबत घेऊन मोपेडवरून घरी परत येत होत्या. तेव्हा बेकर गल्लीच्या कॉर्नरवर त्यांची मोपेड घसरली. यावेळी पाठीमागून येणाऱ्या डंपरच्या मागच्या चाकाखाली त्या सापडल्या, तर मुलगी एंजल ही बाजूला फेकली गेल्याने किरकोळ जखमी झाली.
पत्नी अर्ध्यावर सोडून गेली, विरहानं पतीला धक्का, आठ महिन्यांत सगळं संपलं, ‘ते’ दृश्य पाहून सारं गाव रडलं
अपघातानंतर कनाननगरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच कनाननगर परिसरातील नातेवाईकांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती. खासगी शिकवणी घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक, तसेच सेवा सुश्रूषा करत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकही सीपीआरजवळ जमले होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. तसेच डंपरचालक अभिषेक मनीष रजपूत (वय 48, रा. जवाहनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
कुटुंबीयांचा आक्रोश
पूनम शिंदे यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुली आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर पतीसह मुलगी एंजल आणि आराधना (वय 17) यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. पूनम यांचा येत्या 21 नोव्हेंबरला वाढदिवस होता. तो मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं कुटुंबाचं नियोजन होतं. मात्र, नियतीच्या मनात वेगळंच होतं. त्यांचा जन्म 21 तारखेचा आणि 21 तारखेलाच मृत्यूनं गाठल्यानं अनोख्या योगायोगाची चर्चा होती.