राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समर्थित महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा तब्बल 301 मतांनी पराभव केला. मात्र या विजयाच्या आनंदावर महायुतीतील अंतर्गत नाराजीचे सावट दिसून आले आहे. कारण निकालातून महायुतीची सुमारे 100 मते फुटल्याचे स्पष्ट झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निकालाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या प्रभावक्षेत्रातील मोठा राजकीय धक्का म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे भाजपने विजय मिळवला असला तरी महायुतीतील मतफुटीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. धैर्यशील कदम यांचा मोठा विजय विधान परिषद निवडणुकीत धैर्यशील कदम यांना 593 मते मिळाली, तर अभयसिंह जगताप यांना 292 मतांवर समाधान मानावे लागले. एकूण 895 मतदारांपैकी 894 जणांनी मतदान केले होते. त्यापैकी 9 मते अवैध ठरली. निकाल असा: निकाल जाहीर होताच सांगली आणि सातारा जिल्ह्यात भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. विजय मिळाला, पण महायुतीची 100 मते कुठे गेली? या निवडणुकीतील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे महायुतीची मतफुटी. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ पाहता महायुतीकडे सुमारे 700 मतांचे गणित असल्याचे मानले जात होते. मात्र प्रत्यक्षात धैर्यशील कदम यांना 593 मते मिळाली. याचा अर्थ महायुतीची जवळपास 100 मते फुटून महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे विजय मिळूनही महायुतीसाठी हा इशारा मानला जात आहे. महायुतीतील वाद निकालातून उघड सांगली आणि साताऱ्यात भाजप व शिंदे गटातील स्थानिक नेत्यांमध्ये काही महिन्यांपासून मतभेद असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतही दोन्ही पक्षांमध्ये मोठा संघर्ष झाला होता. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीतही नाराजीचा परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. वरिष्ठ नेत्यांनी अनेक बैठका घेऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीपूर्वी वाद मिटल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र निकालानंतर समोर आलेली मतफुटी पाहता अंतर्गत नाराजी पूर्णपणे संपलेली नव्हती, हे स्पष्ट झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. जयंत पाटलांसाठी धक्का, पण महाविकास आघाडीचा दावा अभयसिंह जगताप यांचा पराभव झाल्याने शरद पवार गट आणि विशेषतः जयंत पाटील यांच्या राजकीय प्रभावाला धक्का बसल्याची चर्चा आहे. मात्र पराभवानंतर अभयसिंह जगताप यांनी वेगळी भूमिका मांडली. ते म्हणाले की, ही केवळ आमदारकीची निवडणूक नव्हती. लोकशाही वाचवण्याची लढाई होती. आम्हाला अपेक्षेपेक्षा जवळपास 100 मते अधिक मिळाली आहेत. त्यामुळे महायुतीतील अनेक मतदार महाविकास आघाडीकडे झुकत असल्याचे स्पष्ट होते. जगताप यांनी नाव न घेता साताऱ्यातील दोन मंत्र्यांवरही टीका केली. मंत्रिपदे टिकवण्यासाठी मतदारांवर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षीय बलाबल काय होते? निवडणुकीपूर्वीच्या आकडेवारीनुसार महायुतीचे संख्याबळ मजबूत मानले जात होते. महायुतीचे बलाबल: भाजप – 314 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 205 शिवसेना (शिंदे गट) – 111 महाविकास आघाडीचे बलाबल: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 119 काँग्रेस – 73 शिवसेना (ठाकरे गट) – 1 या आकडेवारीच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदानाचा निकाल पाहता महायुतीतील मतफुटी लक्षणीय असल्याचे मानले जात आहे. महायुतीने जागा जिंकली, पण वाढली चिंता धैर्यशील कदम यांचा विजय भाजपसाठी महत्त्वाचा असला तरी निकालाने महायुतीतील अंतर्गत नाराजी उघड केली आहे. विरोधकांचे नेते आणि लोकप्रतिनिधी फोडण्याच्या राजकारणावर आरोप होत असतानाच महायुतीचीच सुमारे 100 मते फुटल्याने सत्ताधारी आघाडीसमोर नवीन प्रश्न उभे राहिले आहेत. लोकसभा, विधानसभा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल महायुतीसाठी विजयापेक्षा आत्मपरीक्षणाचा इशारा मानला जात आहे. सांगली-साताऱ्यातील मतफुटीमागे नेमके कोणते नेते किंवा गट कारणीभूत होते, याचा शोध आता महायुतीकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. संबंधित बातमी वाचा… विधान परिषद निवडणूक निकाल:महायुतीचा 16 जागांवर विजय, नाशिकमध्ये गोकुळ गितेंचा शिवसेनेला धक्का; महाविकास आघाडीचा सुपडा साफ महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल अखेर जाहीर झाला आहे. १८ जून रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत महायुतीने आपला वरचष्मा कायम राखत १७ पैकी तब्बल १६ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, नाशिकच्या जागेवर महायुतीला मोठा धक्का बसला असून, तिथे अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुती आणि शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केलाय. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. वाचा संपूर्ण बातमी नाशिकमध्ये महायुतीला दणका! गोकुळ गीतेंचा दणदणीत विजय:क्रॉस व्होटिंगची चर्चा, दराडेंचा संताप, राऊत-महाजन आमनेसामने
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणारे गोकुळ गिते यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे महायुतीत खळबळ उडाली असून क्रॉस व्होटिंग, अंतर्गत नाराजी आणि विश्वासघाताच्या चर्चांना उधाण आले आहे. वाचा संपूर्ण बातमी
