बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Who is Sonam Maskar Asian Games Medalist : जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत दमदार कामगिरी केली असून तिसरं पदक पदरी पडलं आहे. तिसऱ्या दिवशी, भारतीय पुरुष संघाने 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकलं. पार्थ माने, रुद्राक्ष पाटील आणि हिमांशू ढिल्लन यांनी 1890 गुणांसह दुसरं स्थान पटकावलं. अशातच काल कोल्हापूरच्या पोरीने भारताची मान उंचावली होती.
सोनमच्या स्वप्नासाठी वडिलांनी सगळं विकलं
काल कोल्हापूरची सोनम मस्कर हिने एलावेनिल वलारिवन आणि विदर्सा विनोद के यांच्यासह महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिलं आहे. सोनम मस्कर ही मूळची महाराष्ट्रातील कोल्हापूरची… पण सोनमचा इथंपर्यंतचा प्रवास साधा सोपा कधीच नव्हता. 2018 पर्यंत बुद्धिबळ खेळणाऱ्या सोनमने आठ वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर मेडल पटकावलं आहे. सोनमच्या स्वप्नासाठी वडिलांनी सगळं काही विकलं होतं.
मुंबईत दुधाचा व्यवसाय ठप्प, कोल्हापूर गाठलं
सोनम मूळची कोल्हापूरची. पण ती तिच्या कुटुंबासह मुंबईत स्थायिक होती. पण 2020 मध्ये कोरोनाच्या काळात हाल सोसावे लागले अन् त्यांना कोल्हापूरला स्थायिक व्हावं लागलं. वडील उत्तम मारुती मस्कर मुंबईत दुधाचा व्यवसाय करत होते. तेव्हा हातात फक्त एक प्लॉट आणि दुकान असताना त्यांना कोल्हापुरात नव्याने संसार उभारावा लागला. मात्र, लेकीसाठी होतं नव्हतं ते विकावं लागलं. लेकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलांनी प्लॉट आणि दुकान देखील विकलं.
Kolhapur, Maharashtra: Uttam Maskar, father of Sonam Uttam Maskar, who won a silver medal in the women’s 10m air rifle team event at the 2026 Asian Games, says, "When she entered the 11th grade, the college didn’t offer the mind sport she played, so she chose rifle shooting from… pic.twitter.com/JanQFFQlKI
— IANS (@ians_india) September 20, 2026
देशासाठी मेडल पटकवण्याचा निश्चय
सोनमला पुढे खेळण्यासाठी स्वतःची रायफल आणि शूटिंग किटची आवश्यकता होती. त्यासाठी खूप मोठा पैसा गरजेचा होता. पण बापानं मुलीसाठी मालमत्ता विकली अन् तिला रायफल घेऊन दिली. वडिलांचा हा त्याग पाहून सोनमने देखील देशासाठी मेडल पटकवण्याचा निश्चय केला. त्यानंतर लेकीने आता आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला पहिलं रौप्य पदक पटकावून दिलं अन् कष्टाचं चीज केलं.
वडिलांनी व्यक्त केला आनंद
जेव्हा ती अकरावीत गेली, तेव्हा तिच्या महाविद्यालयात ती खेळत असलेला ‘माइंड स्पोर्ट’ (बौद्धिक खेळ) उपलब्ध नव्हता; त्यामुळे उपलब्ध पर्यायांपैकी तिने रायफल शूटिंगची निवड केली. मात्र, या खेळासाठी मोठा खर्च येणार होता. तिने या खर्चाबाबत आपल्या आईशी चर्चा केली; तेव्हा आईने तिला या खेळासाठी पुढे जाण्यास सांगितले आणि वडिलांशी बोलण्याचे आश्वासन दिले. अवघ्या दोन महिन्यांतच तिने राज्य पातळीपर्यंत मजल मारली होती, असं सोनम उत्तम मस्कर यांचे वडील उत्तम मस्कर यांनी सांगितलं.