पवनराजे हत्याकांडातील सीबीआय कोर्टाचे 10 सर्वात मोठे खुलासे:माफीचा साक्षीदार अविश्वसनीय, मोबाईलचे सीडीआर गायब, अन् पोलिसांच्या घोडचुका

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर २० वर्षांनंतर निकाल लागला आहे. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांनी माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली आहे. सीबीआय (CBI) कोर्टाने आपला ऐतिहासिक निकाल देताना तपास यंत्रणा, पोलीस आणि सीबीआयच्या अत्यंत ढिसाळ कारभारावर प्रचंड कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. या खटल्याचा संपूर्ण पाया ज्या ‘माफीच्या साक्षीदारावर’ उभा होता, त्यालाच न्यायालयाने अविश्वसनीय आणि सोयीनुसार खोटे बोलणारा ठरवले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा एक मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे. न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांच्या कोर्ट क्रमांक ५५ मध्ये पार पडलेल्या या सुनावणीतील १० सर्वात मोठे खुलासे आणि कोर्टाची सविस्तर निरीक्षणे खालीलप्रमाणे: १. “२० वर्षांनंतर निकाल देतोय…” न्यायाधीशांची खंत न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी निकालपत्राचे वाचन करताना तपास यंत्रणांच्या ढिसाळ कारभारावर आणि पोलिसांच्या चुकांवर अत्यंत गंभीर बोट ठेवले. ते म्हणाले, “ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे की एका लोकनेत्याची अशा प्रकारे हत्या होते. सुरुवातीला कळंबोली पोलीस, नंतर गुन्हे शाखा आणि अखेर सीबीआयकडे हा तपास गेला. आज २० वर्षांनंतर मी हा निकाल देतोय, पण न्यायालय केवळ कायद्याच्या आणि पुराव्यांच्या चौकटीत राहूनच निकाल देऊ शकते.” २. पोलिसांची घोडचूक अन् १५ दिवसांची बेकायदेशीर कोठडी न्यायालयाने म्हटले की, हा खटला पूर्णपणे माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या साक्षीवर उभा आहे. मात्र पोलिसांनी त्याला ८ सप्टेंबर २००९ रोजी मुंब्रा येथून ताब्यात घेतले आणि अधिकृत अटक तब्बल २५ सप्टेंबरला दाखवली. या १५ दिवसांच्या काळात त्याला बेकायदेशीर ताब्यात ठेवून, मारहाण करून आणि औषधे बंद करून त्याचा कबुलीजबाब घेण्यात आला. सरकारी पक्षाने ही अत्यंत महत्त्वाची बाब न्यायालयापासून लपवून मोठी ‘घोडचूक’ केली, ज्यामुळे हा पुरावा संशयाच्या खाईत ढकलला गेला. ३. माफीचा साक्षीदार अविश्वसनीय: “त्याला खोटे बोलण्याची सवय आहे” माफीच्या साक्षीदाराने ‘पैशांसाठी’ हा गुन्हा केल्याचा दावा कोर्टाने पूर्णपणे फेटाळला. न्यायमूर्ती म्हणाले, “साक्षीदाराचे मुंबई ते मिरा-भाईंदरपर्यंत अनेक घरे आणि मिठाईची दुकाने आहेत. त्याच्याकडे साडेचार किलो सोन्याचे भांडवल होते. त्याचा कुठलाही उद्योग डबघाईला आलेला नव्हता. मग त्याला केवळ ५० हजार रुपयांची गरज होती म्हणून त्याने एवढी मोठी हत्या केली, हे अजिबात पटणारे नाही. तो सोयीनुसार खोटं बोलतो.” ४. सर्वात मोठी चूक: मोबाईल फोन आणि सीडीआर (CDR) गायब तपासातील सर्वात मोठ्या त्रुटीवर बोट ठेवताना न्यायालय म्हणाले, “या खटल्याचा तपास करताना कुठल्याही आरोपीचा मोबाईल फोन जप्त केलेला नाही आणि त्यांचे ‘कॉल डिटेल्स रेकॉर्ड’ (CDR) काढले गेले नाहीत. जर सीडीआर काढले असते, तर आरोपी खरोखरच एकमेकांच्या संपर्कात होते का, हे स्पष्ट झाले असते. घटनाक्रमात १२ कॉल रेकॉर्डचा उल्लेख आहे, त्यातील एक फोन पीसीओ वरून झाला होता. पवनराजेंना आरोपींचा थेट फोन आलाच नाही, तर मग पाठलागाची कथा ग्राह्य कशी धरायची?” ५. हत्येच्या रात्रीबाबत प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ‘चार कहाण्या’ माफीच्या साक्षीदाराने हत्येच्या दिवशी तो मुंबईबाहेर कसा गेला, याच्या वेळोवेळी चार वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या: पहिली कहाणी: बोरिवलीहून गाडी पकडून थेट श्रीनाथजी मार्गे पडेसरीला गेलो. दुसरी कहाणी: आधी अहमदाबादला गेलो, मग श्रीनाथजीवरून गावी गेलो. तिसरी कहाणी: बोरिवलीहून अहमदाबादला मित्राकडे मांडववाड्याला गेलो आणि मग पडेसरीला. चौथी कहाणी: बोरिवलीहून नाथद्वारा, तिथे शाळेत राहिलो, मग मित्राकडे आणि तिथून अहमदाबादच्या ‘भाग्यदोय’ हॉटेलमध्ये राहिलो. न्यायाधीश म्हणाले, “प्रत्येक वेळी नवीन स्टोरी सांगणाऱ्या या साक्षीदाराची साक्ष अजिबात विश्वासार्ह मानली जाऊ शकत नाही.” ६. गाडीच्या रंगाचा आणि घटनास्थळाचा घोळ गुन्ह्यात वापरलेली गाडी जळून खाक झाली होती. तरीही जप्ती पंचनाम्यात पोलिसांचा ‘रंगीत’ कारभार उघड झाला. रंगाचा घोळ: गाडी जळालेली असताना जप्ती पंचनाम्यात तिचा रंग ‘हिरवा’ कसा लिहिला गेला? अधिकारी म्हणतात कागदपत्रे पाहून रंग लिहिला, पण मूळ पुरावा सिद्ध होत नाही. ठिकाणाचा घोळ: एका साक्षीदाराने गाडी एका छोट्या घराच्या बाजूला उभी असल्याचे सांगितले, दुसऱ्याने बंगल्याच्या बाजूला, तर पोलीस रेकॉर्डनुसार ती मोकळ्या जागेत सापडली. या सर्व लहान गोष्टींमधील तफावत तपासाचा हेतू संशयास्पद बनवते. ७. राकेश मारिया आणि ‘स्कॉचच्या बॉटल’चा दावा खोटा! माफीच्या साक्षीदाराने दावा केला होता की तो मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना भेटला होता आणि त्यांना ‘स्कॉचची बॉटल’ दिली होती. त्यांच्याच सांगण्यावरून आपल्याला अटक व मारहाण झाल्याचे त्याने म्हटले होते. मात्र, कोर्टाने सीबीआयला फटकारले की, “मारिया यांनी हे आरोप फेटाळले आहेत. मग सीबीआयने या दाव्याची शहानिशा करण्यासाठी सीसीटीव्ही का तपासले नाहीत? मारिया यांचा जबाब का नोंदवला नाही?” ८. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा तपासच नाही २००३ मध्ये पवनराजे यांनी “पद्मसिंह पाटील यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे,” असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. सीबीआयने हे पत्र आरोपपत्रात जोडले, पण हे मूळ पत्र कुठून आणि कसे आले, याचा कसलाही तपास सीबीआयने केला नाही. “हे पत्र पाहिल्यानंतर अधिकाऱ्यांचे कान उभे राहायला हवे होते,” असा संताप कोर्टाने व्यक्त केला. ९. राजकीय दरी मान्य, पण पुराव्यांचा अभाव न्यायालयाने हे मान्य केले की, २००२ च्या विधानसभा निवडणुकीत पवनराजेंचा पराभव झाल्यानंतर पवनराजे निंबाळकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यात तेरणा साखर कारखान्यावरून आणि निवडणुकीमुळे मोठी राजकीय दरी निर्माण झाली होती. पूर्ववैमनस्यातून हत्येचा कट रचल्याचा सीबीआयचा आरोप होता. मात्र, “केवळ राजकीय वैमनस्य आहे म्हणून कोणाला फासावर लटकवता येत नाही, त्यासाठी कायद्याला ठोस पुराव्यांची गरज असते,” असे कोर्टाने स्पष्ट केले. १०. सर्व ८ आरोपींची निर्दोष मुक्तता तपास यंत्रणांच्या या अनेक त्रुटी, गायब असलेले पुरावे आणि फितूर झालेला माफीचा साक्षीदार यांच्या आधारावर संशयाचा फायदा देत कोर्टाने सर्व आठ आरोपींची निर्दोष सुटका केली. मुक्त झालेल्या आरोपींची यादी: १. डॉ. पद्मसिंह पाटील (८६ वर्षे) २. सतीश मंदाडे ३. मोहन शुक्ला ४. शशिकांत कुलकर्णी ५. कैलास यादव ६. दिनेश तिवारी ७. पिंटू सिंग (मुख्य शूटर) ८. छोटे पांडे. कोण आहेत डॉ. पद्मसिंह पाटील? शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील हे उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील मोठे प्रस्थ मानले जातात. ते ७ वेळा आमदार म्हणून निवडून आले असून, त्यांनी राज्याचे गृह, सिंचन आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम पाहिले आहे. ३ जून २००६ रोजी त्यांच्याच चुलतभावाच्या (पवनराजे निंबाळकर) हत्येप्रकरणी सीबीआयने त्यांना अटक केली होती. मात्र, आता तब्बल २० वर्षांनंतर त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!