बातमी ऐका (Marathi Voice Reader)
छत्रपती संभाजीनगर: खवड्या डोंगरावरील मुलगा आणि आईवडील यांच्या दुर्दैवी मृत्यूने अवघा महाराष्ट्र हळहळला. 19 वर्षांच्या कुणाल चांदुगडे याने टोकाचं पाऊल उचललं. त्याला वाचवण्यासाठी गेलेले वडील मुरलीधर दामोदर चांदगुडे (48) आणि आई संगीता चांदगुडे (42) यांनीही पोटच्या लेकासाठी मृत्यूला कवटाळलं. या घटनेनंतर कुणालने एवढा टोकाचा निर्णय का घेतला? याबाबत चर्चा होतेय. मात्र, वडील आणि कुणालमध्ये खरंच वाद होता का? आणि खवड्या डोंगरावर काय घडलं? याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
नेमकं घडलं काय?
चांदवडे कुटुंब मूळचं अंबड तालुक्यातील धनगर पिंपळवाडी येथील आहे. गेल्या 18 वर्षांपासून ते शहरातील झाल्टा फाटा परिसरात वास्तव्यास होते. वडील मुरलीधर हे ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक होते. तर डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कुणालने नुकताच अकरावीत प्रवेश घेतला होता. आता तो नीट-युजी परीक्षेची तयारी करीत होता. त्याला दहावीच्या परीक्षेत 92 टक्के गुण मिळाले होते.
"तुझ्या बाबांना सोडून देते"! आईनं मंगळसूत्र काढून फेकलं; दरीत उडी मारणाऱ्या लेकाकडे व्याकुळ याचना; पण शेवटी.. कुटुंबाचा भयंकर शेवट
वडिलांसोबत वाद
गेल्या काही दिवसांपासून कुणालचा वडिलांसोबत सतत वाद होता. वडील खर्चासाठी पैसे देत नाहीत, अशी त्याची तक्रार होती. तसेच मोबाईलच्या थकलेल्या हप्त्यावरून देखील त्यांच्यात मतभेद होते. यावरूनच शुक्रवारी सकाळी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरातच कुणालने घर सोडले आणि तो ट्युशनसाठी म्हणून बाहेर पडला. मात्र, त्याने थेट खवड्या डोंगर गाठला.
आईवडिलांची खवड्या डोंगराकडे धाव
कुणाल खवड्या डोंगराकडे गेल्याचे समजताच आईवडिलांनी अन्य नातेवाईकांना याबाबत कळवले आणि तेही डोंगरावर पोहोचले. कुणाल डोंगराच्या कड्यावर उभा होता. पोलीस, स्थानिक आणि आई त्याला आत्महत्या करू नको म्हणून समजावत होते. मात्र, तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने आयफोन, हातातील घड्याळ, गळ्यातील चांदीची साखळी काढून फेकली.
आईने मंगळसूत्र काढून टाकलं
आई जिवाच्या आकांताने मुलाला समजावण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, कुणाल ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. “तुझा वडिलांसोबत वाद आहे. मी आताच मंगळसूत्र काढून टाकते. तुझ्या वडिलांना सोडून देते आणि तुझ्यासोबत येते”, अशी आर्त विनवणी करत आईने मंगळसूत्र काढून फेकले. “आई, माझं कुणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाईफचं सोल्यूशनच नाही, काहीच होणार नाही गं”, असंच कुणाल सांगत राहिला.
वडील वाचवायला गेले अन्..
आई, पोलीस आणि स्थानिक लोक कुणालची समजूत काढत होते. कुणाल हळूहळू ऐकण्याच्या स्थितीत येत होता. त्याचे मनपरिवर्तन करण्याचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, तेवढ्यात व्याकूळ वडील मुलाला वाचवण्यासाठी पुढे आले आणि कुणालला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोल गेला आणि त्याला पकडलेल्या वडिलांसह दोघेही थेट दरीतील दगडांवर आदळले.
आईनेही मृत्यूला कवटाळलं
वडील आणि मुलगा दरीत कोसळल्यानंतर उपस्थितांचा श्वास रोखला गेला. मात्र, मुलगा आणि पती दिसत नसल्याचे पाहताच आईनेही दरीत उडी घेतली. काही कळायच्या आत पती आणि मुलानंतर संगीता यांनीही मृत्यूला कवटाळलं. त्यामुळे क्षणात सगळं कुटुंबच उद्ध्वस्त झालं. या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत असून मुलांची बदलणारी मानसिकता आणि संपत चाललेल्या सहनशीलतेचा गंभीर मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला आहे.