बातमी ऐका (Marathi Voice Reader)
मुंबई : सोशल मीडियावरील गुन्हेगारीच्या घटनांत वाढ होत आहे. आता मुंबईतील एका 21 वर्षीय तरुणीसोबत भयंकर प्रकार घडला आहे. ‘इन्स्टा’वर बनावट खाते काढून तिचे खासगी फोटो व्हायरल करण्यात आले. ‘फोटो हटवायचे असल्यास 10 हजार रुपये दे, अन्यथा आणखी फोटो व्हायरल करेन,’ अशी धमकीच दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं घडलं काय?
जोगेश्वरी पश्चिम भागात राहणारी 21 वर्षीय तरुणी एका कुटुंबाकडे लहान मुलीची देखभाल करण्याचं काम करते. 19 सप्टेंबर रोजी तिच्या होणाऱ्या पतीने फोन करून अनोळखी इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटो अपलोड केले असल्याची माहिती दिली. तरुणीने संबंधित अकाउंट तपासले असता तिला धक्काच बसला.
अल्पवयीन मुलीचं पोट दुखत होतं, रुग्णालयात दाखल केलं तर…, मावस भावाचं भयंकर कृत्य, छ. संभाजीनगरात नात्याला काळिमा!
संबंधित इन्स्टाग्राम अकाउंट हे बनावट होते आणि त्याच्यावर तीन फोटो आढळले. त्यातील एक फोटो तिचा खासगी होता. तर होणाऱ्या पतीसोबतचा खासगी फोटो देखील अपलोड करण्यात आला होता. संबंधित अकाउंट तरुणीने इन्स्टाग्रामवर रिपोर्ट केले. मात्र, पुन्हा तिला दुसऱ्या अकाउंटवरून फॉलो रिक्वेस्ट आली.
दुसऱ्या अकाउंटवरून पैशांची मागणी
तरुणीचे फोटो असणारं पहिलं इन्स्टा अकाउंट रिपोर्ट करण्यात आलं. मात्र, त्यानंतर तरुणीला दुसऱ्या अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली. तसेच त्यावरही तिचे फोटो असल्याचे आढळले. तिने फोटो हटवण्याची विनंती केली. तेव्हा संबंधित व्यक्तीने त्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी तरुणीने अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अधिक तपास सुरू असून पोलीस संबंधित आरोपीचा शोध घेत आहेत.